अत्यावश्यक यादीत नवीन ३४ औषधांचा समावेश

0
42

>> केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची माहिती; २६ औषधे अत्यावश्यक यादीतून वगळली

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अत्यावश्यक औषधांची सुधारित राष्ट्रीय यादी काल प्रसिद्ध केली. अत्यावश्यक औषधांच्या नवीन यादीत ३४ औषधांचा समावेश करण्यात आला आहे. ज्यात आयव्हरमेक्टिन, मुपिरोसिन आणि निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी यांसारख्या विशिष्ट संसर्गविरोधी औषधांचा समावेश आहे. त्यामुळे या यादीतील औषधांची एकूण संख्या आता ३८४ झाली आहे. यासोबतच सरकारने अत्यावश्यक यादीतून २६ औषधे काढून टाकली आहेत.

याबाबत माहिती देताना केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडवीय यांनी सांगितले की, सरकार सर्वांना स्वस्त आणि दर्जेदार औषध उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहे. एखाद्या औषधाच्या किमतीत होणारी वाढ थांबवण्याची व्यवस्था केली जात आहे. या यादीमध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्याही औषधाची किंमत संबंधित कंपनी स्वतःहून किंवा स्वेच्छेने वाढवू शकत नाही.
यादीत समाविष्ट असलेल्या सर्व औषधांची किंमत नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटीद्वारे निश्चित केली जाणार आहेत. यादीत समाविष्ट असलेल्या सर्व औषधांच्या किमती घाऊक किंमत निर्देशांकाच्या आधारे निश्चित केल्या जातील. प्राधिकरण या औषधांची कमाल किंमत निश्चित करेल. यादीत समाविष्ट असलेल्या सर्व औषधांच्या किमती लवकरच सुधारित केल्या जातील, असे मांडवीय यांनी सांगितले. केंद्र सरकारने अत्यावश्यक औषधांची यादी जाहीर केल्यामुळे मोठ्या प्रमाणात मागणी असलेल्या अन्य काही औषधांची किंमत कमी होण्याची शक्यता आहे.

छातीतील जळजळ किंवा सिडिटीच्या त्रासाला नाहीसे करण्यासाठी झेन्टॅक हे औषध वापरले जाते. अमेरिकेत मात्र या औषधाच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान अमेरिकेनंतर आता भारतानेही या औषधांबाबतीत एक मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय आरोग्य मंत्रालयाने झेन्टॅक, रॅन्टॅक यांच्यासह एकूण २६ औषधांना अत्यावश्यक औषधांच्या यादीतून वगळले आहे.