-ः माणसांचं जग ः-

0
299

– डॉ. जयंती नायक

…परंतु मनातील ती कळ मात्र तशीच राहिली. मरेपर्यंत तिनं कधी कुणा लहान बाळाचं तोंड बघितलं नाही की त्याला हात लावला नाही. एवढचं कशाला? स्वतःच्या नातवंडांचंसुद्धा तिनं वर्ष होईतोवर तोंड निरखलं नाही…

ती मरून पंचवीस वर्षं झाली असतील, परंतु ती मला खूप आठवते. कारण तिची कुचंबणा, तिचं दुःख, तिचं आयुष्य मी बरंच जवळून बघितलं आहे. ती वारली तेव्हा ऐंशीच्या घरात पोहोचली होती, आणि मी असेन तिशीत. वयाच्या पाच वर्षांपर्यंत जीवनात जे काही बघितलं, अनुभवलं ते काही मला आठवत नाही. म्हणजे सहाव्या वर्षापासूनच्या मला सगळ्या आठवणी आहेत. ती आमची शेजारीण असल्याने तिचं वागणं, तिची राहाणी, गावासंबंधीचा तिचा कळवळा, गावच्या लोकांनी तिला दिलेली वागणूक वगैरे बरंच जवळून बघितलं आहे. काही गोष्टी मला पणजीनं कथन केलेल्या, काही आईच्या बोलण्यातून समजलेल्या.

तिचं लग्नातलं नाव मनोरमा होतं, परंतु लोक तिला ‘मोनीव्हनी’ म्हणून हाक मारायचे. ‘मोनी’ हे तिच्या नावाचं लोकांनी केलेलं शॉर्टकट नाव. असं जरी असलं तरी त्यांनी तिला ‘मोनी’ म्हणून हाक मारण्यामागे एक कारणही होतं. ती खूप कमी बोलायची. बोलायची कुठे… ती खरं तर बोलतच नव्हती. कधी चुकून ती तोंडातून एखादा शब्द बाहेर काढायची तेवढच!

तिचा स्वभाव खूप परोपकारी होता. ती अडल्या-नडल्याला मदत करायची. कोणाच्या घरी चूल पेटली नाही हे कळलं तर ती लगेच आपल्या घरात जे काही आहे ते पदराला बांधून त्यांच्याकडे जायची. गरीब बाळंतिणीला तर तिचाच आधार होता. आपल्याकडलं लुगड्याचं गाठोडं, औषधी, बाळगुटी… जे काही आहे ते घेऊन ती तिच्याकडे धाव घ्यायची. कुणाच्या घरात लग्न असलं तर ही पुढे. न सांगताच ती कितीतरी कामे करायची. त्याकाळी गावात लग्न-कार्याची कामं शेजार-पाजार्‍यांनी मिळून करायची पद्धत होती. ‘आज तुझ्याकडे, उद्या माझ्याकडे’ या भावनेने गावचे लोक वावरायचे. ती आली म्हणजे यजमानबाईला मोठा दिलासा वाटायचा. ती कामाचा भार तर उचलायचीच, त्याचबरोबर रीती-परंपरा व्यवस्थित पार पाडायची.

फक्त एक गोष्ट सोडली तर गावचे लोकही तिच्याविषयी तसे कृतज्ञ होते. ते तिचा  मान-आदर करायचे. परंतु आपल्या घरात नवे बाळ जन्माला आले तर मात्र तिच्यापासून लपवून ठेवायचे. आता विरोधाभास बघा, ज्या बाळंतिणीच्या ती मदतीला धावायची तिची सुटका होताच तिथं आसलेली दायी किंवा घरात जी कोण बाई, बाप्प्या असेल तो पटकन बाळाला घेऊन तिथून उचलून हिच्या नजरेला पडणार नाही अशा जागी ठेवायचा. तिला त्याची कल्पना असायची. ती काही वाईट वाटून घ्यायची नाही, उलट स्वतःच त्या बाळावर दृष्टी टाकणं टाळायची.

सुरुवातीच्या काळात मात्र तिला या सगळ्यामुळे भरपूर यातना झाल्या होत्या म्हणे. म्हणूनच लग्नाआधी एखाद्या पाखरासारखी किलबिलणारी ती- लग्न झाल्यावर नव्हे- ती घटना घडल्यावर मनोरमाची ‘मोनीव्हनी’ बनली.

पणजीनं मला कित्येकदा ती घटना सांगितली होती. दरवेळी तिचा विषय निघाला म्हणजे पणजीच्या तोंडी तो प्रसंग असायचा. अन् आई कित्येकवेळा चिडून बोलताना मी ऐकलं आहे. ती म्हणायची- ‘ही लोकं एकदम अप्पलपोटी, हिचा फायदा घेताना यांच्या बाळांना काही हिची दृष्ट लागत नाही; काम पूर्ण झाल्यावरच लागते!’

गोष्ट अशी की ती लग्न होऊन सासरी आली तेव्हा लगेचच हिच्या जावेला मूल झालं. त्यावेळी घरीच बाळंतपणं व्हायची. हिच्या जावेचं बाळंतपणसुद्धा घरीच झालं. जाऊ पहिलटकरीण होती. मूल थोडं अशक्तच जन्मलेलं म्हणे. दायी आपल्यापरीनं उपाय करीत होती. दहा दिवसपर्यंत बाळ-बाळंतिणाला दायी अन् हिच्या सासूखेरीज कुणालाच दाखवलं नाही. अकराव्या दिवशी शुद्धकाराचं नहाण झालं अन् मग मुलाच्या वडिलांना, आजोबांना, काका-आत्याला… सगळ्यांना दाखवलं. ही पण मुलाला बघायला तिच्या खोलीत गेली, परंतु कावळा बसायला अन् फांदी तुटायला एक व्हावं त्याप्रमाणे ही बाळाजवळ जायला अन् बाळानं आपल्या शरीराला एक आळोखा देऊन मान टाकायला एक झालं. कितीतरी उपाय केले, परंतु बाळाने काही मान वर केली नाही.

मग झालं… घरात एकच आरडा-ओरड! ..मनोरमेची दृष्ट लागली अन् बाळानं मान आड टाकली..!

त्या दिवसापासून घरात, गावात कुणीच आपलं मूल निदान वर्षाचं होईतोवर मनरमेच्या नजरेला पडू देईनासं झालं. बाहेरचे लोक कशाला? तिच्या जावेला वर्ष व्हायच्या आधी दुसरं बाळ झालं. त्याला तर घरच्यांनी एक वर्षपर्यंत बाळंतिणीच्या काळोख्या खोलीतून बाहेरच आणलं नाही.

त्या घटनेपासून मनोरमा अबोल झाली… तिचं किलबिलणं थांबलं. याच्यावर कळस म्हणजे, तिच्या सासूनं तिचं स्वतःचं मूलसुद्धा एक वर्षपर्यंत तिच्या नजरेला पडू दिलं नाही. तिच्या छातीतलं दूध तिला पिळून द्यावं लागायचं. बाळ एकदम लहान असताना  कापसाची वात त्या दुधानं ओली करून त्याच्या तोंडात पिळली जायची. नंतर ते बोळ्यानं पिववलं गेलं…

त्या घटनेनंतर घरातील सगळी लोकं तिच्याकडे तिरस्कानं बघू लागली. सासू तर  घालून पाडून बोलायची. माहेरीसुद्धा एक अंतर तयार झालेलं. सुरुवातीला नवराही तिच्याविषयी अडी बाळगून होता, परंतु हळूहळू तो तिच्याशी सहानभुतीने, आपुलकीने वागू लागला. तिच्या कामात तिला सहकार्य देऊ लागला.

वर्षं गेली, सासू-सासरे गेले. दीर-जावेनं वेगळं घर बांधलं. आता ती घरची मुख्यत्यार झाली. आपल्या मनाप्रमाणे जगू लागली. गावात एकरूप झाली… परंतु मनातील ती कळ मात्र तशीच राहिली. मरेपर्यंत तिनं कधी कुणा लहान बाळाचं तोंड बघितलं नाही की त्याला हात लावला नाही. एवढचं कशाला? स्वतःच्या नातवंडांचंसुद्धा तिनं वर्ष होईतोवर तोंड निरखलं नाही…