आकाशाशी जडले नाते भूमिकन्येचे

0
8

संस्कार रामायण

  • प्रा. रमेश सप्रे

जनक राजा शेत नांगरत असताना सापडलेली सीता ही कृषिप्रधान भारताची कन्या आहे, तर राम हा ऋषिप्रधान भारतीय संस्कृतीचा रक्षक आहे. दोघांच्या एकत्र येण्यात भारतीय जीवनपद्धतीचे दर्शन आहे. रामायण हा या दर्शनाचाच ग्रंथ आहे.

गीतरामायणातील अनेकांच्या ओठावर असलेल्या गीताचा आरंभ होतो- ‘आकाशाशी जडले नाते धरणीमातेचे…’ एकदम लक्षात येत नाही की हे नाते जावई नि सासू (म्हणजेच जामात आणि श्वश्रू) यांचे आहे. म्हणून लगेच म्हटले जाते- ‘स्वयंवर झाले सीतेचे.’
विश्वामित्रांच्या यज्ञाचे रक्षण नि अहल्येचा उद्धार या प्रसंगांनंतरचा महत्त्वाचा प्रसंग म्हणजे सीतास्वयंवर. म्हणून आपण म्हटलंय- ‘आकाशाशी जडले नाते भूमिकन्येचे.’ अनंत, असीम आकाशासारखा राम आणि सुजलाम्‌‍ सुफलाम्‌‍ सीता यांचे लग्न म्हणजे निसर्गातील दोन महाशक्तींचे संलग्न होणे आहे. सीताराम म्हणताना आपण प्रपंच नि परमार्थ यांच्या संगमाचा उल्लेख करत असतो. असो.

विश्वामित्र ऋषींचे श्रीरामाच्या जीवनातील कार्य तीनचार घटनांपुरतेच मर्यादित असले तरी भावी काळातील ‘मर्यादापुरुषोत्तम’ रामाच्या अवतारकार्याचा तो पाया आहे. पहिली घटना म्हणजे ताटका (त्राटिका) वध. यावेळी रामाला विश्वामित्रांनी शस्त्रास्त्रंसज्ज केलं नव्हतं. त्यानंतर महत्त्वाचे कार्य होते विश्वामित्रांच्या यज्ञाचे रक्षण. त्यासाठी विश्वामित्रांनी रामाला विधिपूर्वक विविध शस्त्रे-अस्त्र-विद्या-शक्ती यांचे शिक्षण दिले. त्यात रामाला नि रामाच्या माध्यमातून लक्ष्मणाला राक्षससंहार नि यज्ञसंस्कृतीचे रक्षण- त्यासाठी ऋषींचे परित्राण (रक्षण) करण्याचे सामर्थ्य प्राप्त झाले. पुढे आठ दिवस चाललेल्या यज्ञाला हाडंमांस टाकून भ्रष्ट करणाऱ्या नि ऋषी-ऋषिकुमार यांना मारून यज्ञाचा विद्ध्वंस करणाऱ्या असंख्य राक्षसांचे निर्दालन रामलक्ष्मणांनी समर्थपणे केले.
आनंदित झालेल्या ऋषींनी भरभरून आशीर्वाद दिल्यावर विश्वामित्र विदेहराज जनकाकडे असलेल्या भव्य नि दिव्य शिवधनुष्याचे दर्शन घेण्यासाठी मिथिला नगरीत रामलक्ष्मणासह आले.

परशुरामांकडे दोन धनुष्ये होती. शिवधनुष्य नि वैष्णवधनुष्य. विष्णूचा अवतार असलेल्या परशुरामांनी उन्मत्त क्षत्रिय राजांचा (सर्व क्षत्रियांचा नव्हे) संहार करण्याकरिता परशू वापरण्यासाठी शिवधनुष्य आपला मित्र देवराज जनक या राजाकडे ठेवले. परंपरेने ते जानकीचे पिता असलेल्या जनक राजाकडे आले. सीतेचे तेज नि सामर्थ्य पाहिल्यावर जनकाने तो कठोर ‘पण’ केला- ‘जो हे भव्य शिवधनुष्य उचलून त्याला प्रत्यंचा (धनुष्याची दोरी) जोडेल त्याच्या गळ्यात सीता वरमाला घालेल.’ अंतर्ज्ञानाने विश्वामित्रांनी भावी घटना ओळखली होती. म्हणूनच त्यांचे श्रीरामलक्ष्मणासह हे मिथिला आगमन होते.

विविध रामायणात हा प्रसंग वेगवेगळ्या प्रकारे वर्णन केला जातो. सीतेचे स्वयंवर या भव्य सोहळ्याचे आयोजन जनकाने केलेय. त्यात अनेक राजे सहभागी झाले आहेत. अगदी रावणसुद्धा आलाय. अनेक सेवकांच्या मदतीने ते शिवधनुष्य राजसभेत आणून ठेवले जाते. बहुतेक सर्व राजांना ते हलवणे-उचलणे जमत नाही. बलाढ्य रावण ते उचलतो पण ते त्याला धरता न आल्याने त्याच्या छातीवर पडते नि रावण रक्त ओकायला लागतो. अनेक सेवक धावत येऊन ते धनुष्य हटवून रावणाची सुटका करतात. असे वर्णन अनेक ठिकाणी येते.
पण वाल्मीकी रामायणानुसार केव्हाही कुणाही वीराला येऊन आपल्या सामर्थ्याची परीक्षा देता येत होती. श्रीरामाने अशाच प्रकारे ते शिवधनुष्य उचलून त्याला प्रत्यंचा जोडण्यासाठी वाकवल्यावर काडकन्‌‍ तुटून त्याचे दोन तुकडे होतात. निरागस राम अपराधी भावनेने उपस्थित मंडळींकडे पाहतो. पण जनकाचा ‘पण’ पुरा झाल्याने सीता-रामाचा विवाह निश्चित होतो. पण तो पार पाडला अयोध्येतून राजघराण्यातील सारी मंडळी, ऋषी, मंत्री, अमात्य असे सारे विद्वज्जन आल्यावर. सर्वानुमते जनकाच्या सीता नि ऊर्मिला तसेच त्याचा भाऊ कुशध्वज याच्या मांडवी नि श्रुतकीर्ती अशा चारही राजकन्यांचे विवाह अनुक्रमे श्रीराम- लक्ष्मण- भरत- शत्रुघ्न यांच्याशी केले गेले. ते संपन्न झाल्यावर अयोध्येचा परतीचा प्रवास सहजसुखरूप न होता त्यात एक वरवर आपत्ती वाटणारी पण प्रत्यक्षात महान असलेली घटना घडणार होती. त्याबद्दल पुढे पाहू.
तसे पाहिले तर वरवर सामान्य वाटणाऱ्या या सीता-राम यांच्या विवाहप्रसंगात अनेक संस्कार दडलेले आहेत. ते स्वीकारले मात्र पाहिजेत.

  • सीता नि राम ही जर प्रपंच-परमार्थाची प्रतीकं मानली तर समृद्ध जीवनाची जोपासना भूमिकन्या सीता करते तर श्रीराम हा जीवनाच्या सार्थकतेसाठी आवश्यक असलेल्या उपासनेचे प्रतीक नि प्रेरणा आहे.
  • गंगा आकाशातून अवतरत असताना तिला धारण करण्यासाठी ‘गंगाधर शंकराची’ आवश्यकता असते, तशीच ती मूर्तिमंत शक्ती असलेल्या सीतेचे रक्षण करणाऱ्या रामाचीही असते.
  • सीता-रामाचे वैवाहिकच नव्हे तर एकूणच जीवन नियतीच्या इच्छेनुसार मीलन- वियोग- विरह- मीलन अशा लाटांसारखे आहे. आपले जीवनही असेच नसते का?
  • अशाच अर्थाचा सर्वांच्या जीवनाला लागून असलेला सिद्धांत गीतरामायणातील सर्वप्रिय असलेल्या गीतात रामाच्या तोंडून व्यक्त झालाय- ‘वियोगार्थ मीलन होते नेम हा जगाचा.’ ही अटळ वस्तुस्थिती आनंदाने स्वीकारण्यातच जीवनाची धन्यता आहे.
  • श्रीराम हा विष्णुभगवानाचा त्रेतायुगातील अवतार आहे, तर सीता ही भूमिकन्या असल्याने विष्णुपत्नी आहे. या दृष्टीने ‘सीता-राम’ हा संपूर्ण ‘जीवन-योग’ आहे. ‘सीता’ या शब्दात नांगराचा फाळ हा अर्थ गर्भित आहे. जनक राजा शेत नांगरत असताना सापडलेली सीता ही कृषिप्रधान भारताची कन्या आहे, तर राम हा ऋषिप्रधान भारतीय संस्कृतीचा रक्षक आहे. दोघांच्या एकत्र येण्यात भारतीय जीवनपद्धतीचे दर्शन आहे. रामायण हा या दर्शनाचाच ग्रंथ आहे.