असमाधानकारक

0
15

गेले काही दिवस देशाचे लक्ष खिळून राहिलेल्या पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताची कामगिरी अखेर पाच कांस्यपदके आणि तूर्त तरी एका रौप्य पदकापुरती सीमित उरली आहे. विनेश फोगाटला तिच्या हक्काचे रौप्यपदक जर बहाल झाले, तर टोकयो ऑलिम्पिकमधील सात पदकांशी बरोबरी साधली जाईल. भारतासारख्या एकशे चाळीस कोटी लोकसंख्येच्या विशाल देशाची क्रीडापंढरीतील ही कामगिरी समाधानकारक निश्चित नाही. छोट्या छोट्या देशांतून येणारे खेळाडू ज्या आक्रमकपणे खेळतात, त्या तुलनेत आपले स्पर्धक जरासे अपयश येताच निराशेने झाकोळले जातात आणि आपला आत्मविश्वास गमावून पुढील स्पर्धेत अधिक खराब कामगिरी करताना दिसतात. खरे तर यावेळी ऑलिम्पिकमध्ये मनू भाकरने आपले आणि देशाचे खाते खोलले होते, तेव्हा फार मोठ्या अपेक्षा जागल्या होत्या. किमान टोकयो ऑलिम्पिकमधील सात पदकांपेक्षा अधिक सरस कामगिरी तरी यंदा नक्कीच दिसेल अशी अपेक्षा होती. परंतु ते घडले नाही. मनू भाकरने आधी 10 मीटर एअर पिस्टलमध्ये आणि नंतर सरबजित सिंगसमवेत अशी एकूण दोन कांस्यपदके प्राप्त करून तिस़ऱ्या पदकाच्या दिशेनेही वाटचाल सुरू केली होती. परंतु दुर्दैवाने तिला पंचवीस मीटर एअर पिस्टलमध्ये चांगली कामगिरी करूनही शेवटी घडलेल्या चुकीमुळे चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. मराठमोठ्या स्वप्नील कुसाळेने पन्नास मीटर रायफल गटात कांस्यपदक पटकावून भारताला आणखी एक सन्मान मिळवून दिला. भालाफेकीत नीरज चोप्राकडून यंदा सुवर्णपदकाची अपेक्षा होती, परंतु तो सन्मान पाकिस्तानने आपल्याकडून हिरावून घेतला. नीरजला रौप्यपदकावर समाधान पत्करावे लागले. एकेरी बॅडमिंटनमध्ये लक्ष्य सेनने देशाच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. परंतु नंतर त्याची कामगिरी ढासळली आणि तो चौथ्या स्थानावर राहिला. भारताच्या पुरूष हॉकी संघाने डोळ्यांचे पारणे फेडणारा खेळ केला आणि देशाच्या अपेक्षा जागवल्या. परंतु थरारक सामन्याअंती पत्कराव्या लागलेल्या पराभवामुळे त्यांचे रौप्य किंवा सुवर्णपदकावर दावेदारी करण्याचे स्वप्न भंगले. शेवटी स्पेनला पराभूत करून त्यांनी कांस्यपदक मात्र मिळवले. अमन सेहरावतचे कांस्यपदक जमेस धरता भारताला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एकूण पाच कांस्यपदके प्राप्त झाली. खरी दुर्दैवी स्पर्धक ठरली ती विनेश फोगाट. ज्या तऱ्हेने तिने गेल्यावेळच्या विश्वविजेतीला धूळ चारून यशाकडे झेप घेतली होती, त्या आनंदावर तिचे वजन केवळ शंभर ग्रॅम अधिक भरल्याने पाणी पडले. विनेशच्या अपात्रतेने संपूर्ण देश हळहळला. आता तिच्या रौप्यपदकावरील दावेदारीचा निर्णय आंतरराष्ट्रीय क्रीडा न्यायालयात प्रलंबित आहे आणि हा निर्णय आता 13 तारखेच्या रात्रीपर्यंत प्रलंबित उरल्याने तिला तिच्या हक्काचे रौप्यपदक बहाल होईल अशी आशा जागली आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आपल्या अनेक स्पर्धकांना चौथ्या स्थानी राहावे लागले. मीराबाई चानू, लक्ष्य सेन, अंकिता भगत आणि धीरज बोम्मनदेवरा, अर्जुन बबुता, अनंतजीतसिंग नरूका महेश्वरी चौहान हे सारे स्पर्धक चौथ्या स्थानी राहिले. इतिहास सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदक विजेत्यांची आठवण ठेवत असतो. चौथ्या स्थानावरील स्पर्धकांची नावे क्वचितच लक्षात राहतात, परंतु आपले चौथ्या स्थानापर्यंत झेप घेऊन नंतर मागे का राहतात, ते कुठे कमी पडतात यावर विचार होण्याची आवश्यकता आहे. ऑलिम्पिकची तयारी करणाऱ्या स्पर्धकांवर सरकार कोट्यवधींचा खर्च करीत असते. त्यांना विदेशांत प्रशिक्षण दिले जाते, विदेशी प्रशिक्षकांचे मार्गदर्शन मिळवून दिले जाते, त्यांच्यासाठी सगळे काही केले जाते, परंतु तरीही आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या गुणवत्तेच्या तुलनेत त्यांची कामगिरी मागे का पडते ह्याचाही विचार झाला पाहिजे. त्यांच्या मनोवृत्तीत ती आक्रमकता का दिसत नाही, अल्पावधीत ते निराश का होतात, त्यांची कामगिरी का ढासळते, पुरेशा सरावाचा, तांत्रिक सुविधांचा त्यांना अभाव असतो का ह्या सगळ्या बाबींचा तटस्थपणे विचार झाला पाहिजे. भारत सरकार तर येत्या काही वर्षांमध्ये आपल्या देशात ऑलिम्पिक भरवण्याच्या विचारात आहे. 2036 ची तारीख त्यासाठी मुक्ररही करण्यात आलेली आहे. परंतु एवढी मोठी स्पर्धा भरवून त्यात शेवटी जेमतेम कांस्यपदकांवरच समाधान मानावे लागणार असेल, तर करदात्यांचे अब्जावधी रुपये खर्चून ही स्पर्धा का भरवावी असे म्हणणाऱ्यांचे म्हणणे विचारात घेणे भाग पडेल. पॅरिस ऑलिम्पिक पाहताना असे लक्षात आले की असे किमान वीस क्रीडाप्रकार आहेत, ज्यामध्ये भाग घेण्यास भारतीय स्पर्धक अभावानेच पात्र ठरले आहेत. रोईंग, सेलिंग, गोल्फ, इक्वेस्ट्रियन, ज्युदो, जिम्नॅस्टिक्ससारख्यांमध्ये भारताचा सहभाग दिसू लागला आहे ही आश्वासक बाब आहे, परंतु वॉलिबॉल, बास्केटबॉल, कराटे, फुटबॉलसारख्या वीस क्रीडाप्रकारांत भारत ऑलिम्पिकसाठी पात्र ठरू शकत नाही हे आश्चर्यजनक आहे व त्यावरही विचार व्हायला हवा. एकंदरीत पॅरिस ऑलिम्पिकने देशाला, देशाच्या क्रीडाक्षेत्राला आरसा दाखवला आहे. दिसणाऱ्या त्रुटी शोधून दूर सारण्यासाठी आता कंबर कसावी लागेल.