- शरत्चंद्र देशप्रभू
आजच्या घडीला समाजातील साऱ्या घटकांनी आपले हितसंबंध, हेवेदावे सोडून एकत्र येऊन राहिलेला गोवा वाचवण्याचे निर्धारपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक. कारण नवे जागतिकीकरणाचे, अर्थकारणाचे, तंत्रज्ञानाचे वादळ घोंघावते आहे.
मागच्या आठवड्यात पर्वरीला जाणे झाले. तिथले आमचे निवासस्थान तीन बिल्डिंग बसथांब्यावरच्या विरुद्ध दिशेला. हा भाग म्हणजे आल्त, बेती. हाउसिंग कॉलनीला जाणाऱ्या रस्त्याच्या मुखावरच असलेल्या या घरासमोरच्या राष्ट्रीय महामार्गावर चौवीस तास वाहनांची वर्दळ! बसेस, ट्रक, गाड्या, रिक्षा, दुचाकी यांचा गतिमान प्रवाह चालूच असतो. अलीकडच्या वीस वर्षांत त्यात अमानुष वाढ झालेली आहे. कोमुनिदादीची ही जागा सत्तर वर्षांपूर्वी ‘फोर’ म्हणजे भाडेतत्त्वावर विकत घेतली होती. त्यावेळी हा परिसर म्हणजे एक जंगलच. मूळ पर्वरी गाव अन् बाजार तेवढा ठळकपणे अस्तित्व अधोरेखित करत होता. याव्यतिरिक्त दूर एकाकी सुकूर गाव, जेथे कमालीची तुरळक वस्ती आपले पारंपरिक अस्तित्व टिकवून होती. नदीच्या काठावर वसलेला बिठ्ठोण गाव त्या मानाने सुधारणेच्या उंबठ्यावरचा. पर्वरी विधानसभेचा आजचा हा मतदारसंघ सुकूर, साल्वादोर-द-मुंद, पेन्ह-द-फान्स या पंचायत क्षेत्रात विभागलेला. या भागाचा तोंडवळा जरी पोर्तुगीजकाळी आकर्षक नसला तरी काळ्या कातळाने जखडलेला, पुरातन वनश्रीने लपेटलेला. आधुनिक प्रगतीचे दरवाजे खऱ्या अर्थाने खुले झाले या भागाला ते मुक्तीनंतरच्या काळात. गेल्या चाळीस वर्षांत हे दरवाजे इतके सताड उघडे झाले की या प्रगतीच्या आवेगात पर्वरीची आदिम संस्कृती, वनसंपदा, टेकड्या अन् कणखर कातळ अक्षरशः वाहून गेल्याचे प्रतीत होत आहे. इतर गोव्यातील खेड्या-गावांप्रमाणे या परिसराला पण स्वतःची अशी ओळख होती- लोकवस्तीचे अस्तित्व नसताना पण! मुक्तीनंतर पण ही परिस्थिती फारशी बदलली नव्हती. परंतु कोमुनिदादने भूखंड विक्रीत हात सैल सोडले अन् पर्वरीत रहिवासी-क्रांती झाली. याला जोड मिळाली हाउसिंग बोर्डच्या नव्या योजनेमुळे. विविध वर्गांसाठी त्रिस्तरीय निवासी छोटे प्रकल्प बांधले गेले. आरंभीच्या काळात या जंगलसदृश्य भागात उभारलेल्या हाउसिंग बोर्डच्या वसाहतीला मागणीच नव्हती. परंतु का कोण जाणे, जादूची कांडी फिरली अन् हाऊसिंग बोर्डच्या या बांधकामाच्या दृष्टीने सक्षम नसलेल्या गाळ्यांना अतोनात मागणी आली. पणजीतील जमिनीचे महागडे भाव अन् पर्वरी हा मांडवी पुलामुळे झालेला पणजीचा एक विस्तारित जोड भाग ही संकल्पना गरजवंतांच्या गळी उतरवली. याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. काहींनी याकडे गुंतवणूक या दृष्टीने पाहिले. यानंतरचा इतिहास म्हणजे पर्वरीचा अनिर्बंध विकास. डिफेन्स कॉलनी आली तसे अन्य रहिवासी संकुलांनी रांग लावली. हा हा म्हणता पर्वरीचा सारा परिसर काँक्रीट जंगलाने अक्राळविक्राळपणे व्यापला. लांडगे, कोल्हे पहिल्यांदाच अस्तंगत झाले होते; परंतु पर्वरीच्या खोल अंतरंगात शिरताना बांधकाम व्यावसायिकांनी जे सर्पसत्र मांडले त्याला गोव्याच्या इतिहासात तोड नाही. जणू काही पांडवांनी आरंभलेले खांडववन भस्मीकरण अन् जनमेजयाने आरंभलेले सर्पसत्र. पर्वरीच्या आरपार बांधकाम विस्तारले. पूर्वीची रखरखीत पर्वरी भगभगीत झाली. तापमानात वृद्धी झाली, डांबरीकरणामुळे रखरख वाढली. सांडपाण्यासाठी तात्पुरत्या सुविधा आपापल्यापरीने उभारल्या गेल्या, सेप्टिक टँक आल्या, मोकळ्या जागा आक्रसल्या, रस्त्यावरील तसेच पदपथावरील ताण वाढला तसे सर्विस रोड आले, नवे स्वतंत्र पदपथ तसेच विसाव्यासाठी सुबक मजबूत रेलिंग आली.
प्रथम कर्नाटकातून आलेल्या, शासनात कार्यरत असलेल्यांनी पर्वरी हे आपले दुसरे वसतिस्थान यादृष्टीने वसवले. पाठोपाठ ओरिसा, उत्तर प्रदेश, बिहारी, लमाणी, विविध राज्यांतील लोक पर्वरीत स्थायिक झाले. आता नेपाळींनी पण चंचुप्रवेश केलेला दिसून येत आहे. भारत देशाचे हे सप्तरंगी इंद्रधनुष्य पर्वरीच्या क्षितिजावर अनोखे रंग उधळताना दिसत आहे. गोंगाट, वाहतूक कोंडी, प्रदूषण, गुन्हेगारी, अंमलीपदार्थांचा शिरकाव, भांडणतंटे या शहरी समस्या आता पर्वरीचे अविभाज्य अंग होणे साहजिकच. ओळख नसलेल्या या निर्जन जागेत एक नवी ओळख निर्माण झाली. एका कॉस्पोपोलिटन नागरी व्यवस्थेची. तांत्रिकदृष्ट्या पर्वरी ना शहर ना गाव; पंचायतक्षेत्रात असूनही शहरी जीवनाचे उच्च निर्देशांक लाभलेले, ग्रामजीवनातून उफाळणारे, अनिर्बंध परंतु सहजीवनातून व्यक्त होणारे. उगवत्या सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक सजगतेचे आत्मभान. पर्वरीला नगरपालिकेचे अथवा महानगरपालिकेचे कायदेशीर कवच लाभो, न लाभो, परंतु आजतरी पर्वरी स्वयंभू शहराच्या तेजाने लखलखते आहे, चमचमाटाने झगमगत आहे. कायदेशीरीत्या ग्रामजीवनाचा भाग असून व्यवहारात शहराचे निर्विवाद मानांकन मिळणारी काही तथाकथित गावे गोव्यात आहेत, त्यांत पर्वरी अग्रस्थान पटकावेल. नागरी प्रगतीचा चढता आले, परंतु नागरी सुविधा अपुऱ्या, यामुळे या त्रिशंकुसारख्या नव्या वसाहतींना बकाल स्वरूप आल्याचे दिसून येत आहे. पर्वरीला कौटुंबिक कारणासाठी येणे-जाणे होते. पणजीत राहणाऱ्याला पर्वरी विद्रूप वाटते. आपली पर्वरी वाटत नाही. तुलनेत 1970-80 दशकात पर्वरी सुसह्य होती. घराच्या मागच्या बाजूला ओबडधोबड दगडांनी बांधलेले एक विस्तृत मैदान होते. येथे मुलांचे विविध वयोगटांचे समूह विविध मैदानी खेळ खेळताना दिसत. मैदानावरून खाली येताना बसवलेल्या छोट्यामोठ्या दगडांच्या कडेवरून येताना कसरत करावी लागे. रात्री दारुडे यावरून घसरून तोंडघशी पडत. मैदानाच्या डाव्या बाजूला असलेले हनुमान मंदिर छोटे होते, परंतु आकर्षक होते. सभामंडप छोटा होता. गाभारा तर बंदच असायचा. दानपेटी पण दरवाजाच्या आत. फरशी अन् भिंती तेलाने माखलेल्या. छोट्या फलकावर मारुती स्तोत्र. सभामंडपाच्या कठड्यावर दर्शन घेतल्यावर बसायची तात्पुरती सोय. भजन, कीर्तन कार्यक्रम असायचे. संध्याकाळच्या वेळी भाविकांची तशीच पेन्शनरांची उपस्थिती जाणवत असे. छोट्या मार्केट परिसरात स्थलांतरितांची, विशेषतः मजूरवर्गाची हलचल दिसत असे. मार्केट छोटे, अंधाराने लपेटलेले गाळे अन् गलिच्छतेने बरबटलेले. मला वाटते एक महांबरेंचे भुसारी दुकान होते. सप्रे यांचे औषधालय अन् लागूनच वर्तमानपत्रांचे तसेच स्टेशनरीचे छोटे दुकान. एक दारूचा गुत्ता असावा. त्याकाळी कौटुंबिक विवाहसोहळ्यानिमित्त आमच्या घरी नातेवाईक तसेच कुळांचे वास्तव्य असे. लग्नसोहळ्याचे गोड शाकाहारी जेवण झाल्यावर अन् राहणे काही कारणास्तव लांबल्यावर काही निवडक नातेवाइकांना अन् कुळांना या छोट्या दारूच्या गुत्त्याचा दिलासा. नातेवाईक अन् कुळे येथे श्रमपरिहार करणार. सुप्रसिद्ध नाटककार राम गणेश गडकरी यांनी तळीराम या पात्राच्या तोंडातून दारूची महती गायली- उपहासात्मकरीत्या. श्रीमंत, गरीब सर्वांना समान स्तरावर आणणारे दारू हे एक प्रभावी माध्यम. याचा प्रत्यय आम्हाला त्याकाळी येत असे. या छोट्या मार्केटमध्ये त्याकाळी उत्तम प्रतीचे मटण मिळायचे. पणजी-म्हापशाहून या ताज्या मटणासाठी सुट्टीच्या दिवशी रिघ असायची. मार्केट परिसरातील डॉ. हेदे यांचे निवासस्थान अन् दवाखाना म्हणजे रुग्णांना मंदिरच. डॉ. हेदेंची अविरत रुग्णसेवा म्हणजे पर्वरीच्या कातळी वाळवंटातील आश्वासक हिरवळ. दिवसरात्र रुग्णांना दिलासा देणारे डॉ. हेदे म्हणजे आधुनिक ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व, प्रति धन्वंतरीच! रात्री-अपरात्री पण डॉ. हेदे रुग्ण अत्यवस्थ असला तर आवर्जून व्हिजिटला जायचे. व्यवहाराची कधी तमा बाळगली नाही. कमावला तो रुग्णांचा अन् त्यांच्या नातेवाइकांचा उदंड आदर अन् विश्वास.
त्याकाळी पर्वरी परिसर पावसाळ्यात हिरवागार होत असे. बालकवींचे दृष्यकाव्य परिसरात लडिवाळपणे उलगडत असे. तायखळ्याची रानभाजी विपुल प्रमाणात तरारून येत असे. नैसर्गिक झरे जे आता लुप्त झाले आहेत, त्यांना बऱ्यापैकी ‘जोरगत’ येत असे. उजव्या बाजूला वाहणारा ओहोळ लालभडक पाण्याचे अनिर्बंध लोंढे घेऊन जबरदस्त गर्जना करत मुक्त खळाळत असे. या संवेदनशील काळात गावस या हरकाम्याचा उपदेश उपयुक्त ठरत असे. हा गावसू बलदंड शरीराचा, धर्माने मुसलमान. तेव्हाच्या ‘मल्टिस्किल’मध्ये पारंगत. कातळावर वृक्षरोपणासाठी खड्डे खणण्यासाठी कठोर मेहनत घेणार. इंचन् इंच भूमी खोदणार. या युद्धात कितीतरी छिन्नी निकामी होणार, शरीरावरचे घाव सोसणार अन् काम आटोपल्यावर पैशासाठी घासाधीस करणार. काम करून घेणारे पण याच्या कामाने संतुष्ट होऊन जरा हात ढिलाच सोडणार. पावसाळ्यात घाणीने भरून वाहणाऱ्या सेप्टिक टँक साफ करण्यात या गावसूचा हातखंडा. परंतु दिवस अन् वेळ हा ठरवणार. अमावास्येचा काळाकभीन्न काळोख अन् धुंवाधार कोसळणारा पाऊस म्हणजे गावसूला या कामासाठी सुमुहूर्त. घाणीला आपल्या सहकाऱ्यांसमवेत पूर्ण ताकदीनिशी भिडणार. टाकीतून काढलेली घाण खळाळत्या ओहोळातून इसपार से उसपार जाईपर्यंत गावसू स्वस्थ बसणार नाही. या खटाटोपात यजमानांना अन् शेजाऱ्यांना दुर्गंधीचा किमान त्रास होणार याची गावसू काळजी घेत असे. आता ‘सकिंग टँकर’ कार्यरत झाल्यामुळे ही अमानवी प्रथा आपोआप बंद झाली आहे.
त्याकाळी वस्ती पण कमीच. आजूबाजूला डॉ. सुरेश शेट्ये आणि वै. महादेव नायक यांची घरे. समोर ‘आवा इन’ उसगावकरांची व कॉस्मी ग्रुपचा औषध उत्पादन कारखाना. तीन बिल्डिंगच्या बाजूला वखारवाली थळी. बाजूलाच व्हाळातली उतरंड, जिचे दुसरे टोक वेरे बेतीला. आता पर्वरीचा झालेला कायापालट पाहून डोळे विस्फारणार. मैदानावरच्या अर्ध्या भागात हाउसिंग बोर्डचे नवे अद्ययावत मार्केट झाले आहे. नवीन दुकाने थाटलेली दिसतात. मध्ये सर्विस रोड. येथे मला कितीतरी ओळखीचे सहकारी भेटत. सेंट्रल लायब्ररीचे माजी मुख्य ग्रंथपाल हुबळी, सांख्यिकी खात्याचे कोलवेकर, नाटेकर, एस. एम. नाईक वगैरे. गजानन वेर्लेकर हे ज्येष्ठ नागरी सेवेतील अधिकारी अलीकडेच निवर्तले. पोर्तुगीज काळात हे ‘फाजेंदा’चे कर्मचारी. फावल्या वेळात पेडण्यातील तेलंगांच्या जुन्यापुराण्या वाड्यात ट्यूशन घेत. यांच्यामुळे मी ‘सेगुंदग्राव’ उत्तमरीत्या पास झालो. यांचे निवासस्थान जवळच. हे हयात असेपर्यंत पर्वरीला गेल्यावर न चुकता यांची भेट घेत असे. वृद्धपणी यांनी चित्रकलेचा छंद जोपासला. गजानन वेर्लेकर म्हणजे जुना व नवा गोवा यांच्यातील प्रभावी दुवा. ही खासियत आता हळूहळू अस्तंगत होत आहे. आयडीसीचे देशपांडे भेटत. ‘सेझा’चे निवृत्त अधिकारी श्री. लोटलीकर पण भेटत. यातील कित्येक आता संसाराला अंतरले असतील तर काही वृद्धत्वामुळे घरीच राहणे पसंत करत असतील. भेटलेले मित्र सांगत की, आम्ही आता पणजीला जातच नाही. पर्वरी आता स्वयंपूर्ण झालेली असून येथे सारे काही उपलब्ध आहे. एखादा भोबेंसारखा संगीत शौकीन वयावर मात करून पणजीला कला अकादमी अन् मिनेझिस ब्रागांझा येथील कार्यक्रमांना आवर्जून उपस्थिती लावतो. लेखाखात्यातील या निवृत्त अधिकाऱ्याला संगीत, नाट्यकलेमुळे चिरतरुण व्यक्तिमत्त्व लाभले आहे.
आज या पर्वरीची परिस्थिती तीच गोव्याची. मोपा विमानतळ झाल्याने पेडणे महाल पण सांस्कृतिकदृष्ट्या मिटण्याचे संकेत मिळतात. धारगळ गावी पोर्तुगीजकाळी कितीतरी देवदेवतांचे स्थलांतर केले गेले. स्थानिक मंदिरे पण आहेत. पाचशे वर्षांचा पवित्र वारसा लाभलेली ही देवभूमी आज कॅसिनोच्या विळख्यात पुरती अडकली आहे.
दसरोत्सवासाठी येणाऱ्या सहा तरंगांची वाट शाबूत आहे की त्यांना उड्डाणपुलावरून यावे लागणार हे काळच ठरवेल. उड्डाणपुलामुळे गाव जोडले की दुभंगले याचा अभ्यास व्हायला हवा. धारगळ म्हणजे गोवा मुक्तिलढ्यातील सैनिकांचा गाव. आज ही ओळख नव्या पिढीसाठी पुसट होत आहे. स्थलांतरितांना अन् त्यातल्या धनदांडग्यांना याचे महत्त्व नसेल. दोन खांबाचे अस्तित्व तर लुप्त झाले आहे. आजच्या घडीला समाजातील साऱ्या घटकांनी आपले हितसंबंध, हेवेदावे सोडून एकत्र येऊन राहिलेला गोवा वाचवण्याचे निर्धारपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक. बाहेरून येऊन येथे स्थायिक झालेल्यांचा पण त्यांना पाठिंबा मिळेल. कारण त्यांनी मुक्तीनंतरचा गोवा अनुभवला आहे. जागतिकीकरणाच्या रेट्यापासून अवाढव्य शासकीय अधिकारी अन् कर्मचारी संख्या गोव्याला वाचवू शकली नाही. दूरदृष्टी अन् इच्छाशक्तीच्या अभावी भूतानचे मॉडल अभ्यासून ते गोव्याला कितपत उपयोगी पडले असते याचा विचारच झाला नाही. बुडत्या जहाजातून उड्या मारल्या तर जीव कसा वाचेल? समोर अथांग सागर पसरलेला. जहाज वादळातून शिताफीने काढण्याची आवश्यकता आहे. कारण नवे जागतिकीकरणाचे, अर्थकारणाचे, तंत्रज्ञानाचे वादळ घोंघावते आहे.