भाजप ठरला सर्वात मोठा पक्ष; जदयू आणि लोजपचीही दमदार कामगिरी; काँग्रेस आणि राजदची दाणादाण
बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल काल जाहीर झाला, त्यात भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) दणदणीत विजय मिळवला. सत्ताधारी एनडीएने 243 पैकी 202 जागा जिंकल्या. त्यामुळे पुन्हा एकदा एनडीएचेच सरकार बिहारमध्ये स्थापन होणार असल्याचे निश्चित झाले. 89 जागा मिळवत भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरला. एनडीएतील घटक पक्ष असलेल्या जनता दल युनायटेडला 85 जागा, लोकजनशक्ती पक्षाला 19 जागा, हिंदुस्तानी आवाम मोर्चा (सेक्युलर) ला 5 जागा, तर राष्ट्रीय लोकमोर्चा पक्षाला 4 जागा मिळाल्या. दुसरीकडे, राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीचा दारुण पराभव झाला. महाआघाडीला एकूण 35 जागांवरच यश मिळाले. राजदला 25, तर काँग्रेसला अवघ्या 6 जागा मिळाल्या. महाआघाडीतील डाव्या पक्षांना 3 आणि आयआयपी पक्षाला 1 जागा मिळाली.
निर्धारित वेळेप्रमाणे काल सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. त्यानंतर दुपारच्या सुमारास प्राथमिक कल समोर आले, त्यात एनडीएने आघाडी घेतल्याचे दिसून आले, तर अनेक जागांवर महाआघाडीची पीछेहाट होत असल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर सायंकाळपर्यंत अंतिम निकाल स्पष्ट झाला, त्यात एनडीएच पुन्हा एकदा बिहारमध्ये सरकार स्थापन करणार असल्याचे स्पष्ट झाले.
बिहारमध्ये एकूण 243 विधानसभेच्या जागा आहेत. सरकार स्थापन करण्यासाठी बहुमताचा आकडा 122 असून, त्यापेक्षा कितीतरी मोठा विजय भाजपप्रणित एनडीएने यंदाच्या निवडणुकीत मिळवला. भाजप आणि जेडीयूने प्रत्येकी 101 जागा लढवल्या होत्या. लोकजनशक्ती पक्षाने 29 जागांवर निवडणूक लढवली होती. या तिन्ही अनुक्रमे 89, 85 आणि 19 जागा जिंकत एनडीएचा मोठा विजय साकार केला. त्यात त्यांना अन्य घटकपक्षांचीही साथ लाभली.
बिहारमध्ये 2020 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत एनडीएला 122 जागा मिळाल्या होत्या. यात सर्वाधिक जागा भाजपच्या होत्या. भाजपचे 74 आमदार निवडून आले होते. त्यापाठोपाठ जनता दल संयुक्तचे 43 आमदार निवडून आले होते. हम पक्षाचे चार, लोक जनशक्ती पक्षाचा एकच आमदार जिंकला होता. पण, गेल्यावेळी चिराग पासवान यांचा लोक जनशक्ती पक्ष एनडीएसोबत नव्हता.
2020 मध्ये 74 जागा जिंकणाऱ्या भाजपने यावेळी 90 जागा जिंकल्या आहेत. भाजपचे 16 आमदार वाढले आहेत. नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडने तर जबरदस्त कामगिरी केली आहे. गेल्यावेळी 43 जागा मिळालेल्या जदयूला यावेळी 84 जागा मिळाल्या आहेत. जदयूच्या 41 जागा वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वाधिक चांगली कामगिरी जदयूची राहिली आहे. चिराग पासवान यांनाही एनडीएमध्ये आल्याचा फायदा झाला आहे. गेल्या निवडणुकीत एक जागा जिंकलेल्या चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाने यावेळी 19 जागा जिंकल्या आहेत. त्यांनी 18 जागा जास्त जिंकल्या आहेत.
2020 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाने 75 जागा जिंकल्या होत्या; पण, यावेळी त्यांचे खाते 25 जागांवरच बंद झाले. 50 जागांचा फटका तेजस्वी यादवा यांच्या राष्ट्रीय जनता दलाला बसला आहे. काँग्रेसचे गेल्या निवडणुकीत 19 आमदार निवडून आले होते; पण यावेळी काँग्रेसचे यावेळी केवळ 6 आमदार निवडून आले आहेत.
मुख्यमंत्री कोण होणार?
निकाल जाहीर झाल्यानंतर आता बिहारमध्ये मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा रंगली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वात निवडणुका लढवल्या गेल्या होत्या. बिहार निवडणुकीत महाआघाडीने तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार जाहीर केले होते. मात्र, एनडीएमध्ये असा कोणताही निर्णय झालेला नाही. नितीशकुमारच मुख्यमंत्री असतील असेही जाहीर करण्यात आलेले नाही. दुसरीकडे, काल जेडीयूकडून मुख्यमंत्रिपदाबाबत ट्विट केले होते; मात्र काही काळात ते डिलिट करण्यात आले. त्यामुळे मुख्यमंत्रिपदावरून घमासान होण्याची चिन्हे आहेत. या वेळेस भाजपचा मुख्यमंत्री होण्याची दाट शक्यता आहे.
एनडीएचे दणदणीत द्विशतक
राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) 200 हून अधिक जागांवर यश मिळवले. बिहारमध्ये एनडीएची त्सुनामी पाहायला मिळाली आहे. अनेक वरिष्ठ भाजप नेत्यांना 160 ते 180 मिळतील अशी अपेक्षा होती; मात्र एनडीएने 200 चा टप्पा पार केला.
प्रशांत किशोर निष्प्रभ
निवडणूक रणनीतीकार, देशातील अनेक पक्षांना आजवर निवडणुकांमध्ये विजय मिळवून देण्यात सहाय्य करणारे प्रशांत किशोर यांनी यावेळी स्वतःचा पक्ष निवडणुकीत उतरवला होता. मात्र, त्यांना या निवडणुकीत यश मिळाले नाही. त्यांनी 238 जागा लढवल्या होत्या. मात्र, त्यांच्या पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही.
एमआयएमचे चांगले यश
या निवडणुकीत ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) पक्षाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. एमआयएमने एनडीए किंवा महाआघाडीबरोबर युती केली नाही. ‘एकला चलो रे’ चा नारा देत निवडणूक लढवणाऱ्या एमआयएमने अनेक मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात मते मिळवली असून, पाच मतदारसंघांमध्ये विजय मिळवला.
राजद पक्षाला प्रचंड मते
या निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाचा (राजद) पराभव झाला आहे. राजदला केवळ 25 जागांवर आघाडी मिळाली आहे. मात्र, मतांच्या बाबतीत हा बिहारमधील सर्वात मोठा पक्ष आहे. राजदला 1 कोटी 10 लाख 63 हजार मते मिळाली आहेत. संयुक्त जनता दलाला 92 लाख 84 हजार, भाजपला 97 लाख 55 हजार, काँग्रेसला 42 लाख 35 हजार, लोकजनशक्ती पक्षाला (रामविलास पासवान) 24 लाख 39 हजार मते मिळाली आहेत.
तेजप्रताप यादव पराभूत
लालू प्रसाद यादव यांचे ज्येष्ठ पुत्र आणि माजी उपमुख्यमंत्री तेजप्रताप यादव यांचाही दारुण पराभव झाला आहे. काही महिन्यांपूर्वी लालू प्रसाद यादव यांनी तेजप्रताप यांना पक्ष आणि कुटुंबातून बेदखल केले होते. त्यानंतर त्यांना राजकारणातही मोठा धक्का बसला आहे. तेजप्रताप यादव यांना पक्षातून बाहेर काढल्यानंतर त्यांनी जनशक्ती जनता दल या पक्षाची स्थापना केली होती. ते स्वतः महुआ मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहिले होते. मात्र या मतदारसंघात त्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले.
विकासविरोधी लोकांना बिहारच्या जनतेने उत्तर दिले आहे. भारताच्या विकासात बिहारच्या लोकांचा सिंहाचा वाटा आहे; पण ज्या लोकांनी सहा दशकं देशाची सत्ता उपभोगली त्यांनी बिहारला बदनाम केले. बिहारच्या गौरवशाही इतिहासाचा सन्मान काँग्रेसने केला नाही. मी बिहारच्या लोकांना एनडीएला प्रचंड विजय देण्याचा आग्रह धरला होता. बिहारच्या जनतेने माझा आग्रह मानला.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान
बिहार विधानसभा निवडणुकीत आम्हाला प्रचंड बहुमत देऊन राज्यातील जनतेने आमच्या सरकारवर विश्वास व्यक्त केला आहे. या निवडणुकीत एनडीए आघाडीने पूर्ण एकता दाखवली आणि प्रचंड विजय मिळवला. सर्वांच्या सहकार्याने बिहार आणखी प्रगती करेल आणि देशातील सर्वात विकसित राज्यांच्या श्रेणीत समाविष्ट होईल.
- नितीश कुमार, अध्यक्ष, जदयू.
बिहारच्या जनतेने दिलेला कौल आम्ही नम्रपणे स्वीकारतो. आम्ही जनतेचा विश्वास जिंकण्यात कमी पडलो. हा निकाल आमच्यासाठी अनपेक्षित आहे. आम्ही या पराभवाचे सखोल आत्मचिंतन करू, एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून आमचा संघर्ष यापुढेही सुरूच राहील.
- तेजस्वी यादव, अध्यक्ष, राजद.
बिहारचा निकाल आमच्यासाठी अत्यंत निराशाजनक आणि धक्कादायक आहे. बिहारच्या इतिहासातील या सर्वांत मोठ्या पराभवाची आम्ही जबाबदारी स्वीकारतो. आम्ही जनतेचे मन जिंकू शकलो नाही. आम्ही संघटनात्मक पातळीवर सखोल विचार करू. विजयी एनडीएचे आम्ही अभिनंदन करतो.
- राहुल गांधी, नेते, काँग्रेस.