अनंतनागमध्ये सहाव्या दिवशीही लष्कराची शोधमोहीम सुरूच

0
6

काश्मीरमधील अनंतनागमध्ये सहाव्या दिवशी काल रविवारी 17 रोजी दहशतवाद्यांविरोधातील शोधमोहीम सुरूच असून गडुल कोकरनागच्या जंगलात आणखी दोन दहशतवादी लपल्याचा संशय लष्कराला आहे. शनिवारी लष्कराने तीन दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर रात्री अंधार पडल्याने कारवाई थांबवण्यात आली.
दरम्यान, बारामुल्लामधील नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) उरी, हातलंगा भागात शनिवारी तीन दहशतवादी मारले गेले. हे ऑपरेशन सकाळी 6 वाजता सुरू झाले आणि 8 तासांनंतर दुपारी 2 वाजता संपले.

द्रोनचा वापर
लष्कराने कोकरनागमध्ये हल्ल्यासाठी कोणत्याही दहशतवादी कारवाईत प्रथमच आपले सर्वात प्रगत द्रोन हेरॉन मार्क-2 लाँच केले. द्रोनने दहशतवाद्याला शोधून त्याच्यावर ग्रेनेड फेकले आणि त्याचा मृत्यू झाला. चकमकीदरम्यान मुसळधार पावसातही हेरॉन काम करत होता. याशिवाय क्वाड कॉप्टर द्रोनने दहशतवाद्यांना हुसकावून लावण्यात मदत केली. हे द्रोन एकाच वेळी 5 बाजूंनी गोळ्या आणि ग्रेनेड डागू शकते. हे 15 किलोमीटर अंतरावरून चालवता येते.

दरम्यान, पीर पंजाल ब्रिगेडचे कमांडर पीएमएस ढिल्लन यांनी, पाकिस्तानी लष्कर दहशतवाद्यांना मदत करत असल्याचा आरोप केला आहे. बारामुल्लामध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची छायाचित्रे लष्कर-पोलिसांनी जारी केली. मात्र, त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. बारामुल्ला येथे मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडून दोन एके रायफल, 7 मॅगझिन, एक चिनी पिस्तूल, सात हातबॉम्ब, 5 किलो आयईडी आणि इतर दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. त्यांच्या बॅगेतून पाकिस्तानच्या 6 हजार आणि भारताच्या 46 हजार रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.
अनंतनागमध्ये सुरू असलेल्या चकमकीत आतापर्यंत दोन लष्करी अधिकारी, एक सैनिक आणि एक पोलीस अधिकारी शहीद झाले आहेत.