अग्निशामक दलात लवकरच महिला कर्मचार्‍यांची भरती

0
18

>> मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती

अग्नी सेवा दलाची ३३ कोटी रुपयांची नवी आणि सर्व सोयीसुविधांनी युक्त अशी अत्याधुनिक इमारत मार्च २०२३ पर्यंत बांधण्यात आहे. या इमारतीत कर्मचार्‍यांसाठी एक प्रशिक्षण सभागृहही असेल. तसेच लवकरच अग्निशामक दलात महिला अग्निशामक कर्मचार्‍यांची देखील भरती करण्यात येणार आहे. दलात नव्याने कर्मचार्‍यांची भरती करण्यापूर्वी नियम तयार केले जातील, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल स्पष्ट केले.

जिल्हा खनिज निधीतून खरेदी करण्यात आलेली ७२.५६ लाख रुपयांची दोन तात्काळ मदत वाहने आणि २३ लाख रुपयांच्या तीन बचाव नौकांना हिरवा कंदील दाखवल्यानंतर ते बोलत होते.
राज्य सरकारने सर्व सरकारी इमारतींचे अग्नी सुरक्षेसंबंधीची ऑडिट करण्याचे काम हाती घेतले असून, बहुतेक जुन्या सरकारी इमारतींत जुनीच यंत्रणाच असल्याचे ह्या ऑडिटमध्ये आढळून आले आहे. या पार्श्‍वभूमीवर या सर्व इमारतींमध्ये नवी अग्नी सुरक्षाविषयक यंत्रणा उभारण्याचा आदेश देण्यात आला असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.