अटल सेतू 27 पर्यंत वाहतुकीसाठी बंद

0
8

>> पुलावर डांबरीकरणाच्या कामास सुरूवात

मांडवी नदीवरील अटल सेतू हा तिसरा पूल गेली कित्येक वर्षे पुलावरील खड्डे, वाहन अपघात आदी विविध कारणांसाठी चर्चेत आहे. अटल सेतू या तिसऱ्या पुलाला लागलेल्या समस्यांचे ग्रहण अजूनपर्यंत सुटलेले नाही. आता, अटल सेतू दुरुस्तीच्या कामासाठी 17 मार्च ते 27 मार्च 2023 या काळात वाहतुकीसाठी पुन्हा एकदा बंद ठेवण्याचा आदेश उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकारी मामू हागे यांनी जारी केला आहे. या दुरुस्तीनंतर तरी अटल सेतूला लागलेले ग्रहण दूर होईल, अशी अपेक्षा वाहन चालक बाळगून आहेत.

या अटल सेतू पुलाचे उद्घाटन वर्ष 2019 मध्ये करण्यात आले आहे. उद्घाटनानंतर हा पूल खड्ड्यामुळे चर्चेत आला. हा नवीन पूल आत्तापर्यंत अनेक वेळा दुरुस्तीच्या कामासाठी बंद ठेवण्यात आला. तथापि, पुलाची योग्य दुरुस्ती झालेली नाही. या अटल सेतू पुलाचे नव्याने डांबरीकरण करण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे या पुलावरून केवळ एकेरी वाहतूक करण्यास मान्यता दिली जात आहे. पुलाचे नव्याने डांबरीकरण केले जात असून ते झाल्यानंतर पूल पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे.