Home बातम्या आईच्या मृत्यूस कारणीभूत;मुलाला सश्रम कारावास

आईच्या मृत्यूस कारणीभूत;मुलाला सश्रम कारावास

0

दारूच्या नशेत आपल्या आजारी आईला अमानुष मारहाण करून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी मुलगा संदीप वेर्लेकर याला सहा वर्षे सहा महिन्यांची सश्रम कारावासाची शिक्षा उत्तर गोवा जिल्हा सत्र न्यायालयाने काल सुनावली. न्यायाधीश ईर्शाद आगा यांनी हा निवाडा दिला. आरोपी संदीप वेर्लेकर हा 18 नोव्हेंबर 2019 रोजीच्या रात्री 8 वाजता मद्यधुंद अवस्थेत घरी आला. त्यानंतर त्याने आजारी आई लक्ष्मीबाई हिला मद्याच्या नशेत बेदम मारहाण केली. त्यावेळी तिने आरडाओरडा केल्यानंतर घरातील इतर सदस्य धावत आले, त्यावेळी आरोपी तिथेच होता. यानंतर तिला बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले, तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी शवचिकित्सा अहवाल हाती आल्यानंतर जुने गोवे पोलिसांनी आरोपी संदीप वेर्लेकर याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. तपास पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. न्यायालयाने प्रथमदर्शनी पुराव्यांची दखल घेऊन आरोप निश्चित करून खटला सुरू केला. या प्रकरणी न्यायालयात सबळ पुराव्यांची दखल घेऊन संदीप वेर्लेकर याला सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली दोषी ठरवले होते. त्यानंतर काल न्यायालयाने त्याला शिक्षा सुनावली.