Home बातम्या ओला, उबरला राज्यात परवानगी नाहीच

ओला, उबरला राज्यात परवानगी नाहीच

0

वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांच्याकडून स्पष्ट

वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी काल ओला आणि उबरसारख्या ॲपआधारित ॲग्रीगेटर्सला गोव्यात परवानगी देणार नसल्याचे स्पष्ट केले. मुख्यमंत्री गोएंचो टॅक्सी पात्राव योजनेच्या लाभार्थ्यांना 50 नवीन सीएनजीचलित टॅक्सी सुपूर्द केल्यानंतर मंत्री गुदिन्हो वेर्णा येथे पत्रकारांशी बोलत होते.
यावेली सरकारची भूमिका स्पष्ट करताना गुदिन्हो यांनी, आपण इतर राज्यांतील चालकांशी वैयक्तिकरित्या संवाद साधून आघाडीच्या ॲग्रीगेटर्सच्या कार्यप्रणालीचा अभ्यास केला आहे. सध्या ओला आणि उबर या कंपन्या विविध प्रकारच्या समस्यांना तोंड देत आहेत. गोव्यात, ओलाने काही इलेक्ट्रिक बाइक्सची विक्री केली. मात्र ते वाहनांना योग्य सेवा देऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांची डीलरशिप बंद करावी लागली असल्याचे स्पष्ट केले.
गोवा माइल्सना स्वतःची आव्हाने होती पण त्यांनी त्यावर मात केली. आता त्यांच्याकडे सुमारे 5,000 टॅक्सी आहेत आणि त्यांनी एक कोटी प्रवाशांना सेवा दिलेली असल्याचे मंत्री गुदिन्हो यांनी नमूद केले.

पुढे बोलताना मंत्री गुदिन्हो यांनी, हॉटेल्स आणि पर्यटन केंद्रांमध्ये गोवा माइल्सच्या गाड्यांना अडथळा आणणाऱ्या पारंपारिक टॅक्सी चालकांना कडक इशाराही दिला. स्थानिक पर्यटक टॅक्सी संघटनांनी काही ठिकाणी आणि तारांकित हॉटेल्समध्ये गोवा माइल्सच्या टॅक्सींना प्रवेश करण्यापासून रोखल्यामुळे पर्यटकांना सामानासह एक किलोमीटरपेक्षा जास्त चालण्यास भाग पाडल्याचे व्हिडिओ ऑनलाइन पाहायला मिळत आहेत. त्यामुळे पर्यटकही नाराज झाले आहेत. गोवा एक पर्यटन राज्य आणि आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ आहे. त्यामुळे राज्यात असे प्रसंग पुन्हा घडता नयेत. अन्यथा कठोर कारवाई केली जाईल. पर्यटनाला हानी पोहोचवणारी दादागिरी आम्ही सहन करू शकत नसल्याचे गुदिन्हो यांनी सांगितले.