Home Featured इराणचा कुवेतवर द्रोन हल्ला

इराणचा कुवेतवर द्रोन हल्ला

0

एका भारतीयाचा मृत्यू, 63 नागरिक जखमी

कुवेतच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर इराणने केलेल्या द्रोन हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला असून या हल्ल्यात 63 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. या हल्ल्यात अनेक व्यक्तींच्या डोक्याला आणि शरीराच्या इतर भागांना गंभीर दुखापती झाल्या आहेत. यानंतर घटनास्थळी 25 रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्या आणि जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या हल्ल्यामुळे विमानतळाच्या ‘टर्मिनल 1′ चे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. परिणामी, सुरक्षा कारणास्तव हवाई वाहतूक तात्पुरती स्थगित करण्यात आली होती.
तत्पूर्वी, अमेरिकेने दिलेल्या माहितीनुसार, इराणने कुवेतमध्ये तैनात असलेल्या अमेरिकन सैनिकांना लक्ष्य करून पुन्हा एकदा द्रोन हल्ले चढवले होते.

इराणचे अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले
इराणने अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले केले आहेत. इराणने कुवेत आणि बहरीनमधील अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्र-द्रोन हल्ले केले. मात्र अमेरिकेच्या दाव्यानुसार यातील बहुतेक क्षेपणास्त्रे हवेतच रोखण्यात आली. दरम्यान, अमेरिकेने इराणच्या केशम बेट, गोरुक आणि होर्मुजजवळच्या तेलवाहू जहाजांवर हल्ले केले. इराणने प्रत्युत्तरादाखल एका जहाजाला क्षेपणास्त्राने लक्ष्य केले. तसेच लेबनानमध्ये इस्रायली हल्ले सुरू आहेत. नबातियेहसह अनेक भागांवर हवाई हल्ले झाले, तर हिजबुल्लाहनेही द्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले.

खामेनेईंवर तीन महिन्यांनी
होणार अंतिम संस्कार

इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या पार्थिवावर अखेर मृत्यूनंतर तब्बल तीन महिन्यांनी अंतिम संस्कार केले जाणार आहेत. तशी अधिकृत घोषणा इराण सरकारकडून करण्यात आली आहे. यासाठी इराण सरकारने तीन दिवसांच्या राजकीय अंत्येष्टी कार्यक्रमाचे नियोजन जाहीर केले आहे. यासाठी देशातील अनेक मोठ्या शहरांमध्ये शोकसभा काढल्या जाणार आहेत. 28 फेब्रुवारी रोजी अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाच्या पहिल्याच दिवशी खामेनेई (86) यांचा मृत्यू झाला होता.
दरम्यान मुख्य अंत्यसंस्कार कार्यक्रम तेहरानमध्ये होणार असून तो 24 तासांपेक्षा जास्त काळ चालणार आहे. या ऐतिहासिक निरोपासाठी शहरात सुमारे 2 कोटी लोक एकत्र येऊ शकतात असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.