-ः अवती-भवती ः- प्रोटोकॉल

0
302

 – दत्ताराम प्रभू-साळगावकर

माझा हुद्दा मुख्य प्रबंधकांच्या हुद्यापेक्षा कमी होता, पण त्यांनी आपल्या बरोबरीचाच कोणी असावा अशी वागणूक दिली. येथे प्रोटोकॉल कडमडला नाही! प्रसंग अगदी साधा, पण चेहरे व मुखवटे दाखवून देणारा! दोन सारखेच प्रसंग, दोन वेगळे अनुभव!

 

प्रोटोकॉल या इंग्रजी शब्दाचा अर्थ शिष्टाचार पद्धती. ती एक विशिष्ट प्रकारची वागण्याची पद्धत असते. महनीय व्यक्तींचं स्वागत, त्यांचा मानसन्मान या गोष्टी एका ठराविक पद्धतीनं करावयाची प्रथा आहे किंवा विशिष्ट रीतीनं करायचा प्रघात आहे; त्यांच्याशी कसंतरी वागणं इष्ट मानलं जात नाही. एकंदरीत ठराविक अशा साच्यात वावरण्याची किंवा साचेबद्ध वागण्याची जी पद्धत असते ती प्रोटोकॉलमध्ये मोडते. आपल्या ऑफिसमध्ये पण आपल्या सर्वच नव्हे तर काही वरिष्ठांना त्यांच्या कनिष्ठांनी त्यांच्याशी विशिष्ट पद्धतीनंच वागलं, बोललं पाहिजे असं वाटत असतं; थोडं अधिक-उणं झालेलं त्यांना पटत नाही, पचत नाही, रुचत नाही! अशा गोष्टीना ‘प्रोटोकॉल’ असं शब्दशः म्हणता येत नसलं तरी तो एक प्रकारचा प्रोटोकॉलच असतो, असं मी तरी मानतो माझ्या अनुभवांवरून!

मी एकदा माझ्या प्रबंधकांबरोबर बोलत असताना कुठल्यातरी माणसाविषयी संदर्भ आला. मी त्या माणसाचा उल्लेख ‘दॅट फेलो’ असा केला. प्रबंधक माझ्यावर अक्षरशः उखडले. म्हणाले, “त्याला फेलो म्हणतोस? तो एक चांगला व सज्जन मनुष्य. त्यांचा उल्लेख फेलो असा करू नकोस, त्यांना ‘जंटलमन’ असं म्हण.” उगाच वाद नको म्हणून मी गप्प बसलो. फेलो हा काही वाईट किंवा नालस्तीवाचक शब्द नाही. ‘फेलोशीप’ मिळणे म्हणजे एक प्रकारची पदवी किंवा सन्मान मिळण्यासारखं असतं. मी उच्चारलेला ‘फेलो’ हा शब्द त्यांना वाईट का वाटावा? बोलताना मी प्रोटोकॉल सोडला का, असा प्रश्न मला पडला. कोणाविषयी बोलताना ‘धिस जंटलमन, दॅट जंटलमन’ असं बोलणं चांगलंच, पण कोणाला फेलो म्हणणं वाईट निश्चितच नाही!

असाच एक प्रोटोकॉलसंबंधी अनुभव आला…

माझे एक निकटचे नातेवाईक होते. मोठ्या आस्थापनात बर्‍याच वरच्या हुद्यावर होते. माझं त्यांच्याकडं एक कौटुंबिक स्वरूपाचं काम निघालं. त्यांना मी भेटायला जायचं ठरवलं. प्रत्यक्ष भेटीतच सविस्तर बोलायचं होतं मला. फोनवर बोलता आलं असतं पण फोनवरच्या त्रोटकपणापेक्षा प्रत्यक्ष संवाद चांगला. प्रत्यक्ष बोलताना त्यांची प्रतिक्रिया त्यांच्या देहबोली व चेहर्‍यावरून ताडता येते, फोनवर ते शक्य नसतं. अर्थात संभाषणातून, आवाज-उच्चारातून त्यांचा रोख, मनाची बोली कळते, पण ती थोडी वेगळी असते! मी त्यांना फोन केला व उद्देश सांगून कधी येऊ असं विचारलं. म्हणाले, “सकाळी लवकरच ये, आठच्या पूर्वी. मी सकाळी साडेआठला ऑफिसला जायला निघतो. चहालाच ये, बोलूया.” माझं अर्धं काम झालं. सकाळची आठची वेळ मलाही सोयिस्कर होती. मी त्यांच्या घरी आठच्या ठोक्यालाच पोहोचलो. न्याहारी व चहा तयारच होता. शेजारी-शेजारी बसून न्याहारी करता करता मी त्यांना माझं काम सांगितलं. त्यांनी ते मान्य केलं, होकार दिला. माझं काम झालं, विषय संपला. मला त्यांनी विचारलं, “तू कसा आलास?” मी म्हटलं, “बसनं…” म्हणाले, “मी आता बाहेर पडतो आहे, तुला बसस्टॉपवर सोडतो.” मी मान हलवली. त्यांची कार दारात उभी होतीच. आम्ही बाहेर पडलो. ड्रायव्हर होता, त्यानं त्यांच्यासाठी कारचं मागचं दार उघडलं. ते आत चढले. मागोमाग मी पण त्यांच्या शेजारी बसण्यासाठी पुढे सरलो तर म्हणाले, “पुढच्या सीटवर बस.” मी ड्रायव्हरशेजारी पुढच्या सीटवर बसलो. मला त्यानी स्टॉपवर सोडलं व निघून गेले. मागच्या सीटवर त्यांच्या शेजारी बसायला जागा असताना त्यांनी मला पुढच्या सीटवर बसायला का सांगितलं, याचा मी बसल्यापासून विचार करू लागलो. ते मोठ्या हुद्यावरचे ऑफिसर, मी त्यांच्या तोडीचा नव्हतो हेच ते कारण असावं! मी वाईट वाटून न घेता मनाची समजूत घातली! एका टेबलवर शेजारी बसून थोड्याच वेळापूर्वी केली तशी न्याहारी करणं वेगळं व घराबाहेर ऑफिसमध्ये जाताना गाडीत शेजारी बसणं वेगळं! मुखवटा बदलतो! बरंच झालं, मला चांगला अनुभव तरी मिळाला. पुढच्या वेळेसाठी मार्गदर्शक असा! माणसाचे चेहरे वेगळे असतात, मुखवटे वेगळे असतात. त्यातला फरक आपण ओळखायला हवा व त्यानुसार वागणं इष्ट!

थोड्याच दिवसांनंतर आणखी एक अनुभव आला; मी काम करत असलेल्या आस्थापनाच्या एका मोठ्या व प्रतिष्ठित अशा कस्टमरकडे जाण्याचा. खरं म्हणजे आमचे मुख्य प्रबंधक त्यांच्याकडे जाणार होते. मला म्हणाले, ‘तू पण चल.’ मला असल्या गोष्टींत विशेष रस वाटतो. मी तयार झालो. जायला ऑफिसची गाडी व ड्रायव्हर होता. ऑफिसच्या दारात गाडी आल्यावर आम्ही निघालो. मुख्य प्रबंधकांसाठी ड्रायव्हरनं गाडीचं मागचं दार उघडलं व ते आत बसले. मी पुढचं दार उघडलं व ड्रायव्हरशेजारच्या सीटवर बसायला गेलो.

“पुढे कशाला बसतोस? मागे ये. बसायला जागा आहे,” मुख्य प्रबंधक म्हणाले. मागच्या अनुभवाची शिदोरी माझ्याकडे होती, त्यामुळे अगोदरच मी सावध होतो, आपली पायरी आपण ओळखावी तसा! मी मागच्या सीटवर बसलो. आम्ही बरोबर गेलो, बरोबरच परतलो. वाटेत मुख्य प्रबंधकांनी आपले काही अनुभव ऐकवले. माझ्या कामी येणारे, उपयोगी पडणारे. माझा हुद्दा मुख्य प्रबंधकांच्या हुद्यापेक्षा कमी होता, याची मला तसंच त्यांना पण जाणीव होती; पण त्यांनी तसं भासू दिलं नाही. आपल्या बरोबरीचाच कोणी असावा अशी वागणूक दिली. येथे प्रोटोकॉल कडमडला नाही! प्रसंग अगदी साधा, पण चेहरे व मुखवटे दाखवून देणारा! दोन सारखेच प्रसंग, दोन वेगळे अनुभव!

असे अनुभव ज्या कोणाला आले असतील तर तो अंतर्मुख होतील. ज्यांना नसतील त्याना सावध राहता येईल. प्रोटोकॉलची आठवण राहिली ती अशी!