पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ब्रिटन दौऱ्यावर असून, या दौऱ्यावेळी पंतप्रधान मोदी व ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्यात काल द्विपक्षीय चर्चा पार पडली. या चर्चेनंतर भारत व ब्रिटनमध्ये एक ऐतिहासिक ‘मुक्त व्यापार’ करारावर (एफटीए) सह्या करण्यात आल्या. दोन्ही देशाच्या प्रमुखांच्या उपस्थितीत भारताचे वाणिज्य मंत्री पीयुष गोयल आणि ब्रिटनचे व्यवसाय व व्यापार सचिव जोनाथन रेनॉल्ड्स यांच्यात हा करार पार पडला. दोन्ही नेत्यांनी या व्यापार करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या करारामुळे उभय देशांमधील व्यापार 34 अब्ज डॉलर्सने वाढण्याची अपेक्षा आहे.
या करारानंतर पंतप्रधान मोदी व कीर स्टार्मर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या कराराचा भारत व ब्रिटन या दोन्ही देशांना फायदा होईल. दोन्ही देशांचे उत्पन्न वाढेल, लोकांचे राहणीमान उंचावेल, उभय देशांमध्ये अधिक नोकऱ्या निर्माण होतील, असे स्टार्मर म्हणाले.
पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
या करारानंतर भारत आणि ब्रिटन यांच्यात होणारा व्यापर 34 अब्ज डॉलर्सने वाढेल. तसेच दोन्ही देशांचे आर्थिक नाते नवा आकार घेताना दिसेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.
करारामुळे भारताला काय फायदे होणार?
या करारानंतर भारताच्या अनेक कंपन्या ब्रिटिश मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर जाऊ शकतील. त्यामुळे टॅरिफ कमी होईल आणि व्यवसाय करणे सोपे होईल.
या करारामुळे सॉफ्ट ड्रिंक, सौंदर्य प्रसाधने, मेडिकल उपकरणे आणि ऑटोमोबाइलवरील टॅरिफ 15 टक्क्यांहून थेट 3 टक्के इतका कमी होईल. त्यामुळे भारतात यासंबंधित उत्पादने स्वस्त होतील.
भारतातून ब्रिटनला निर्यात होणाऱ्या वस्तूंवरील शुल्क ब्रिटनकडून 99 ते 100 टक्के कमी होईल, तर भारताकडून देखील ब्रिटनमधून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवरील आयात शुल्क 85 ते 90 टक्क्यांनी कमी होईल.
ब्रिटनमध्ये उत्पादित केलेले ब्रिटीश मद्य आणि व्हिस्की याच्यावरील टॅरिफ आता 150 टक्क्यांवरुन 75 टक्क्यांवर येईल. या दशकाच्या शेवटपर्यंत ते शुल्क 40 टक्क्यांवर येणे अपेक्षित आहे.
भारताकडून ब्रिटनमधून आयात केल्या जाणाऱ्या वाहनांवरील टॅरिफ 100 टक्क्यांवरुन 10 टक्क्यांपर्यंत कमी होतील.
भारतीय टेक्सटाइल्स, फुटवेअर, जेम्स आणि ज्वेलरी, सी फूड आणि इंजिनिअरिंग उत्पादने यांना ब्रिटनमध्ये चांगली किंमत मिळेल.
भारतातील शेती संबंधीची उत्पादने, हवाबंद उत्पादने यांनाही ब्रिटनच्या बाजारात नव्या संधी उपलब्ध होतील.