उत्तर गोवा जिल्हा पंचायतीत होणार बिनविरोध निवड; दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीत दोन्ही पदांसाठी होणार निवडणूक
राज्यातील उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा या दोन्ही जिल्हा पंचायतींच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड आज (दि. 30) सकाळी 10.30 वाजता केली जाणार आहे. उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड बिनविरोध होणार आहे, तर दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी प्रत्येकी दोन-दोन अर्ज दाखल झाल्याने निवडणूक होणार आहे. दक्षिण गोव्यात भाजप आणि विरोधी काँग्रेस-गोवा फॉरवर्ड आघाडीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
20 डिसेंबरला दोन्ही जिल्हा पंचायतींसाठी निवडणूक होऊन 22 डिसेंबरला निकाल जाहीर झाला होता. त्यात उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या 25 जागांपैकी 19 जागांवर भाजप-मगो आघाडीने विजय मिळवला. काँग्रेसने 2, आरजीपीने 2 आणि अपक्षांनी 2 जागांवर विजयश्री खेचून आणली होती. दुसऱ्या बाजूला, दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या 25 जागांपैकी 13 जागांवर भाजप-मगो आघाडीने यश मिळवले होते. 9 जागा काँग्रेस व गोवा फॉरवर्ड आघाडीने जिंकल्या होत्या. आम आदमी पक्षाला 1 जागा, तर 2 जागा अपक्षांना मिळाल्या होत्या. या निकालांतून दोन्ही जिल्हा पंचायतीत भाजप-मगो आघाडीने सत्ता काबीज केली होती.
उत्तर गोव्यात दोन्ही
पदांसाठी प्रत्येकी 1-1 अर्ज
उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या अध्यक्षपदी भाजपच्या रेश्मा बांदोडकर आणि उपाध्यक्षपदासाठी नामदेव च्यारी यांनी उमेदवारी अर्ज काल सादर केले. उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे अध्यक्षपदासाठी भाजपच्या उमेदवार रेश्मा बांदोडकर आणि उपाध्यक्षपदासाठी नामदेव च्यारी यांनी उमेदवारी अर्ज काल सादर केला. अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी प्रत्येकी 1 उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिविरोध निवड होणार आहे. दरम्यान, 31 डिसेंबर 2025 रोजी नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली जाणार आहे.
दक्षिण गोवा पंचायतीत
दोन्ही पदांसाठी निवडणूक
दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक अटळ असून, काल मुदत संपेपर्यंत भाजप आणि विरोधी काँग्रेस-गोवा फॉरवर्ड आघाडीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले.
अध्यक्ष पदासाठी भाजपतर्फे शेल्डे मतदारसंघातून निवडून आलेले सिद्धार्थ गावस देसाई यांनी दोन अर्ज भरले, तर बाणावली येथून निवडून आलेल्या काँग्रेसच्या लुईझा रॉड्रिगीस यांनी अर्ज दाखल केला. उपाध्यक्ष पदासाठी भाजपतर्फे बार्से मतदारसंघातून विजयी झालेल्या अंजली अर्जुन वेळीप यांनी, तर गोवा फॉरवर्ड पक्षाच्या राय येथून निवडून आलेल्या इनासिना पिंटो यांनी अर्ज दाखल केला.
विरोधी पक्षांकडे बहुमत नसल्याने भाजप-मगो आघाडीचे दोन्ही उमेदवार निवडून येण्याची दाट शक्यता आहे. 25 सदस्यांच्या जिल्हा पंचायतीत निवडून येण्यासाठी किमान 13 सदस्यांची गरज आहे.