एकाच दिवशी सर्वाधिक कोरोनाबाधित अन् कोरोनामुक्त

0
16

>> नव्या ३९३६ कोरोनाबाधितांची नोंद; ३११९ जण कोरोनामुक्त; सात बळींची नोंद

राज्यात गेल्या २४ तासांत कोरोनाच्या तिसर्‍या लाटेतील सर्वात उच्चांकी कोरोना रुग्णसंख्येची नोंद झाली. तसेच सर्वाधिक कोरोनामुक्त रुग्णांची नोंद झाली. राज्यात कोरोनाबाधित आणि बळींच्या संख्येत होणारी वाढ कायम असून, चोवीस तासांत आत्तापर्यंतचे सर्वांत उच्चांकी नवीन ३९३६ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तसेच आणखी ७ कोरोना बळींची नोंद झाली आहे.
राज्यात बाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण ३८.७६ टक्के एवढे आहे. गेल्या चोवीस तासांत नवीन १०,१५३ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यातील ३९३६ नमुने बाधित आढळून आले. राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या २२ हजार ८०७ एवढी झाली आहे, तर कोरोना बळींची एकूण संख्या ३५७६ एवढी झाली आहे.

राज्यात इस्पितळात दाखल होणार्‍या कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या चोवीस तासांत ४७ जणांना इस्पितळांत दाखल करून घेण्यात आले असून, बर्‍या झालेल्या ३४ जणांना इस्पितळातून घरी पाठविण्यात आले आहे.

३११९ जण कोरोनामुक्त
राज्यात गेल्या चोवीस तासांत आणखी ३११९ जण कोरोनामुक्त झाले असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८७.९६ टक्के एवढे खाली आले आहे. राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने रुग्ण बरे होण्याच्या टक्केवारीत सातत्याने घट होत आहे.

५८ हजार मुले लसवंत
आतापर्यंत १५ ते १८ वयोगटातील ५७ हजार ९९९ मुलांना लस देण्यात आली असून, हे प्रमाण ७८.३८ टक्के एवढे आहे. राज्यातील एकूण ७४ हजार मुलांना लस दिली जाणार आहे. राज्यातील कोविड लस न घेतलेल्या नागरिकांना कोविडची बाधा झाल्यास गंभीर समस्येला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी लस घ्यावी यासाठी आरोग्य खात्याकडून प्रयत्न केला जात आहे.

१२.०७ टक्के नागरिकांनी घेतला बुस्टर डोस
राज्यात १० जानेवारीपासून बूस्टर डोस देण्यास प्रारंभ करण्यात आला असून, आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन कर्मचारी आणि इतर आजार असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना बूस्टर डोस देण्यात येत आहे. राज्यात आत्तापर्यंत १५ हजार ००६ लाभार्थींनी बूस्टर डोस घेतला आहे. हे प्रमाण केवळ १२.०७ टक्के एवढे आहे.