अविश्वासातून वाद

0
20

इस्लामिक स्टुडंटस्‌‍ ऑर्गनायझेशन या संस्थेच्या ‘मशीद दर्शन’ उपक्रमातून वास्कोमध्ये अकारण धार्मिक तणाव निर्माण झाला. वास्कोतील उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थिनींना मशिदीत नेऊन धार्मिक विधी करायला लावल्याचा व हिजाब घालायला लावल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केल्याने संबंधित उच्च माध्यमिक विद्यालयाच्या व्यवस्थापनाने त्यापासून हात झटकत तडकाफडकी प्राचार्यांवर निलंबनाची कारवाई केली, तर शिक्षण खाते आता संबंधित व्यवस्थापनावरच कारवाई करण्याच्या तयारीत आहे. एकूणच हा जो काही प्रकार झाला तो अत्यंत दुर्दैवी आणि विविध धर्मियांत परस्परांविषयी अधिकच अविश्वासाचे वातावरण निर्माण करणारा ठरला आहे. प्रत्यक्षात मशिदीमध्ये नेलेल्या विद्यार्थिनींकडून खरोखरीच धार्मिक विधी करून घेतले गेले का, त्यांना हिजाब घालायला भाग पाडले का, ह्या आरोपांची व्यवस्थित शहानिशा झाली पाहिजे. अर्धवट माहितीच्या आधारे अफवा पसरवल्या गेल्या तर त्यातून सामाजिक, धार्मिक अविश्वासाचे वातावरण अधिक कलुषित होण्याखेरीज दुसरे काही भले निष्पन्न होणार नाही. ‘मशीद दर्शन’ हा उपक्रम केवळ इस्लामिक स्टुडंटस्‌‍ ऑर्गनायझेशनच नव्हे, तर जमाते इस्लामी देखील आयोजित करते आणि मडगावात आयोजित अशाच प्रकारच्या कार्यक्रमात गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई, मडगावचे नगराध्यक्ष आदीही सहभागी झाले होते. परंतु लोकप्रतिनिधींना किंवा आम नागरिकांना ‘मशीद दर्शन’ कार्यक्रमासाठी नेणे वेगळे आणि अल्पवयीन विद्यार्थी – विद्यार्थिनींना अशा उपक्रमामध्ये सहभागी करून घेणे वेगळे. अशा उपक्रमामागील हेतू कितीही उदात्त असो, समाजामध्ये आधीच परस्पर अविश्वासाचे वातावरण असताना आणि ‘लव्ह जिहाद’सारखे गंभीर आरोप सातत्याने होत असताना, पालकांच्या परवानगीविना विद्यार्थिनींना अशा प्रकारच्या बिगर-शैक्षणिक उपक्रमासाठी परस्पर पाठवण्याची संबंधित उच्च माध्यमिक विद्यालयांची कृती समर्थनीय ठरत नाही. शिक्षण खात्यातर्फे एखादे परिपत्रक आले असेल, तर त्या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना पाठवणे संबंधित शैक्षणिक संस्थांना क्रमप्राप्तच असते. मात्र, एखाद्या तिसऱ्याच संस्थेकडून करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत जेव्हा परस्पर विद्यार्थ्यांना पाठवले जाते, तेव्हा तेथे काही अनुचित प्रकार होणार नाही वा त्यातून काही आक्षेपार्ह प्रसंग उद्भवणार नाही, अफवा पसरवल्या जाणार नाहीत, हे पाहण्याची संपूर्ण जबाबदारीही संबंधित शैक्षणिक संस्थेची होती. विद्यार्थी विद्यार्थिनींना अशा उपक्रमासाठी पाठवताना मुळात त्यांच्या पालकांची परवानगी घेतली होती का, हाही प्रश्न अर्थातच उपस्थित होतो. विविध धर्मियांमध्ये सलोख्याचे आणि प्रेमाचे नाते असायला हवे ह्यासाठी कोणी प्रामाणिकपणे प्रयत्नशील असेल तर ते गैर म्हणता येत नाही, वा त्याकडे संशयाने पाहणेही योग्य ठरणार नाही, परंतु तसा विश्वास इतरांना वाटणेही तितकेच महत्त्वाचे असते. मुळात आधीच सामाजिक वातावरण कलुषित असताना अशा प्रकारच्या उपक्रमाकडे सरसकट संशयाने पाहिले गेले तर त्यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. धर्म ही आजच्या काळामध्ये विलक्षण संवेदनशील गोष्ट बनलेली आहे. धार्मिक भावना दुखावण्यासाठी एखादे क्षुल्लक कारणही पुरेसे ठरते. अशा वेळेस ‘मशीद दर्शना’सारख्या उपक्रमाचे आयोजन करणाऱ्यांनी त्यातून भलत्या वादाला तोंड फुटणार नाही याची काळजी घेणेही तितकेच आवश्यक होते. अशा उपक्रमाचे आयोजन करणाऱ्या संस्थेने थेट शैक्षणिक संस्थेशी संपर्क साधण्याऐवजी वास्तविक शिक्षण खात्याशी संपर्क साधून ह्या उपक्रमाची सविस्तर माहिती देणे व त्याविषयी आधी जनजागृती करणे अधिक योग्य ठरले असते. मात्र, त्याऐवजी थेट उच्च माध्यमिक विद्यालये व विद्यालयांशी संपर्क साधला गेला व त्यामुळे त्याविषयी पालकांत संशयाचे आणि अविश्वासाचे वातावरण अकारण निर्माण झाले. त्यामुळे या उपक्रमाचा मूळ हेतूच संशयाच्या घेऱ्यात सापडला. टाळी कधी एका हाताने वाजत नसते. दोन्ही हात त्यासाठी एकत्र आले तरच टाळी वाजते. त्याचप्रमाणे अशा प्रकारच्या मनोमीलनाच्या उपक्रमांच्या यशस्विततेसाठी मुळामध्ये समाजात विविध धर्मियांत परस्पर अविश्वासाचे जे वातावरण आहे ते आधी दूर व्हावे लागेल. एकमेकांविषयी आधी विश्वास वाटणे त्यासाठी आत्यंतिक जरूरी आहे. तोच नसल्याने ‘करायला गेलो एक आणि झाले भलतेच’ असा प्रकार घडला. अशा प्रकारचा उपक्रम आयोजित करीत असताना त्यातून विपरीत अर्थ काढला जाणार नाही, मूळ उद्देशाला हरताळ फासला जाणार नाही ना याची काळजी संबंधितांनी घेतली असती तर परस्पर अविश्वासातून उफाळलेला हा वाद नक्कीच टळू शकला असता.