अग्निवीर भरतीसाठी उद्यापासून अर्ज स्वीकृती

0
18

कोल्हापूर येथील सैन्य भरती कार्यालयाने वर्ष 2023-2024 साठी अग्निवीर भरतीसाठी कार्यक्रम जाहीर केला आहे. या अग्निवीर भरतीसाठी शुक्रवार दि. 10 फेब्रुवारी ते शनिवार दि. 11 मार्चपर्यंत ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. अग्निवीर योजनेखाली अविवाहित युवक अर्ज करू शकतात. पहिल्या टप्प्यासाठी गोव्यातील उत्तर आणि दक्षिण गोव्यातील युवकांबरोबर महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील युवक अर्ज करू शकतात. ही समान प्रवेश परीक्षा (सीईई) पाच ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. अर्जदार युवकांना परीक्षेसाठी केंद्राची निवड करावी लागणार आहे. ऑनलाइन परीक्षा येत्या 12 एप्रिलपासून सुरू होणार आहे. समान प्रवेश परीक्षेत निवड होणाऱ्या युवकांना शारीरिक चाचणी आणि वैद्यकीय चाचणी दुसऱ्या टप्प्यात द्यावी लागणार आहे, असे कळविण्यात आले आहे. दरम्यान, केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेखाली अग्निवीर भरतीच्या प्रक्रियेत दुरुस्ती करण्यात आली असून, भरती प्रक्रिया दोन टप्प्यात घेतली जाणार आहे. अग्निवीर म्हणून भरती होणाऱ्या युवकांना आता प्रथम समान प्रवेश परीक्षा (सीईई) द्यावी लागणार आहे. त्यानंतर अन्य चाचण्या होतील.