Home Featured मराठीला दुसरी राजभाषा बनवा

मराठीला दुसरी राजभाषा बनवा

0

मगोचे आमदार जीत आरोलकर यांची विधानसभेत मागणी

मराठी राजभाषेच्या मुद््‌‍द्यावरून काल गोवा विधानसभेत शून्यप्रहराला सत्ताधारी व विरोधी पक्ष यांच्यात बरीच जुंपली. शून्यप्रहरावेळी मगोचे आमदार जीत आरोलकर यांनी मराठीचा मुद्दा मांडताना मराठी ही राज्याची दुसरी राजभाषा व्हावी, अशी लोकांची मागणी असल्याचे नमूद केले; मात्र त्याला गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी त्याला जोरदार आक्षेप घेतला.

पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी काल शून्यप्रहरावेळी मगोचे आमदार जीत आरोलकर यांनी गोव्यात मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा द्यावा, अशी मागणी केली. मराठीला राजभाषेचा दर्जा दिला पाहिजे; कारण गोव्यातील बहुतांश लोक व्यवहारासाठी मराठीचाच वापर करतात. गोव्यात लग्नपत्रिका, भजने आणि अन्य व्यवहार प्रामुख्याने मराठीतूनच होतात, असे आरोलकर म्हणाले.

या मागणीला विजय सरदेसाई यांनी तीव्र आक्षेप घेतला. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हस्तक्षेप करताना सरदेसाई हे जीत आरोलकर यांच्या मागणीला हरकत घेऊ शकत नसल्याचे स्पष्ट केले. त्यावर, तसे करता येणार नाही. तसे करणे म्हणजे राजभाषा कायद्याला आव्हान दिल्यासारखे होईल. सरकारला यासंबंधी काही करायचे असेल, तर नवा कायदा संमत करावा लागेल, असे विजय सरदेसाई म्हणाले.

या दरम्यान, मगोचे नेते व मंत्री सुदिन ढवळीकर यांनी जीत आरोलकर यांना पाठिंबा दर्शवला. तसेच मुख्यमंत्र्यांसह सत्ताधारी आमदारांनी पाठिंबा दिल्याने शेवटी जीत आरोलकर यांनी शून्यप्रहराला मराठी ही राज्याची दुसरी राजभाषा करावी, अशी मागणी करणारा ठराव मांडला.