अभिमानास्पद!

0
872

कालची सकाळ समस्त भारतीयांसाठी एक अभिमानास्पद क्षण घेऊन अवतरली. अगदी नियोजनबरहुकूम आपले ‘मंगलयान’ मंगळाच्या कक्षेमध्ये अलगद शिरले आणि भारतीयांच्या बुद्धीची झेप कुठवर जाऊ शकते, याचे झगमगते दर्शन जगाला पुन्हा एकदा घडले. भारतीय शास्त्रज्ञांनी चंद्रापाठोपाठ मंगळाला गवसणी घातली आहे हे तर खरेच, परंतु या यशाचे आणखी अनेक पैलू आहेत, ज्यामुळे हे यश अधिकच झळाळून उठले आहे. पहिली बाब म्हणजे ६६६ दशलक्ष कि.मी. चा, प्रकाशाला पोहोचायलाच जिथे बारा मिनिटे लागतात एवढ्या दूरवरचा तीनशे दिवसांचा प्रवास करून मंगळाच्या कक्षेत ‘मंगलयान’ पाठवण्याची आपल्या ‘इस्रो’ची ही मोहीम आपल्या पहिल्यावहिल्या प्रयत्नातच यशस्वी झाली. जगातील केवळ रशिया, अमेरिका आणि युरोपलाच आजवर मंगळापर्यंत पोहोचणे शक्य झालेेले आहे. चीन आणि जपानसारख्या देशांनाही आपल्या मोहिमा अर्धवट सोडून द्याव्या लागल्या असताना भारत पहिल्याच प्रयत्नात यशस्वी ठरला त्यामागे अर्थातच ‘इस्रो’ च्या शास्त्रज्ञांचे बुद्धिकौशल्य आणि काटेकोर नियोजन आहे. प्रक्षेपकाची गती कमी थोडीशी कमी झाली असती, तर ‘मंगलयान’ मंगळाच्या कक्षेबाहेर भरकटले असते, गती थोडीशी जास्त झाली असती, तर मंगळाच्या पृष्ठभागावर जाऊन आदळले असते. पण अगदी अचूक मंगळाच्या कक्षेत ते फिरते ठेवण्यात आपल्या वैज्ञानिकांना यश आले. भारताच्या या यशाचा दुसरा महत्त्वाचा पैलू म्हणजे अत्यंत कमी खर्चामध्ये ही मोहीम राबवली गेली. ‘ग्रॅव्हिटी’ या हॉलिवूडपटापेक्षाही ‘मंगलयान’ मोहिमेला कमी खर्च आला हे पंतप्रधानांचे म्हणणे खरेच आहे. या मोहिमेवर साडेचारशे कोटी रुपये खर्च झाले, म्हणजे आपल्या एकशे वीस कोटी लोकसंख्येचा विचार करता दरडोई चार रुपये खर्च आला. अमेरिकेच्या ‘क्युरिऑसिटी’ वर दोन अब्ज डॉलर खर्च झालेले आहेत. आपल्या शास्त्रज्ञांच्या बुद्धिवैभवातून विकसित होत गेलेल्या स्वदेशी तंत्रज्ञानामुळे ही काटकसर आपण करू शकलो. एकेकाळी क्षेपणास्त्रे सायकलवरून वाहून नेणारा भारत आज स्वतःच्या बळावर मंगळ मोहिमेसारख्या आव्हानात्मक अवकाश मोहिमा राबवू शकतो हा प्रवास निश्‍चितच सोपा नव्हता. ‘मंगलयान’ वर सौर ऊर्जेवर चालणारी पाच महत्त्वाची उपकरणे आहेत. त्यावरचा मिथेन सेन्सर मंगळाच्या पृष्ठभागावर मिथेनच्या अर्थातच जीवसृष्टीच्या शक्याशक्यता तपासेल. इतर उपकरणे त्यावरील खनिजे, भूतकाळातील जीवसृष्टीचे संभाव्य अवशेष, वातावरण याची माहिती गोळा करतील. भविष्यातील मंगळ मोहिमांसाठी ही सारी माहिती आवश्यक आहे. पुढील काळात मंगळावर यान उतरवण्याचे स्वप्नही भारत पाहतो आहे. भारताच्या या अवकाश मोहिमांबाबत अनेकदा टीकेचा सूर काढला जातो. देशाची दोन तृतीयांश जनता गरीब असताना अशा प्रकारच्या महागड्या अवकाश मोहिमा कशासाठी असा नकारात्मक सूर लावला जातो. पण अवकाश मोहिमांमध्येही प्रचंड संधी आहेत याचा या महाभागांना विसर पडतो. जगामध्ये आज दूरसंंचार, माहिती तंत्रज्ञान, माध्यमे, हवामानाचा अभ्यास, अशा अनेक गोष्टींसाठी उपग्रहांची आवश्यकता भासते आहे. या उपग्रहांची निर्मिती आणि अवकाशातील प्रक्षेपण याचे ज्ञान मोजक्याच देशांपाशी आहे. भारताने आजवरच्या आपल्या अवकाश मोहिमांच्या जोरावर यात अव्वल ज्ञान प्राप्त केलेले आहे. ‘चंद्रयान’ आणि ‘मंगलयान’ मोहिमांनंतर तर भारताची या क्षेत्रातील विश्वासार्हता कमालीची वाढली आहे. अशावेळी व्यावसायिक मोहिमांसाठी या ज्ञानाचा वापर करण्याचे उद्दिष्ट ‘इस्रो’ने ठेवलेले आहे आणि त्यातून देशाला मोठा लाभ होऊ शकतो. ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण तंत्रज्ञान असो, उपग्रहांची आणि संबंधित उपकरणांची निर्मिती असो, भारतीय संशोधक आज कुठेही मागे नाहीत. पाठबळ आणि प्रोत्साहन मिळत राहिले, तर याहून अधिक आव्हानात्मक मोहिमा आपले वैज्ञानिक सफल करून दाखवतील यात शंका नाही. प्राचीन काळापासून चालत आलेल्या भारतीयांच्या खगोलशास्त्रीय जिज्ञासेला मूर्तरूपात आणत मोहिमांचा आराखडा बनवण्यापासून, नियोजनापर्यंत आणि निर्मितीपासून प्रत्यक्ष मोहीम पार पाडण्यापर्यंत सगळे काही आपण करू शकतो हा विश्वास ‘मंगलयान’ सारख्या अवघड मोहिमेला पहिल्याच प्रयत्नात साकारून ‘इस्रो’ने जागवलेला आहे. खरोखरीच हे यश अभिमानास्पद आहे, गौरवास्पद आहे!