अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात अल-कायदाचा म्होरक्या ठार

0
15

अमेरिकेने ड्रोन हल्ला करत दहशतवादी संघटना अल-कायदाचा म्होरक्या अल जवाहिरीला (७१) ठार केले. मोस्ट वॉण्टेड आणि ९/११ हल्ल्याचा सूत्रधार असणार्‍या जवाहिरीचा अमेरिकेने ड्रोन हल्ला करत खात्मा केला. २०११ मध्ये ओसामा बिन लादेनला ठार करण्यात आल्यानंतर जवाहिरी अल-कायदाचे नेतृत्व करत होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी जवाहिरीचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

अल जवाहिरी याआधी पाकिस्तानात लपला होता. अफगाणिस्तानात तालिबान्यांनी कब्जा मिळवल्यानंतर तो काबुल शहरात आला. तालिबानचे गृहमंत्री व कुख्यात दहशतवादी सिराजुद्दीन हक्कानी यांनी त्यांच्या सुरक्षित व गुप्त ठिकाणी जवाहिरीला राहण्यासाठी जागा दिली होती. अमेरिकेच्या अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, जवाहिरीला वारंवार त्याच्या घराच्या बाल्कनीत फिरण्याची सवय होती आणि तीच सवय त्याला महागात पडली. बाल्कनीमध्ये फिरण्याच्या सवयीमुळेच अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा सीआयएच्या अधिकार्‍यांना जवाहिरी काबुलमध्ये लपून बसल्याची माहिती मिळाली. त्यानंतर अधिकार्‍यांनी व्हाइट हाऊसला ही माहिती पोहोचवली. त्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्या आदेशानंतर जवाहिरीच्या एन्काउंटरचा कट रचण्यात आला. सीआयएने रिपर ड्रोनमधून हेलफायर मिसाइल जवाहिरीवर डागले. त्यातच त्याचा मृत्यू झाला.