– संदीप मणेरीकर
ग्रामीण भागात मग तो कोकण असो वा गोमंतक अथवा घाटमाथ्यावरचा कोणताही गाव, त्या गावात चूल नाही असा गाव शोधूनही सापडणार नाही, अशी एकेकाळी परिस्थिती होती. स्वयंपाक करण्याची खोली, त्या खोलीत ओटा असेल नसेल, पण चूल होतीच. तशीच न्हाणीघरातही एक चूल होती. त्यावर भलामोठा बहुतेक तांब्याचा हंडा ठेवलेला असायचा व खाली विस्तव ढणढणत असायचा. बहुतेक घरांमध्ये दोन चुली असायच्या. दोन्ही चुलींचं कार्य वेगवेगळं असायचं. एका चुलीवर फक्त आंघोळीसाठी लागणारं पाणी गरम करायचं काम. पण त्यासाठी मोठ्या प्रमाणात ढणढणारा विस्तव हवा. दुसर्या चुलीवर त्यामानानं कमी प्रमाणात पेटणारा पण सतत पेटणारा विस्तव आणि त्याचं काम काय जेवणासाठी लागणारा सर्व स्वयंपाक करायचा. मग तो सकाळचा नाश्ता असो, दुपारचं जेवण किंवा रात्रीचं जेवण. तसंच तिन्ही त्रिकाळ लागणारा चहा आणि इतर गरम करण्यासाठीचे पदार्थ. सारं काही या चुलीवर होतं. पण या चुलीवरील विस्तवाचं रूप मात्र त्यामानानं सौम्य. स्वयंपाकघरातील चुलीत साधी लाकडं पेटत असतात. त्यांना सालपटं साथ देतात. त्यांना सळपं असंही म्हटलं जातं. कोकणात नारळाच्या करवंट्याही लाकडांसोबत या होमात आहुती देत असतात. तसंच विविध प्रकारचे कागद, कचराही जळत असतो. पण त्यामानानं त्याचं रुप लहान असतं. चुलीवर ठेवण्यात येणार्या भांड्यांचा आकारही लहान असतो. पातेल्या लहान, तसंच इतर सर्वच भांड्यांचा आकारही लहान असतो. पण ते सर्वच पदार्थ आपल्या जगण्यासाठी महत्त्वाचे असतात कारण ते सारे जेवणाचे पदार्थ असतात. या चुलीच्या मागे आणखी एक साधन असतं. त्याला कोकणात वायन असं म्हणतात. चुलीत पेटत असलेल्या लाकडातून पुढे जाणारा विस्तव या वायनातून वर येतो. हे वायन म्हणजे चुलीवरच विस्तव वर येण्यासाठी तयार केलेली एक योजना असते. त्यामुळे या वायनावर एखादं जादा भांडं ठेवता येतं. पाण्याची पातेली, दुधाची पातेली असलं किंवा गरम राहण्यासाठी काहीही यावर ठेवता येतं. त्यामुळे एकाचवेळी दोन पदार्थ तयार होत असतात. काही ठिकाणी जोड चुली दिसतात. म्हणजेच दोन चुली एकाला एक लागून दिसतात. मोठा एखादा कार्यक्रम असेल तर अशावेळी अशा चुली फार उपयोगात येतात. ज्या चुलीतील लाकडांनी जेवण करायचं असतं त्याच लाकडांना घरात आलेली इंगळीही मारण्याचं काम करावं लागतं.
न्हाणीघरातील चुलीवर मात्र असं काहीही नसतं. त्या चुलीवर कायम एक हंडा असतो. त्यावरची भांडी कधी बदललेली नसतात आणि दुसरं भांडही ठेवण्यासाठी जागा नसते. मात्र या चुलीचा आकार मोठा असतो. त्यात घालण्यासाठी वापरण्यात येणारी लाकडंही भलीमोठी असतात.
आमच्या घरी अशा दोन ठिकाणी चुली आहेत. पूर्वी आजी, त्यानंतर आई व आता वहिनी त्या चुलीची खर्या अर्थाने राखणदार आहेत. घरातील चूल ही मातीची आहे. त्यावर वायनही आहे, तसंच चुलीवर आणखीही थोडी जागा आहे. त्याला पाटा असं म्हणतात. त्याठिकाणी आगपेटी, कधी कधी फटाके, किंवा तत्सम काही वस्तू शेकवण्यास मिळतात. तशी जागा तिथे असते. त्यामुळे बहुतेक वस्तू तिथे शेकण्यासाठी ठेवलेल्या असतात. तसंच त्या वायनावर पाण्याची पातेली असते. किंवा मातीची मडकी पाणी भरून ठेवलेली असते. त्यामुळे कधीही गरम पाणी मिळू शकतं. चुलीतली लाकडं जर खणखणीत वाळलेली असतील तर भरभरून पेटू लागतात. त्यावेळी वायनावर ठेवलेल्या मडकीतलं पाणीही उकळायला लागतं. एवढा त्या वायनाचा उपयोग होत असतो.
आजी, आई त्यावेळी सकाळी आंघोळीपूर्वी चुलीच्या आजूबाजूचा भाग शेणानं सारवत असे. तसंच चूलही शाडूने रंगवली जात असे. एका अर्थानं ही चुलीची पूजा केली जात असे. चुलीचा मान राखला जात असे. चुलीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जात असे. सकाळचा नाश्ता झाला की की स्वयंपाकघरात जिथे आम्ही नाश्ता केलेला असेल त्या ठिकाणची जागा शेणानं सारवली जात असे. त्यानंतर चुलीभोवतीही सारवलं जात असे. त्यानंतर दुपारच्या जेवणाची तयारी करण्यापूर्वी शाडूने सारवलेली चूल व आसपासची शेणानं सारवलेली चूल वाळून गेलेली असायची. मग त्या चुलीवर भात, पाण्याचं आधन, असा दुपारच्या जेवणाचा थाटमाट सुरू व्हायचा. पहिल्यांदा आमच्या घरात ओटा नव्हता. त्यामुळे सारी कामं खाली बसूनच व्हायची. आजी तर सारा स्वयंपाक चुलीवरच करत असे. त्यानंतर कधी तरी आमच्याकडे गोबरगॅस आला. त्यानंतर आपोआपच ओटा आला. पण चुलीचं महत्त्व वादातीत होतं. ते कधीच कमी झालं नाही. आजीला तर चुलीचीच सवय होती. आईलाही चुलीचीच सवय होती. पण नंतर आईनं गोबरगॅसची चूल करून घेतली. पण आजी गोबरगॅसकडे कधी गेेलेली मी पाहिली नाही.
आजीला भाकरी भाजायची असो वा भात शिजवायचा असो, तिला चूलच प्रिय होती. त्यामुळे ती बराचसा स्वयंपाक चुलीवरच करत असे.
आम्ही दुपारी शाळेतून घरी जेवणाच्या सुट्टीत जेवायला घरी येताना पायर्या उतरताना मी शेजारच्या उंच घरांच्या कौलातून वर ढगात जाणारा चुलीतला धूर पहायचो आणि मनोमन सुखावत होतो. कारण आम्हांला दुपारी एक तास जेवणाची सुट्टी असायची. जेवून शाळेत जायला उशीर झाला तर गुरूजींचा हात व आमची पाठ यांचा कडाक्याचा सामना व्हायचा. त्यापेक्षा लवकर गेलेलं बरं असं वाटायचं. त्यामुळे हा धूर दिसला की आमच्याही घरी आता जेवण झालेलं आहे याची साक्ष पटायची आणि मग मी सुखावत असे. म्हणजे आज मी शाळेत लवकर पोहोचणार हे मनात नक्की असायचं. शेजारच्या घरी जेवण झालंय म्हणजे आमच्याही घरी ते झालेलं असणार याची पक्की खूणगाठ मनात मारलेली असायची आणि ती बहुतेक बरोबर असायची.
‘चूल’ हा विषय तसा पाहिला तर अगदी जिव्हाळ्याचा आहे. कारण चुलीवरचं जेवण जे जेवलेले आहेत, त्यांना सध्याच्या भारत, हिंदुस्थान गॅस किंवा इंडक्शनवरील स्वयंपाकाची चव म्हणजे किस झाड की पत्ती अशीच असणार. चुलीवरचं जेवण जेवण्याचं भाग्य मला लाभलंय आणि तेही कित्येक वर्षे. त्यामुळे खरं तर मी खूपच भाग्यवान आहे. चुलीवरच्या भाकरीची, पिठल्याची, आमटी-भाताची चवच काही न्यारी. जेवण साधं असलं तरी रुचकर असतं. आईने किंवा आजीने लोखंडी तवा चुलीवर ठेवून काढलेल्या आंबोळ्या, तांबड्या तांदळाची पेज, कुठल्याही फाईव्हस्टार हॉटेलमध्ये असलं जेवण मिळणार नाही व मिळालं तरीही त्याला ती चवच असणार नाही. चुलीवर भाजलेल्या खमंग पापडाची चव, चुलीत भाजलेल्या वांग्याच्या भरीताची चव खरंच हे पदार्थ खावेत तर चुलीवर केलेलेच.
आज सगळीकडे फ्लॅट्स झालेत. कौलारू घरं नाहीशी होत आहेत. फ्लॅट संस्कृतीमुळे कौलारू, अस्सल ग्रामीण संस्कृती आपण गमावत बसलोय. ग्रामीण भागात विकास जरी झालेला नसला तरी संस्कृती रक्षणाचं काम ग्रामीण भागच करत असतो. पण आज ग्रामीण भागावरही शहरी संस्कृतीचा, शहरीकरणाचा पगडा घट्ट बसत चाललाय. विकासाचा आपण चुकीचा अर्थ किती सहजपणे लावून बसतोय. विकास म्हणजे संस्कृतीवर आक्रमण, जे जे जुनं आहे ते टाकाऊ व ते घालवून त्या ठिकाणी सारं नवीन घ्यायचं म्हणजे विकास असा आपण अत्यंत चुकीचा अर्थ विकासासाठी वापरत आहोत व त्याप्रमाणे वागत आहोत. चुलीच्या ठिकाणी गॅस आला की आमचा विकास झाला असं आपण समजतो आहोत.
शहरातील बहुतेक मुलांना चुलीत विस्तव करण्याची सवय नाही. त्यामुळे त्यांना चुलीत विस्तव करता येणे कठीण. चुलीत विस्तव करणं हीसुद्धा एक कला आहे. मी कोलगावला माझ्या आत्याकडे राहत असताना मला एकदा आत्याने चुलीत विस्तव कर असं सांगितलं आणि मी तो केल्यानंतर आत्यानं मला शाबासकी दिली होती. चुल अगदी थंड असताना, चुलीत विस्तव करणं ही खरं तर कठीण गोष्ट आहे. चुलीत लाकडं घालायची, त्यावर असलं तर रॉकेल थोडं घालायचं, (तेही आता मिळणं अमृतापेक्षा दुर्मिळ झालंय.) अन्यथा करवंटी पेटवून विस्तव करायचा. याला कसब लागतं. फुंकणीनं फुंकर मारून मारून डोकं गरगरायला लागतं. त्यात डोळ्यात धूर जात असतो. डोळ्यांतून अखंड पाण्याचा झरा वहात असतो. आणि तशाही परिस्थितीत विस्तव पेटवायचा असतो. खरंच शहरी लोकांनी हा अस्सल ग्रामीण भागाचा अनुभव घ्यावा हे नक्की.
चुलीतील विस्तवाने आम्हांला जेवण शिजवून दिलं म्हणून ऋण फेडणार्या आमच्या संस्कृतीत वैश्वदेव हा एक विधी असतो. त्यानुसार या चुलीची व चुलीतील विस्तवाची पूजा करावी लागते. पण आज गॅसच्या जमान्यात हा विस्तवच नाही, त्यामुळे हे ऋण व्यक्त करण्याची पद्धतच नाहीशी होत आहे. माझ्या घरी तसं पाहिलं तर गोबरगॅस आहे, पण त्याचबरोबर चुलही आहे. मात्र बर्याच ठिकाणी गॅस आल्यानंतर चूल गायब झालेली दिसत आहे. गोबर गॅसलाही काही मर्यादा आहेत. कारण त्यासाठी गुरं, म्हशी पाळाव्या लागतात. त्या ज्यांच्याकडे आहेत त्यांच्यासाठी गोबर गॅस चांगला पर्याय आहे. पण म्हशी पाळणार कोण? असा प्रश्न आहे. पण काहीही असलं तरी चुलीवरील स्वयंपाकाची सर अन्य कोणत्याच वस्तूवरील पदार्थाला नाही.
फ्लॅट संस्कृतीमुळे खरं तर सगळंच फ्लॅट, सपाट होतय. त्यात आमच्यावरचे संस्कार आणि मनं यांचा समावेश प्रामुख्याने करावा लागेल. फ्लॅट आल्यामुळे भिंती धुरामुळे काळ्या होतात या सबबीखाली पहिल्या प्रथम चुलीवर गंडांतर आलं. त्यामुळे चुली बाहेर पडल्याने आपोआपच चुलीवरचे पदार्थ बाहेर गेले. पाणी तापवण्यासाठी गिझर आले, जेवणासाठी गॅस आले. पण चुलीवरच्या जेवणाची चव हरवली ती कायमचीच. आज लाकूड महाग झालं, त्यामुळे जळणासाठी लाकूड मिळणं मुश्कील झालंय. फास्टफूडच्या जमान्यात चटणी-भाकरी लुप्त होतेय. गावात काही ठिकाणी अद्याप चुली आहेत पण त्यांना लाकडाचा प्रश्न भेडसावतोय. लाकूड आणण्यासाठी जंगलात गेल्यास त्यावेळी वनरक्षकांची भीती असते. आता तर गावातही असे गॅस येऊ लागलेले आहेत. गावातही फ्लॅट संस्कृती येऊ लागलेली आहे. त्यामुळे गावातील अस्सलपणा, रांगडेपणा तसंच सांस्कृतिक जीवनही लोप पावू लागलेलं आहे. पण त्यावर उपाय काहीच नाही का?