आता सूर्यवेध

0
28

मंगलयान आणि चंद्रयान – 3 च्या यशस्वी मोहिमांनंतर आता भारताला सूर्याचे वेध लागले आहेत. सूर्याच्या अभ्यासासाठी ‘इस्रो’ आपले ‘आदित्य – एल – 1′ हे अवकाशयान उद्या शनिवारी सकाळी ठीक 11 वाजून 50 मिनिटांनी श्रीहरीकोट्याहून अंतराळात सोडील. अर्थात, चंद्रयानपेक्षा ‘आदित्य’ चे स्वरूप संपूर्णतः वेगळे आहे. ते सूर्यावर उतरणार नाही आणि तसे एखादे यान प्रत्यक्ष सूर्यावर उतरवणे शक्यही नाही. सूर्याचे गाभ्याजवळचे तापमान असते 15 दशलक्ष म्हणजेच दीड कोटी अंश सेल्सीयस. त्या तुलनेत त्याच्या दृश्य पृष्ठभागावर, ज्याला फोटोस्पियर म्हटले जाते, तेथे ते असते 55 हजार सेल्सीयस. त्यामुळे आदित्य ही प्रत्यक्षात केवळ सूर्यावर नजर ठेवून राहणार असलेली अंतराळातील वेधशाळा आहे. मुळात सूर्य हा काही ग्रह नव्हे. तो एक तारा आहे. पृथ्वीपासून सर्वांत जवळचा हा तारा असल्याने त्याचा आकारही सर्वांत मोठा दिसतो. ब्रह्मांडातील ऊर्जेचा तो स्रोत आहे आणि तो नसता तर ही सृष्टीच जिवंत राहू शकली नसती हेही तितकेच खरे आहे. सूर्य म्हणजे खरे तर हायड्रोजन, हेलियम आदी वायूंचा एक जळता गोळा आहे. तेथे सतत अगणित घटना घडत असतात, ज्यांचा एकूणच सृष्टीवर परिणाम होत असतो. तेथे होणारी ही सौर चुंबकीय वादळे, विस्फोट ह्या सगळ्याचा अभ्यास करण्यासाठी ‘आदित्य’ अंतराळात प्रयाण करणार आहे. पृथ्वीपासून सूर्याचे अंतर आहे 15 कोटी किलोमीटर. त्याच्या केवळ एक टक्का म्हणजे पंधरा लाख किलोमीटर अंतरावरील लँगरेज बिंदूवर हे यान स्थिर राहणार आहे. कोणत्याही ग्रहांभोवती अशी पाच ठिकाणे असतात, जेथे त्यांच्या गुरुत्वाकर्षणीय शक्तीचा परिणाम तेथे स्थिर असलेल्या गोष्टीवर होत नसतो. अठराव्या शतकातील सुविख्यात इटालियन गणिती जोसेफ लुईस लँगरेज यांच्या नावे हे पाच बिंदू ओळखले जातात. पृथ्वी आणि सूर्य या दरम्यानच्या अशा एल 1 नामक एका बिंदूवर आपले ‘आदित्य’ स्थिर राहील व तेथून विनाअडथळा सतत सूर्यावर नजर ठेवील. अर्थात, तेथवर जायलाच त्याला चार महिने लागणार आहेत, कारण चंद्रयान प्रमाणेच हे यानही अंडाकृती वळसे घेत घेत तेथवर जाणार आहे. त्याचा हा मार्गच अत्यंत गुंतागुंतीचा आहे. त्यासाठी छोटे, परंतु अतिशय सक्षम असे ‘लॅम’ हे इंजिन वापरले जाणार आहे. ‘लॅम’ म्हणजेच लिक्वीड ॲपॉजी मोटर हे आदित्य एल 1 पाशी स्थिर करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. 2014 ची मंगलयान मोहीम असो अथवा नुकतीच यशस्वी झालेली चंद्रयान 3 मोहीम असो, त्यात ह्या इंजिनांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पीएसएलव्ही – एक्सएल प्रक्षेपकाद्वारे आदित्य अंतराळात पाठवले जाईल. एकदा का ते पृथ्वीच्या प्रभावक्षेत्राबाहेर पोहोचले की, हे इंजिन चार महिने बंद ठेवले जाईल. यान आपल्या लक्ष्यस्थळी पोहोचले की एल 1 मध्ये ते स्थिर करण्यासाठी त्याचा वेग मंदावण्यासाठी हे इंजिन पुन्हा झोपेतून जागे करावे लागणार आहे आणि ती कसोटीची वेळ असेल. यान एकदा का त्या ठिकाणी पोहोचले की आपली ही अंतराळस्थित सौर वेधशाळा सतत सूर्यावर नजर ठेवील व त्याचा अभ्यास करील. त्यासाठी ज्यांना मोघमपणे पे-लोडस्‌‍ संबोधले जाते अशी सात वेगवेगळी उपकरणे त्यावर बसवण्यात आलेली आहेत. दूरनियंत्रित आणि यथास्थान अशा दोन्ही प्रकारची ही उपकरणे सूर्याचा कसोशीने अभ्यास करतील. सौरवादळे आणि तेथील इतर घटनांचा परिणाम अवघ्या सृष्टीवर होत असलेला आपण नेहमी पाहतो. पृथ्वीभोवती संरक्षक कवच असल्याने आपल्याला त्याचा थेट उपद्रव सहसा होत नाही, परंतु तरीही उपग्रहांचे कार्यान्वयन, रेडिओ सिग्नल, पॉवर ग्रीडस्‌‍ वगैरेंवर ह्या सौर घडामोडींचा परिणाम अधूनमधून होत असतो. आपल्या वेधशाळा ज्याप्रमाणे हवामानाचा आगाऊ अंदाज वर्तवतात व आपण पुरेशी काळजी घेऊ शकतो, तशाच प्रकारे ह्या सौर घडामोडींची आगाऊ माहिती जर मिळू शकली, तर ती अतिशय उपयुक्त ठरेल ह्या भूमिकेतूनच ही सौर वेधशाळा भारत अंतराळात रवाना करणार आहे. सौर वातावरण, तेथील चुंबकीय वादळे, पर्यावरणीय परिणाम ह्या सगळ्याचा अभ्यास यातून होईल व तो अखिल मानवजातीला उपकारकच ठरेल. आपल्या अवकाश मोहिमांचे उद्दिष्टच मुळात ह्या नव्याने संपादिल्या जाणाऱ्या ज्ञानाचा फायदा मानवजातीला व्हावा हे आहे. इतर महासत्तांप्रमाणे आपण स्वार्थी हेतूंनी अशा मोहिमा आखत नाही. त्यामुळे आदित्य एल 1 मागेही हीच उदात्त भावना आहे हे लक्षात घेणे जरूरी आहे. सूर्याचे वय किमान साडेचार अब्ज वर्षे असावे असे म्हटले जाते. म्हणूनच तर तो आदित्य आहे. त्याच्या रहस्याचा शोध घ्यायला भारताचा हा आधुनिक अंजनीपुत्र उद्या निघणार आहे. त्याला त्यासाठी शुभेच्छा देऊया आणि यशाची कामना करूया!