वीजमंत्री ढवळीकर यांची माहिती
केंद्रीय ग्रीडमधील बिघाडामुळे उत्तर गोव्यातील अनेक भागातील वीज पुरवठ्यावर परिणाम झाला, अशी माहिती वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी पत्रकारांशी बोलताना पर्वरी येथे काल दिली.
गोव्याला परराज्यातून केंद्रीय ग्रीडच्या माध्यमातून विजेचा पुरवठा केला जात आहे. वीजपुरवठा करणाऱ्या ग्रीडमधील बिघाडामुळे उत्तर गोव्यातील अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. तसेच, आमोणा येथील वीज उपकेंद्रात तांत्रिक समस्या निर्माण झाली होती. तांत्रिक समस्या दूर करून वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी आवश्यक असलेले साहित्य सध्या उपलब्ध नाही. त्यामुळे कुंकळ्ळी येथील एक जुना ट्रान्स्फॉर्मर आणून तो त्या ठिकाणी बसवून वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येत आहे, असेही वीजमंत्री श्री. ढवळीकर यांनी सांगितले.
वीज खात्याचे कामगार कामचुकारपणा करीत असल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. कामचुकारपणा खपवून घेतला जाणार नाही, असेही मंत्री श्री. ढवळीकर यांनी सांगितले.