कणकुंबीतील अपघातात म्हापशातील महिला ठार

0
22

कणकुंबी येथून बुधवारी दुपारी गोव्याकडे निघालेल्या कारची रस्त्याशेजारील झाडाला धडक बसून झालेल्या अपघातात म्हापसा येथील महिलेचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात चालक गंभीररीत्या जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी बेळगाव जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुलाबी गवस (५८, रा. म्हापसा) असे मृत महिलेचे नाव आहे. खानापूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महादेव गवस (होंडा-सत्तरी) हे आपल्या कार(जीए-०३-सी-९५७१)ने कणकुंबी येथून गोव्याकडे परतत होते. यावेळी कारमध्ये गुलाबी गवसही होत्या. कणकुंबी जवळच्या वनखात्याच्या कार्यालायजवळ चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कारची वडाच्या झाडाला जोरदार धडक बसली. त्यात गुलाबी गवस यांच्या डोक्याला जबर दुखापत होऊन अतिरक्तस्त्रव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. चालक महादेव गवस हे गंभीर जखमी झाले. लागलीच त्यांना बेळगाव शासकीय जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले. उत्तरीय तपासणीनंतर गुलाबी गवस यांचा मृतदेह नातेवाईकांकडे सोपवण्यात आला.