आजपासून मासेमारी मोसमास सुरुवात

0
10

>> एलईडीद्वारे मासेमारीवर बंदी

>> मच्छीमारमंत्री हळर्णकर यांची माहिती

राज्यातील मच्छीमारी मोसम आज १ ऑगस्टपासून सुरू होत असल्याची माहिती काल मच्छीमारी खात्याचे मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी दै. नवप्रभाशी बोलताना दिली.

गेल्या १ जूनपासून राज्यात मच्छीमारी बंदीचा काल सुरू झाला होता. तेव्हापासून राज्यातील सर्व मच्छीमारी जेटींना मच्छीमारी खात्याने सील ठोकले होते. आता ह्या जेटी खुल्या करण्यात आल्या असून आज १ ऑगस्टपासून राज्यातील सुमारे हजारभर मच्छीमारी ट्रॉलर्स मच्छीमारी करण्यासाठी खोल समुद्रात जाणार असल्याचे हळर्णकर यांनी स्पष्ट केले.

१ जूनपासून लागू करण्यात आलेली मच्छीमारी बंद ३१ जुलै रोजी संपली. ह्या दोन महिन्यांच्या काळात फक्त छोट्या बोटींवर (मोटर नसलेल्या) समुद्रात मच्छीमारीसाठी जाण्यास परवानगी होती. तसेच रापणकारांनाही पारंपरिक पद्धतीने किनार्‍यापासून जवळ मच्छीमारी करण्यास परवानगी होती. जून ते जुलै हे महिने मासळीचे अंडी घालण्याचे दिवस असून त्यामुळे या काळात मच्छीमारीवर बंदी घालण्यात येत असल्याचे मंत्री हळर्णकर यांनी स्पष्ट केले. यंदाच्या मोसमात मासळीचे चांगले पीक येईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

वास्को जेटीवर तयारी पूर्ण
आजपासून मासेमारी बंदी उठत असल्यामुळे वास्कोतील व्यावसायिकांनी जेटीवर मासेमारीची तयारी पूर्ण केली आहे. राज्यातील अनेक मासेमारी जेटीवर दुरूस्तीसाठी ठेवलेल्या ट्रॉलर दुरूस्त करून आजपासून मासेमारीला सुरूवात करणार आहे. दि. १ ऑगस्ट रोजी गोव्यातील सर्व मासेमारी जेटीवरून ट्रॉलर खोल समुद्रात मासेमारीसाठी निघणार आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर नसल्याने तसेच तापमानात वाढ झाल्याने मासेमारी व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. वास्को खारीवाडा जेटीवर मासेमारीसाठी सर्व ट्रॉलर तयार असून साहित्य भरण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. झारखंड, ओरिसा, कारवार, होन्नावर, रत्नागिरी व इतर ठिकाणाहून मासेमारी करण्यासाठी लागणारे कामगार गोव्यात दाखल होऊन जेटीवर रूजू झाले आहेत.

एलईडीद्वारे मच्छीमारीवर बंदी
राज्यात एलईडी दिव्यांचा मच्छीमारीसाठी वापर करण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली असल्याची माहितीही हळर्णकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.

आजपासून सुरू होणार्‍या मासेमारीत एलईडी दिव्यांचा वापर करू नये म्हणून गेल्या आठवड्यात उच्च न्यायालयात पुन्हा एकदा बिगर सरकारी संस्थेमार्फत याचिका दाखल करण्यात आली आहे. गोव्यात गेल्या अनेक वर्षापासून एलईडी दिव्याचा मासेमारीसाठी उपयोग करणे गुन्हा असून जर एखाद्याने मासेमारी करताना एलईडीचा उपयोग केल्यास न्यायालयामार्फत कडक कारवाई करण्यात येणार आहे.