अभिनेत्री सीमा देव अनंतात विलीन

0
26

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील सोज्ज्वळ अभिनेत्री अशी ओळख असलेल्या अभिनेत्री सीमा देव यांचे काल सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सीमा देव यांचा मुलगा अभिनय देव यांच्या मुंबईतील जुहू येथील घरीच सीमा देव यांचे निधन झाले. दिवंगत अभिनेते रमेश देव यांच्या त्या पत्नी होत्या. विविध चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचा खास ठसा उमटवला होता. सीमा देव यांच्या पार्थिवावर काल संध्याकाळी शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

सीमा देव यांनी आतापर्यंत 80 पेक्षा जास्त मराठी आणि हिंदी चित्रपटांत काम केले. आपल्या बहारदार अभिनयाने त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळाच ठसा उमटवला. सीमा देव यांचा जन्म मुंबईतील गिरगाव येथे झाला. पुढे त्यांचा विवाह अभिनेते रमेश देव यांच्याशी झाला. अभिनेते अजिंक्य देव आणि दिग्दर्शक अभिनय देव ही त्यांची दोन मुले आहेत. 2013 मध्ये रमेश देव आणि सीमा देव यांनी लग्नाचा पन्नासावा वाढदिवस साजरा केला होता. गेल्या वर्षी रमेश देव यांचे निधन झाले. त्यानंतर काल सीमा देव यांचं दीर्घ आजाराने निधन झाले. 2020 मध्ये सीमा देव यांना अल्झायमर या आजाराने ग्रासले होते.

सीमा देव यांचे मूळ नाव नलिनी सराफ असे होते. ‘आलिया भोगासी’ या सिनेमातून त्यांनी 1957 मध्ये सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी पुढे अनेक हिंदी आणि मराठी सिनेमांंमधून काम केले. ‘जगाच्या पाठीवर’, ‘मोलकरीण’, ‘यंदा कर्तव्य आहे’, ‘या सुखांनो या’, ‘सुवासिनी’, ‘हा माझा मार्ग एकला’ हे त्यांचे चित्रपट विशेष गाजले. ‘आनंद’ या अत्यंत गाजलेल्या हिंदी चित्रपटातील त्यांची भूमिका आजही कायम लक्षात राहते.