>> मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची माहिती
>> आज मडगाव रवींद्र भवनात होणार शुभारंभ
राज्य सरकारच्या लोकप्रिय ‘माझे घर’ योजनेखालील सुमारे तीन हजार लाभार्थींना येत्या दहा दिवसांत घरमालकी व भूरूपांतराच्या सनदा देण्यात येणार असल्याची माहिती काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना दिली. या मोहिमेचा शुभारंभ आज 4 जून रोजी मडगाव येथील रवींद्र भवन येथून होणार आहे. रवींद्र भवन येथे आज 1 हजार लाभार्थिंना मुख्यमंत्री डॉ. द सावंत यांच्या हस्ते सनदा वितरित करण्यात येतील. सरकारी जमीन, कोमुनिदादीची जमीन आदी ठिकाणी बेकायदेशीररित्या बांधलेली घरे वरील योजनेमुळे आता कायदेशीर होणार आहेत. काही लोकांनी स्वत: जमिनीतही आवश्यक ती सरकारी प्रक्रिया पूर्ण न करता घरे बांधली होती. त्यांनाही आपली अनियमीत घरे नियमीत करण्याची संधी ‘माझे घर’ योजनेमुळे प्राप्त झालेली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
पुढील दहा दिवसांत राज्यभरात या योजनेखालील लाभार्थींना सनदांचे वितरण करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
केप्यात सरकारी महाविद्यालय
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत काल उच्च शिक्षण क्षेत्राला चालना देण्यासाठी केपे येथील कला, विज्ञान व वाणिज्य सरकारी महाविद्यालयाला 20 हजार चौ. मी. जमीन हस्तांतरीत करण्यात मंजुरी देण्यात आली. आमोणा येथील सदर जमीन जलसंसाधन खात्याकडून महाविद्यालयाला हस्तांतरीत केली जाणार आहे.
राज्यातील अधिसूचित पाणथळ क्षेत्राच्या संरक्षणासाठी गोवा राज्य पाणथळ प्राधीकरणाला 40 लाख रु. मंजूर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली.
मडगावात आज महाशिबिर
दक्षिण गोवा आणि कुशावती जिल्हा प्रशासनाने आज गुरूवार दि. 4 जून 2026 रोजी रवींद्र भवन, मडगाव येथे अर्जांवर जलदगतीने कार्यवाही करण्यासाठी आणि योजनेअंतर्गत अर्जदारांना साहाय्य पुरविण्यासाठी, म्हजे घर योजनेअंतर्गत मेगा शिबिर आयोजित केले आहे. म्हजे घर योजनेअंतर्गत अर्ज सादर केलेल्या सर्व अर्जदारांनी त्यांनी या शिबिरात उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा. अर्जदारांना आवश्यक दाखल्यासह शिबिराला उपस्थित राहून आपले अर्ज मंजूर करून घ्यावे.
अर्जदारांच्या सोयीसाठी, प्रत्येक तालुक्यासाठी स्वतंत्र काउंटर, विभाग उभारण्यात येतील. सासस्टी, फोंडा, मुरगांव, केपे, सांगे, धारबांदोडा आणि काणकोण तालुक्यांचे उपजिल्हाधिकारी आणि मामलेदार आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित असतील.
ज्या अर्जदारांची प्रकरणे कागदपत्रे सादर न केल्यामुळे किंवा इतर त्रुटींमुळे प्रलंबित आहेत, त्यांना आवश्यक कागदपत्रांसह शिबिरात उपस्थित राहण्याची विशेष विनंती आहे. त्यानंतर सकाळी सुमारे 11.30 वाजता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पात्र लाभार्थ्यांना ‘म्हजे घर योजने’ अंतर्गत जारी केलेली प्रमाणपत्रे, सनद, मालकी हक्काची कागदपत्रे आणि इतर आदेश वितरित करतील. सर्व अर्जदारांना आणि जनतेला विनंती आहे की त्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा आणि कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आपले सहकार्य द्यावे असे कळवण्यात आले आहे.