- प्रा. रमेश सप्रे
ः जीवन संस्कार ः (उत्तरार्ध )
सध्या अनेकांना वाटते, नव्हे अनुभवाला येते तशी अरुणावस्थेतील मुलांची समस्या हा चिंतेचा नव्हे तर चिंतनाचा विषय आहे. म्हणून जीवनाच्या अंगाने आपण या अवस्थेतील संस्कारांवर सहचिंतन करूया.
समर्थ रामदास स्वामींचे एक प्रभावी जीवनसूत्र आहे-
सामर्थ्य आहे चळवळीचे। जो जो करील तयाचे।
परंतु तेथे भगवंताचे। अधिष्ठान पाहिजे॥
या ओवीत दोन शब्दप्रयोग अत्यंत अर्थपूर्ण आहेत- चळवळीचे सामर्थ्य आणि भगवंताचे अधिष्ठान. जीवनाच्या कोणत्याही अवस्थेत नि कोणत्याही क्षेत्रात या दोन सूत्रांचे मोठे महत्त्व आहे.
चळवळ म्हणजे केवळ वळवळ नव्हे. तिला एक ध्येय, एक दिशा असते. उदा. आपली स्वातंत्र्याची चळवळ. ही चळवळच जर नसती तर अजून किमान शंभर वर्षे आपण परकीयांच्या गुलामगिरीतच राहिलो असतो. चळवळीला सामर्थ्य येते ते तिच्या नेतृत्वामुळे. आपल्या जीवनाच्या नेतृत्वाचा विचार केला तर ‘आपणच असतो आपल्या जीवनाचे कर्णधार (कॅप्टन)’ नि कर्तृत्वाचा विचार केला तर ‘आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार.’
हेच तत्त्व भगवंताने गीतेत गोंधळलेल्या अर्जुनाला सांगितलेय- ‘तूच आहेस तुझा सर्वात वाईट शत्रू नि तूच आहेस तुझा सर्वात चांगला मित्र!’ …म्हणून ‘उद्धरेत् आत्मन् आत्मानम्’- तुझा उद्धार (उत्कर्ष, उन्नती) तूच केला पाहिजेस.
दासबोध, गीता यांतील संतवचनं ही सत्यवचनं आहेत. सर्व काळासाठी नि सर्व जीवनासाठी. याचा सर्वात सार्थ उपयोग ‘अरुणावस्थे’साठी आहे हे कुणालाही पटेल.
एक गोष्ट सदैव ध्यानात ठेवायची- सध्या अनेकांना वाटते, नव्हे अनुभवाला येते तशी अरुणावस्थेतील मुलांची समस्या हा चिंतेचा नव्हे तर चिंतनाचा विषय आहे. म्हणून जीवनाच्या अंगाने आपण या अवस्थेतील संस्कारांवर सहचिंतन करूया.
मानवी जीवनाचे पाच महत्त्वाचे पैलू आहेत. अरुणावस्थेत तर हे पैलू जास्त महत्त्वाचे बनतात. हे पैलू आहेत- शारीरिक, बौद्धिक, मानसिक, सामाजिक अन् आध्यात्मिक.
नव्या दृष्टिकोनातून यावर विचार करूया. आरंभीच्या सूत्रातील एक महत्त्वाचा शब्दप्रयोग होता- ‘भगवंताचे अधिष्ठान.’ आपण काही शब्दांचे समाजजीवनाच्या दृष्टीने अगदी वरवरचे अर्थ घेतो अन् यात अर्थ नाही, ते निरर्थक आहे, हे तर अगदी व्यर्थ आहे, असे आपले आपणच ठरवतो नि जीवनात अनर्थ घडवतो. असे दोन शब्द म्हणजे देव किंवा भगवंत नि धर्म. असो.
देव शब्दाचा अर्थ तीन तोंडे, सहा हात किंवा हत्तीचे-माकडाचे तोंड असा बिलकूल नाहीये. प्रतीकात्मक, अमूर्त कल्पनांची मूर्ती बनवताना या गोष्टी आल्या नि त्यावेळच्या सामान्यजनांसाठी त्या योग्य होत्या. या प्राथमिक पातळीवर न थांबता अरुणांनी (किशोरांनी) अधिक खोल चिंतन केले पाहिजे. यासाठी वाचन केले पाहिजे. आज सर्वत्र सामान्य झालेल्या इंग्रजी माध्यमातील अरुणांसाठी असे साहित्य म्हणजे पुस्तके इंग्रजीतून उपलब्ध असली पाहिजेत. सुदैवाने आपल्या कल्पनेपेक्षा कितीतरी अधिक पटीने अशी पुस्तके इंग्रजीत उपलब्ध आहेत आणि रोज यात लक्षणीय भर पडत आहे. दुर्दैव एकच, अरुणांना इकडे वळवण्यासाठी कमी पडताहेत समाजातील वडील मंडळी (एल्डर्स) म्हणजे घरात पालक नि विद्यालयात शिक्षक!
हेच पहा ना- ‘देव’ या शब्दाचा अर्थ आहे आतून बाहेर येणारा नि सर्वत्र पसरणारा ‘स्वयंभू’ प्रकाश. या प्रकाशाला बाहेरून इंधन लागत नाही. यालाच ‘अंतरीचा ज्ञानदिवा’ किंवा ‘आत्मदीप’ असं म्हणतात. देव- दिवा- दिवस- दिव्य या शब्दांचे मूळ एकच आहे.
याचप्रमाणे ज्याच्याकडे ‘भग’ खूप आहे तोच खरा भगवंत (जसा यशवंत, कलावंत) किंवा भगवान (जसा धनवान किंवा गुणवान- तशीच भगवती शक्ती). ‘भग’ म्हणजे यश, श्री (वैभव), वैराग्य, औदार्य, सौंदर्य, सामर्थ्य असे सर्व सद्गुण. यांच्या समग्र नि सर्वोच्च आविष्काराला किंवा रूपाला म्हणतात भगवान, भगवंत (किंवा भगवती)- अशा स्वरूपाचे अनेक उदाहरणे देऊन केलेले सहचिंतन अरुणांना- तरुणांना आवडतेच आवडते.
यासंदर्भात एका अरुणांच्या साहित्य (वाचन) संमेलनात एका अरुणीने (म्हणजे किशोरीने) व्यक्त केलेली व्यथा वाचण्यासारखी आहे-
‘बालसाहित्य म्हणून सरसकट प्राणी, पक्षी, राजा, राणी, राक्षस यांच्या गोष्टींची पुस्तके आणि कविता आमच्यासमोर ठेवल्या जातात. हे शिशू आणि बालकांसाठी ठीक आहे, पण कुमारांना (अरुणांना) विज्ञाननिष्ठ, विचार करायला लावणाऱ्या, नवनवीन विषय हाताळणाऱ्या साहित्याची ओढ असते. आम्हा कुमारवयीन मुलांसाठी असं साहित्य फारच कमी का? आम्ही किती काळ बालिश गोष्टी वाचणार?’
अगदी खरंय; अन् हे फक्त वाचनाबद्दलच नव्हे तर सर्व जीवनानुभवांसाठी खरं आहे. असो.
अरुणावस्थेतील सर्वांगीण जीवनविकासासाठी जे पाच पैलू आवश्यक आहेत त्यांवर संस्कारांच्या दृष्टीने विचार करूया-
- शारीरिक पैलू ः अरुणावस्थेत मोठ्या प्रमाणात शरीराच्या आतबाहेर जाणवणारे परिणाम घडत असतात. सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे वयात येणे. शरीरावर दिसणारे परिणामही अद्भुत वाटावेत असे असतात. पण आत अनुभवाला येणारे बदलही आश्चर्यकारक असतात. या अवस्थेत अत्यावश्यक आहे ते घरी नि शाळेत मिळणारे शिक्षण नि मार्गदर्शन. अतिशय प्रभावीपणे दिलेले लैंगिक शिक्षण (सेक्स एज्युकेशन) अत्यावश्यक आहे. आपली ‘प्रकृती’ आरोग्यदायी पद्धतीने समजून घेणे नि तिला सांभाळणे हे अरुणांसाठी गरजेचे आहे. नाहीतर ‘विकृती’ निर्माण करणारी असंख्य संकेतस्थळं (वेबसाइट्स) इंटरनेटवर उपलब्ध आहेतच, अन् याची साद्यंत माहिती मित्र-मैत्रिणी एकमेकांना देत असतातच. असो.
याबरोबरच आरोग्य-शिक्षण, नव्हे स्वास्थ्य शिक्षण (वेल्नेस एज्युकेशन) देणे आवश्यक आहे. ही केवळ हसण्यावारी न्यावयाची गोष्ट नव्हे. यामुळेच अनेक मुलं कुमारवयात, अरुणावस्थेत मानसविकार नि विकृतींना बळी पडत आहेत. यासाठी व्यायाम-विश्रांती-आहार-मनोरंजन असा समग्र विचार आवश्यक आहे. - बौद्धिक पैलू ः या मानवाच्या विकासात अतिशय महत्त्वाचे स्थान असलेल्या पैलूवर सर्व दिशांनी विघातक आघात होत आहेत. माहितीच्या पुरात ही टवटवीत, संवेदनाक्षम मुलं अक्षरशः गटांगळ्या खात आहेत. पूर्ण बुडण्यापूर्वी त्यांना वाचवण्याची गरज आहे.
‘वाचन- मनन- चिंतन- मंथन’ हीच साखळी यासाठी आवश्यक आहे. शाळेत आठवड्यातून किमान एकदा (शनिवारी) यासाठी वेळ राखून ठेवून प्रेमळ, सक्षम शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या बुद्धीशी म्हणजे कल्पना-विचार यांच्याशी प्रभावीपणे जोडणारे उपक्रम राबवायला हवेत. - मानसिक (भावनिक) पैलू ः भावनांची त्सुनामी, विचारांचा ज्वालामुखी नि कल्पनेचे चक्रीवादळ एकाच वेळी अरुणांच्या अंतरंगात सुरू असते. यात ही कुमारवयीन मुलं भावनिकदृष्ट्या अस्थिर होतात. नदीतील भोवऱ्यात खोल खोल बुडणाऱ्या नि केवळ हात पाण्यावर दिसणाऱ्या असहाय व्यक्तीसारखी त्यांची अवस्था होते. त्यांच्यामागे घरी पालकांनी नि विद्यालयात शिक्षकांनी हळुवारपणे, सतत सजग- सतर्क असले पाहिजे. यासाठी सहशिक्षणापेक्षा ‘सहजीवन’ अधिक प्रभावी ठरते.
- सामाजिक पैलू ः अरुणावस्थेतील मुलं समाजात मिसळताना काहीशी संभ्रमावस्थेत असतात. काही मुलं अतिशय धीट असतात. पण बरीचशी ग्रामीण भागातली, गरीब कुटुंबातील मुलं जरा घाबरट, समाजात एकदम न मिसळू शकणारी असतात. त्यांच्यासाठी शाळेत समाजजीवनाचे, स्काउट्स-गाइड्स म्हणजे बालवीर-वीरबाला असे महत्त्वपूर्ण उपक्रम असतात.
- आध्यात्मिक पैलू ः या शब्दाने घाबरून जाण्याचे कारण नाही. तन-मनाचा संयोग (बॉडी-माइंड कनेक्ट) घडवणारे ध्यान- एकाग्रता- योगाभ्यास यांसारखे उपक्रम नित्यनियामाने राबवणे म्हणजेच आध्यात्मिक विकाल घडवणे होय. हे सर्व पैलू तरुणावस्थेसाठीही महत्त्वाचे आहेत म्हणून त्यांच्यावर सहचिंतन करणार आहोतच. ‘दिव्यत्वाची प्रचिती’ येऊन इतरांनी हात जोडण्यापूर्वी आपण ‘दिव्यत्वाची आत्मप्रचिती’ घ्यायला नको का?