अरुणाचलमध्ये भूकंपाचे धक्के

0
5

>> तैवान, जपान, चीनमध्येही भूकंप

अरुणाचल प्रदेशातील दिबांग खोर्‍यात रविवारी सायंकाळी उशिरा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. हा भूकंप संध्याकाळी ६.२७ च्या सुमारास झाला. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.४ इतकी असून भूकंपाची खोली जमिनीपासून १० किमी खाली होती. भारतातील अनेक भागात नुकतेच भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. दोन दिवसांपूर्वी लडाखमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले होते.

लेहमधील अल्चीच्या उत्तरेस १८९ किमी अंतरावर ४.८ रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवले. गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला जम्मू आणि काश्मीरमधील कटरापासून ६२ किमी पूर्व-ईशान्येस ३.५ रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी या देशातील भूकंप क्रियाकलापांवर देखरेख ठेवणार्‍या भारत सरकारच्या संस्थेने ही माहिती दिली.

तैवानमध्ये भूकंप
शनिवार व रविवार या दोन दिवसांत तैवानमध्ये भूकंपाचे सुमारे १०० धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.२ एवढी होती. तैवानच्या किनारपट्टीवर ७.२ रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का जाणवल्यानंतर जपानने सुनामीचा इशारा दिला आहे. तैवानमध्ये अनेक इमारती कोसळल्या. रस्ते, पुलांचे नुकसान झाले आणि रेल्वेचे डबे रुळावरून घसरले आहेत.

तैवानमध्ये झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू तैतुंग काउंटीमध्ये होता. राजधानी तैपेई आणि दक्षिण-पश्चिम भागातील शहर काओशुंगमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. रविवारी दुपारी २:४४ वाजता तैतुंगच्या उत्तरेला सुमारे ५० किलोमीटर अंतरावर १० किलोमीटर खोलीवर भूकंपाचा धक्का बसला. तैवानमध्ये गेल्या २४ तासांत तीन वेळा भूकंप झाला. संपूर्ण तैवानमध्ये भूकंपाचे हादरे जाणवले असून राजधानीत मोठे नुकसान झाले आहे.
तैवानप्रमाणे जपान आणि चीन तसेच म्यानमार, अफगाणिस्तानमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.