Home Featured आयआयटीसाठी फर्मागुडीतील जमीन ताब्यात घेणार : मुख्यमंत्री

आयआयटीसाठी फर्मागुडीतील जमीन ताब्यात घेणार : मुख्यमंत्री

0

गोव्यात आयआयटीसाठी कायमस्वरूपी इमारत संकुल उभारण्यासाठी फर्मागुडी येथील गोवा इंजिनियरिंग कॉलेजजवळील अंदाजे 4.5 लाख चौ.मी. एवढी सरकारी जमीन ताब्यात घेण्यात येणार असून, तसा प्रस्ताव केंद्राला दिला आहे, अशी माहिती काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. केंद्रीय पथकाने गोव्यात येऊन सदर जमिनीची पाहणी केल्यानंतरच या प्रस्तावाबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी दिली.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने या प्रकल्पासाठी यापूर्वी 10 लाख चौ.मी. एवढी जमीन हवी असल्याची जी अट घातली होती, ती अट आता मागे घेण्यात आली आहे. त्यामुळे आता राज्य सरकारला प्रस्तावित आयआयटी प्रकल्पासाठी 4.5 लाख चौ.मी. एवढी जमीन ताब्यात घेण्यास मान्यता मिळाली आहे.

या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केंद्राला एक नवा प्रस्ताव पाठवला असून, या जमिनीची पाहणी करण्यासाठी लवकरच एक केंद्रीय पथक गोव्यात येणार आहे.

आयआयटी प्रकल्पासाठी गेल्या 10 वर्षांपासून जमीन शोधण्याचे काम सुरुच आहे. काणकोण, सांगे, सत्तरी आदी ठिकाणी जमीन संपादन करण्याचा सरकारने प्रयत्न केला असता त्याला स्थानिकांनी कडाडून विरोध केल्याने सरकारला माघार घ्यावी लागली होती.