मृतांमध्ये पाच लहान मुलांसह सहा क्रू मेंबर्सचा समावेश
चीनच्या सीमेलगत असलेल्या रशियाच्या पूर्वेकडील अमूर प्रांतात 49 प्रवाशांना घेऊन जाणारे एक प्रवासी विमान काल कोसळले. या अपघातात विमानातील सर्व प्रवासी मृत्यूमुखी पडले. मृतांमध्ये पाच लहान मुलांसह विमानातील सहा क्रू मेंबर्सचा समावेश आहे. हे विमान सोव्हिएत काळातील होते आणि जवळजवळ 50 वर्षे जुने होते. त्याच्या टेल क्रमांकावरून ते 1976 मध्ये बांधले गेले होते, असे दिसून येत आहे.
उड्डाण केल्यानंतर विमान वाहतूक नियंत्रण कक्षाचा विमानाशी संपर्क तुटला होता. विमान बेपत्ता झाल्यानंतर त्याचा हेलिकॉप्टरच्या मदतीने शोध कार्य सुरू करण्यात आले होते. त्यावेही डोंगराळ भागातून धूर येत असल्याचे दिसून आले. हेलिकॉप्टर अपघातस्थळी पोहोचले त्यावेळी विमानाचा मुख्य भाग जळत होता. ही माहिती मिळताच तातडीने मदतकार्य सुरु करण्यात आले.
स्थानिक आपत्कालीन सेवा मंत्रालयाच्या माहितीनुसार, अंगारा एअरलाइन्सचे एन24 हे विमान अमूर प्रदेशातील टिंडा शहराजवळ पोहोचत असतानाच रडारवरून बेपत्ता झाले होते. टिंडा विमानतळावर विमान उतरवण्याचा पहिला प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर, वैमानिकाने दुसऱ्यांदा प्रयत्न केला; परंतु या दरम्यान एटीसीचा विमानाशी संपर्क तुटला. प्राथमिक विश्लेषणानुसार कमी दृश्यमानतेमुळे लँडिंग करताना पायलटची चूक झाल्यामुळे हा विमान अपघात झाला असण्याची शक्यता आहे. टिंडा शहरापासून 16 किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगराळ भागात हे विमान कोसळले.