अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस

0
139

>> जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी काल ८७ अर्ज दाखल

राज्यातील उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा या दोन्ही जिल्हा पंचायतीच्या ५० जागांसाठी आत्तापर्यंत १७८ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची गुरुवार ५ मार्च २०२० ही अंतिम तारीख आहे.

जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी काल बुधवार दि. ३ मार्चला ८२ उमेदवारांनी ८७ उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकार्‍यांसमोर दाखल केले आहेत. यात उत्तर गोव्यातून ४२ आणि दक्षिण गोव्यातून ४६ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. निवडणुकीसाठी आत्तापर्यंत १७८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यात उत्तर गोव्यातील २५ मतदारसंघात ९६ आणि दक्षिण गोव्यातील २५ मतदारसंघात ८२ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

कॉंग्रेसचे आणखी
९ उमेदवार जाहीर
गोवा प्रदेश कॉंग्रेस पक्षाने ९ उमेदवाराच्या नावांची घोषणा करणारी यादी बुधवारी जाहीर केली आहे. कॉंग्रेस पक्षाने उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या हळदोणा मतदारसंघात रूबी गोकुळदार हर्ळणकर, हणजूण मतदारसंघात संगीता लिंगुडकर, खोर्ली मतदारसंघात विशाल वळवईकर, सेंट लॉरेन्स मतदारसंघात ऍन्थोनी फर्नांडिस, मये मतदारसंघात प्रसाद चोडणकर यांना उमेदवारी दिली आहे.
दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या गिरदोली मतदारसंघात सोनिया फर्नांडिस, सावर्डे मतदारसंघात श्याम भंडारी, पैंगीण मतदारसंघात रेश्मा वेळीप, कुठ्ठाळी मतदारसंघात लुपिनो झेवियर यांना उमेदवारी दिली आहे.

खोर्लीतून भाजपतर्फे
सिद्धार्थ श्रीपाद नाईक
भारतीय जनता पक्षाने उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या खोर्ली मतदारसंघात केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचे चिरंजीव सिद्धेश नाईक यांना उमेदवारी काल जाहीर केली आहे. या खोर्ली मतदारसंघातील उमेदवारीवरून भाजपमध्ये चुरस लागली होती. भाजपने दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या कवळे मतदारसंघात जयराज अनंत नाईक याला उमेदवारी दिली आहे.

खर्च तपासणी निरीक्षकांची नियुक्ती
राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी पंधरा खर्च तपासणी निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. उत्तर गोव्यातील २५ मतदारसंघासाठी सहा खर्च तपासणी निरीक्षक आणि दक्षिण गोव्यातील २५ मतदारसंघासाठी ९ खर्च तपासणी निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

भावेश जांबावलीकर
यांचा राजीनामा
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय कार्यकारी सदस्य भावेश जांबावलीकर यांनी जिल्हा पंचायत निवडणुकीत उमेदवारी नाकारल्याने नाराज होऊन भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांच्या थिवी विधानसभा मतदारसंघातील कोलवाळ मतदारसंघातील भाजप उमेदवारीचा तिढा कायम आहे.

भाजपने कोलवाळ मतदारसंघातील उमेदवारी काल ४ मार्चला उशिरापर्यत जाहीर केलेली नाही.