Home Featured गोवा विद्यापीठाला पहिल्यांदाच ‘नॅक’कडून ‘ए प्लस’ मानांकन

गोवा विद्यापीठाला पहिल्यांदाच ‘नॅक’कडून ‘ए प्लस’ मानांकन

0

गोवा विद्यापीठाने राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता परिषदे (नॅक) चे ‘ए प्लस’ ग्रेड मानांकन प्राप्त केले आहे. प्रथमच गोवा विद्यापीठाला सर्वोच्च ए प्लस ग्रेड मानांकन मिळाले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा विद्यापीठाला ए प्लस ग्रेड मानांकन मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त करून अभिनंदन केले आहे.
यापूर्वी गोवा विद्यापीठाचे बी ग्रेड मानांकन होते. आता, ए प्लस ग्रेड मिळाल्याने गोवा विद्यापीठ देशातील उच्च शिक्षण संस्थांच्या यादीत अग्रक्रमावर पोहोचले आहे. त्यामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य, निधी, तसेच विद्यार्थ्यांच्या विनिमय कार्यक्रमांसाठी विद्यापीठाला अधिक संधी उपलब्ध होतील.

राज्य सरकारने गोवा विद्यापीठाला पायाभूत साधनसुविधांच्या विकासासाठी नेहमीच सहकार्य केले आहे. यापुढेही आवश्यक सहकार्य केले जाणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितले.

कुलगुरू प्रा. हरिलाल बी. मेनन यांनी विद्यापीठाला मिळालेली नॅकची ए प्लस ग्रेड ही एक अभिमानास्पद गोष्ट असल्याचे सांगितले. हे यश विद्यापीठाच्या सर्व घटकांच्या एकत्रित प्रयत्नांचे फलित असून, भविष्यात गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी अधिक कटिबद्ध राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. नॅकच्या पाहणीतील मागच्या वेळच्या उणिवा यावेळी भरून काढण्यात यश आल्यानेच ए प्लस ग्रेड मानांकन मिळविणे शक्य झाले, असे कुलसचिव सुंदर धुरी यांनी म्हटले आहे.