राज्यसभेतील भाषणात विविध मुद्द्यांवरून काँग्रेसवर डागले टीकास्त्र; सरकारच्या कामांचाही घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काल राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर भाषण झाले. लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या भाषणावेळी सत्ताधाऱ्यांनी अडथळे आणल्याने काल पंतप्रधानांचे भाषण सुरू होताच विरोधी पक्षांनी जोरदार गोंधळ घातला आणि राज्यसभेतून सभात्याग केला. यावेळी पंतप्रधानांनी आपल्या भाषणात भारताने अलीकडच्या काळात केलेल्या व्यापार करारांवर भाष्य केले. भारत अनेक देशांशी व्यापार करारांवर वाटाघाटी करत आहे. अलीकडच्या काळात, त्याने 9 प्रमुख देशांशी, युरोपियन युनियन, अमेरिका अशा एकूण 127 देशांशी व्यापार करार केले आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.
काल राज्यसभेत पंतप्रधान मोदींचे भाषण सुरू होताच राज्यसभेत विरोधी पक्षाच्या खासदारांनी ‘तानाशाही नही चलेगी’ अशी घोषणाबाजी केली. त्यावर, मोदींनी काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांना टोला लगावला. आदरणीय खर्गेची तुमचे वय लक्षात घेता तुम्ही खाली बसूनच नारेबाजी करावी, इथे तरुण खासदारही आहेत, असे म्हणत खर्गेंना टोला लगावला. त्यानंतर, विरोधकांनी राज्यसभेतूनही सभात्याग केल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतरही मोदींनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली.
भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा जगातील 6 व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होता. मात्र, काँग्रेसने देशाची अर्थव्यवस्था 10 व्या क्रमांकावर नेऊन ठेवली होती; पण, विश्वकल्याणाचा मार्ग स्वीकारत आज आपण तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आहोत. काँग्रेसमुळे देशाची जी प्रतिमा बनली होती, ती प्रतिमा पुसण्यातच अधिक मेहनत खर्ची होत असल्याचे मोदी म्हणाले.
राज्यसभेत बोलताना पंतप्रधान मोदी काँग्रेसला लक्ष्य करताना म्हणाले की, आम्ही विकसित भारतासाठी जमीन तयार करत आहोत, तर काँग्रेस मोदींसाठी खड्डा खोदण्याचे काम करत आहे. ‘मोहब्बत की दुकान’ उघडणारे, ‘मोदी तेरी खब्र खुदेगी’ अशा घोषणा देत आहेत. देशातील नागरिकांसाठी खड्डा खोदण्याचे बोलणारे हे कोणते प्रेमाचे दुकान आहे, अशी टीका त्यांनी केली.
लाल किल्ल्यावरून काँग्रेस पंतप्रधानांची जुनी भाषणे ऐका. त्यांच्याकडे कोणताही विचार नव्हता, दृष्टी नव्हती आणि इच्छाशक्ती नव्हती, अशी बोचरी टीका मोदींनी केली. देश आज वेगाने विकास करत आहे. आपण एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर पोहोचत आहोत. आपण आता ना थांबायचे, ना मागे वळून पाहायचे. उद्दिष्ट गाठल्याशिवाय विश्रांती नाही, असे मोदी म्हणाले.
मल्लिकार्जुन खर्गे यांनीही केली टीका
केंद्र सरकार विरोधकांचा आवाज दाबत असून देशाच्या महानायकांचा अपमान करणाऱ्यांना अभय देत आहे, असा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला. मोदी सरकारने जणू काही ठरवूनच टाकले आहे की दोन्ही सभागृहांच्या विरोधी पक्षनेत्यांना बोलू द्यायचे नाही. लोकशाहीत जर विरोधी पक्षनेत्यालाच बोलू दिले जात नसेल, तर हा संसदेचा अपमान आहे. असे यापूर्वी कधीही घडले नव्हते, असे खर्गे म्हणाले.
प्रश्नांच्या भीतीमुळे मोदींकडून असत्याचा आसरा : राहुल गांधी
यावेळी अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरताना दिसत आहे. माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे पुस्तक आणि एपस्टिन फाईल्सच्या मुद्द्यावरून काँग्रेससह विरोधकांनी मोदी सरकारला पहिल्या दिवसांपासून घेरले आहे. पंतप्रधान मोदींच्या राज्यसभेतील उत्तरानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ‘एक्स’वरून पुन्हा खोचक टीका केली. फक्त प्रश्नांची इतकी भीती, मोदीजी सत्याला इतके घाबरले की असत्याचा आसरा घेतला. असो, त्यांना जे योग्य वाटले, ते त्यांनी केले, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.