>> टीव्हीके पक्षाचे प्रमुख विजय जोसेफ यांनी सलग दुसऱ्या दिवशी घेतली राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट
तामिळनाडूत विजय जोसेफ यांच्या टीव्हीके पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या; परंतु, टीव्हीके पक्ष बहुमतापासून अद्याप दूर आहे. त्यामुळे विजय यांच्या सत्ता स्थापनेत अडथळा आला आहे. विजय जोसेफ यांनी सलग दुसऱ्या दिवशी राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची भेट घेतली. सर्वाधिक जागा मिळाल्याने सत्ता स्थापनेसाठी आपल्याला आमंत्रण द्यावे, अशी विनंती विजयने पुन्हा एकदा राज्यपालांना केली. तसेच बहुमत सिद्ध करण्यासाठी त्यांनी राज्यपालांकडे दोन आठवड्यांची मुदत मागितली; परंतु राज्यपालांनी विजय यांची विनंती मान्य केली नाही. तामिळनाडूत बहुमतासाठी आवश्यक असलेले 118 आमदारांचे समर्थन असलेले कागदोपत्री पुरावे आधी सादर करावे, असे राज्यपालांनी विजय यांना सांगितले, अशी माहिती चर्चेत सहभागी सूत्रांनी दिली.
टीव्हीके पक्षाकडे सध्या एकूण 108 जागा आहेत. त्यापैकी दोन जागांवर विजय जिंकून आले आहेत. त्यामुळे त्यांना एका जागेचा राजीनामा द्यावा लागेल. काँग्रेसच्या पाच आमदारांचे टीव्हीकेला समर्थन मिळाले आहे. त्यामुळे विजय यांच्याकडे सध्या 112 आमदारांचे समर्थन आहे. बहुमतासाठी त्यांना 118 आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे.
सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी टीव्हीके पक्ष प्रमुख अभिनेता विजय जोसे यांना पुन्हा एकदा लोकभवनातून रिकाम्या हाती परतावे लागल्यानंतर कार्यकर्त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या. संतप्त झालेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चेन्नईतील लोकभवनबाहेर मोठे आंदोलन सुरू केले. तसेच भाजपवर त्याचे खापर फोडले. बहुमत सिद्ध करण्यासाठी विधानसभा हे योग्य जागा आहे, लोकभवन नव्हे. बहुमत चाचणी हीच एकमेव योग्य पद्धत आहे आणि राज्यपालांनी त्यानुसार कार्यवाही करावी, असे आंदोलकांचे म्हणणे आहे.
विजय यांच्या निलांकारी या निवासस्थानी काल टीव्हीके पक्षाची बैठक झाली. विजय यांचा आधी शपथविधी सोहळा होईल. त्यानंतर ते बहुमत सिद्ध करतील, अशी अपेक्षा टीव्हीकेच्या आमदारांना होती; परंतु राज्यपालांनी ठेवलेल्या अटीमुळे आमदारांच्या अपेक्षेवर पाणी फेरले गेले. राज्यपालांनी घेतलेल्या भूमिकेविरोधात उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात दाद मागावी, असे काही नेत्यांनी सुचवले, तर मुदतीत बहुमत सिद्ध न केल्यास पुन्हा निवडणुका होतील, अशी शक्यता बैठकीत काही नेत्यांनी व्यक्त केली. परंतु, सध्या निर्माण झालेला पेच हा कायद्याशी संबंधित नसून तो राजकीय आहे. मागील 24 तासांत टीव्हीकेच्या नेत्यांनी पाठिंबा मिळावा म्हणून डीएमकेच्या मित्रपक्षांना आवाहन केले आहे. सीपीआय, सीपीआय-एम, व्हीसीके आणि आययूएमएल या डीएमकेच्या मित्र पक्षांना टीव्हीकेने साद घातली आहे.
राज्यपालांची भूमिका काय?
पीटीआयच्या वृत्तानुसार, सरकार स्थापन करण्यासाठी इतर कोणत्याही पक्षाला आमंत्रित करणार नाही, असे आश्वासन राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी विजय यांना दिले आहे. तसेच सत्तास्थापनेसाठी एक प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे. विजय यांनी त्यांच्या समर्थक आमदारांच्या सह्यांची यादी घेऊन परत यावे. प्रत्येक आमदाराच्या सह्यांची यादी सादर केल्याशिवाय शपथविधीची प्रक्रिया पुढे जाणार नाही. पाठिंब्याचा दावा कागदोपत्री पूर्णपणे ठोस असला पाहिजे. सत्ता स्थापनेनंतर सरकार स्थिर राहावे, शपथविधीनंतर ते लगेच कोसळू नये, असेही राज्यपालांनी म्हटल्याचे समोर येत आहे.