- गुरुदास सावळ
अपघातप्रवण विभागात सुधारणा करण्याची घोषणा वाहतूक मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच कधीकधी मुख्यमंत्रीही करतात. दोन-तीन दिवस पोलिसांची मोहीम चालते. मात्र अपघातात मरण पावलेल्या लोकांवर अंत्यसंस्कार झाले की सगळे शांत होते. गोवा सरकार, पोलीस किंवा बांधकाम खात्याने कितीही प्रयत्न केले तरी जोपर्यंत आमचे चालक वेगावर नियंत्रण ठेवत नाहीत तोपर्यंत वाढत्या अपघातांचा आलेख चढाच राहणार!
गोव्यात आतापर्यंत अनेक मोठे अपघात घडले. अनेक लोक मरण पावले, असंख्य जखमी झाले. छोटे छोटे अपघात तर रोजच घडत असतात. त्यात किती लोक जखमी होतात याची गणती वाहतूक पोलिसांकडेही नसणार. गोव्यात एखादा मोठा अपघात घडला की वर्तमानपत्रांतून या विषयावर चर्चा होते. वर्षभर सुस्त राहून, एखाद्या वळणावर थांबून, वाहतूक नियम न पाळणाऱ्या वाहनचालकांना तालांव देणाऱ्या पोलिसांना अकस्मात जाग येते. अपघात कमी करण्यासाठी मोलाच्या सूचना केल्या जातात. अपघातप्रवण विभागात सुधारणा करण्याची घोषणा वाहतूक मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच कधीकधी मुख्यमंत्रीही करतात. दोन-तीन दिवस पोलिसांची मोहीम चालते. मात्र अपघातात मरण पावलेल्या लोकांवर अंत्यसंस्कार झाले की सगळे शांत होते. आपण कोणत्या घोषणा केल्या होत्या, ते सगळे मंत्री विसरून जातात. हे सगळे गेली कित्येक वर्षे अव्याहतपणे चालू आहे. गेली अकरा वर्षे गोव्यात भाजपचे सरकार आहे. त्याआधी पाच वर्षे काँग्रेसचे सरकार होते. पक्षाचे लेबल बदलले तरी मंत्री तेच राहिले आहेत.
दिगंबर कामत, मनोहर पर्रीकर, लक्ष्मीकांत पार्सेकर, डॉ. प्रमोद सावंत आदी मुख्यमंत्री होऊन गेले. वाहतूक मंत्री कोण-कोण होऊन गेले हे लक्षात राहणेही कठीण आहे. या काळात बरीच वर्षे सुदिन ढवळीकर सार्वजनिक बांधकाम मंत्री राहिले आहेत. मात्र अपघातप्रवण भागात कोणतीही सुधारणा झालेली नाही. रस्ते रूंद झाले त्यामुळे वाहनांचा वेग वाढला आणि अपघातांचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढतच गेले. जुवारी पुलाच्या कठड्याला धडक देऊन जुवारी नदीत कोसळलेली कार किंवा गेल्याच आठवड्यात तीन बिल्डिंग- पर्वरी येथे एकेरी मार्गावर घडलेला अपघात याला गोवा पोलिसांना जबाबदार धरता येणार नाही. बेफाम वेग हे एकमेव कारण या अपघातामागे आहे. गोव्यातील बरेच लोक तिन्हीसांजेला एक पेग मारतात असा सर्वसाधारण समज आहे. मात्र अनेकवेळा एक पेग मारताना चारपाच पेग पोटात कधी जातात हे त्यांना कळत नाही. अपघात घडल्यानंतर जेव्हा इस्पितळात तपासणी होते तेव्हाच किती पेग रिचवले होते हे स्पष्ट होते. बाणस्तारी अपघातात हीच गोष्ट घडली. अपघात घडला की कोणीतरी मरणारच, असे विधान या अपघातातील एका महिला आरोपीने अपघातानंतर केल्याचे सांगितले जाते. अपघातग्रस्त गाडीत त्यांची तीन छोटी मुलं होती याचा त्यांना विसर पडलेला दिसतो.
बाणस्तारी येथे घडलेल्या या अपघातास कारणीभूत असलेले सावर्डेकर कुटुंब हे अतिशय सधन कुटुंब आहे. परेशचे वडीलभाऊ सावर्डेकर यांना करंझाळे परिसरात मोठा मान आहे. मेघनाचे वडील फार मोठे बिल्डर असूनही लोक त्यांना मानतात, त्यांचा आदर करतात. अशी अत्यंत चांगली कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या या कुटुंबातील नव्या पिढीने रोटरी क्लब पिकनीकवेळी भरपूर दारू ढोसून तिघांचा बळी घेतला आणि इतर तिघांना जीवनातून उद्ध्वस्त केले. या अपघातात आपला प्रियकर गमावलेली तरुणी कधीकाळी चालू शकेल की काय याबद्दल शंका आहे. वयोवृद्ध माणसाचे सर्वांग पक्षाघातामुळे लुळे पडले आहे.
अपघात घडला तेव्हा ती आलिशान गाडी कोण चालवीत होते याबद्दल संशयाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी चौकशीस बोलावले तेव्हा मेघनाने त्या समन्सला कचऱ्याची पेटी दाखवत या समन्सला उच्च न्यायालयात आव्हान दिले. कोट्यवधीची मोटार उडविण्याऱ्या या जोडप्याला पैसे देऊन आपण सर्वकाही विकत घेऊ शकू असे वाटत होते. न्यायालयाने त्याची दखल घेऊन अपघातग्रस्तांना काही मदत देण्याची तयारी आहे काय, असा थेट प्रश्न केला आणि न्यायालयाची सहानुभूती मिळविण्यासाठी तब्बल दोन कोटी देण्याची तयारी दाखवली गेली. दोन कोटींचा हा आकडा ऐकून सर्वसामान्य नागरिकांचे डोळे विस्फारणे साहजिकच आहे. पण या उनाड पोरांना ही रक्कम फार मोठी वाटत नाही हे न्यायालयाला माहीत होते. त्यामुळे न्यायालयाने या प्रस्तावाला मंजुरी दिली.
या अपघातप्रकरणी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला म्हणून सावर्डेकर कुटुंबाचे मित्र व ‘आप’चे गोवाप्रमुख अमित पालेकर यांना पोलिसांनी अटक केली. परेशला वाचविण्यासाठी गणेश लामाणी नावाच्या भलत्याच चालकाला पोलिसांसमोर उभा केल्याचा दावा केला जात आहे. या आरोपातून सहिसलामत बाहेर कसे पडायचे हे पालेकर यांना पुरेपूर माहीत असणार. सावर्डेकर जोडप्याला अटक न करण्यामागे खरी कारणे कोणती होती हे चौकशी अधिकारी निरीक्षक मोहन गावडे आता सांगणार आहेत. या जोडप्याला वाचवा म्हणून कोण मंत्री, कोण राजकीय नेते तसेच पोलीस अधिकाऱ्यांनी दबाव आणला होता हे मोहन गावडे यांना आता सांगावेच लागणार. या अपघातात बळी पडलेल्या दिवाडी गावातील फडते जोडप्यासाठी दिवाडी गाव मोर्चा घेऊन पोलीस ठाण्यावर गेला नसता तर पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतलीच नसती.
बाणस्तारी अपघात प्रकरणीचे भरपाई दावे सहा महिन्यांत निकालात काढावे हा अत्यंत महत्त्वाचा निर्देश उच्च न्यायालयाने लवादाला दिला आहे. हा आदेश लावादासमोर दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या दाव्यांनाही लागू व्हायला हवा. तसे झाले तर असंख्य लोकांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल.
बाणस्तारी अपघाताने अपघातग्रस्तांना मिळणाऱ्या भरपाईबद्दल नवे पायंडे पाडले आहेत. खिशात खुळखुळणाऱ्या पैशांच्या जोरावर सर्व- अगदी न्यायसुद्धा- विकत घेऊ अशा भ्रमात वावरणाऱ्या धनिकांच्या बिघडलेल्या मुलांना अद्दल घडली आहे. लोकांनी रेटा लावला म्हणूनच हे शक्य झाले.
बाणस्तारी अपघाताचे पुराण चालू असतानाच पर्वरी येथे उत्तररात्री झालेल्या एका अपघातात तीन तरुणांनी जीव गमावले तर इतर दोघांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. हा अपघात म्हणजे बेफाम वेगाचा बळी असल्याचे एव्हाना स्पष्ट झाले आहे. परत हा अपघात स्वयंअपघात असल्याने इतर कोणाला दोष देता येणार नाही. गोवा सरकार, पोलीस किंवा बांधकाम खात्याने कितीही प्रयत्न केले तरी जोपर्यंत आमचे चालक वेगावर नियंत्रण ठेवत नाहीत तोपर्यंत वाढत्या अपघातांचा आलेख चढाच राहणार!