मुख्यमंत्र्यांकडून ॲपआधारित टॅक्सीसेवेचे पूर्णत: समर्थन
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल राज्य सरकारच्या अभियोग संचालनालयाच्या नवीन कार्यालयाच्या उद्घाटन समारंभात बोलताना टॅक्सीचालकावरील प्राणघातक हल्ला प्रकरणाचा उल्लेख करून राज्यातील टुरिस्ट टॅक्सीसाठी ॲपआधारित टॅक्सी प्रणाली लागू करण्याचे समर्थन केले. सर्वच क्षेत्रात डिजिटल बदल आवश्यक आहे. डिजिटल बुकिंग आणि ट्रॅकिंग प्लॅटफॉर्म असता, तर टॅक्सीचालकावरील हल्ला आणि त्यानंतर वाहन चोरी रोखता आली असती किंवा आरोपींना सहज शोधता आले असते, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
राज्यात पर्यटक टॅक्सींना ॲप प्रणाली लागू करण्यासाठी विरोध होत असताना मुख्यमंत्र्यांनी हे सूचक विधान केले आहे. पाटो-पणजी येथील बीएसएनएल इमारतीत नवीन अभियोग संचालनालयाच्या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केले.
टॅक्सी बुकिंग ॲपसारखी योग्य डिजिटल प्रणाली असती, तर पोलिसांना गुन्हेगाराची ओळख पटवणे आणि त्यांना पकडणे खूप सोपे झाले असते. पर्यटन आणि वाहतूक क्षेत्रांना तंत्रज्ञानाचा स्वीकार करून डिजिटल नवोपक्रमाकडे वळण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. प्रत्येक क्षेत्रात, विशेषतः पर्यटनात, तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक आहे. सार्वजनिक सुरक्षा, पारदर्शकता आणि जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी डिजिटलायझेशन हा एकमेव उपाय आहे, यावर त्यांनी भर दिला.
राज्य डिजिटल प्रशासन आणि विभागांमध्ये सुधारित सेवा पुरवण्यासाठी वचनबद्ध आहे. विकसित गोवा 2037 च्या आमच्या दृष्टिकोनाचा भाग म्हणून आम्ही प्रत्येक संस्था भविष्यासाठी तयार, कार्यक्षम आणि लोककेंद्रीत करण्यासाठी वचनबद्ध आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी मुख्य सचिव डॉ. व्ही. कांडावेलू, महाधिवक्ता ॲड. देविदास पांगम व इतरांची उपस्थिती होती.
सध्या दुरुस्तीची गरज असलेल्या सरकारी इमारतींमध्ये कार्यरत असलेली सरकारी कार्यालये नवीन जागेत स्थलांतरित केली जाणार आहेत. पुढील दोन वर्षांत ती स्थलांतरित करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. जुन्या इमारतींमधून कार्यालये स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तालुकास्तरीय न्यायालयांच्या नूतनीकरणाचे कामही सुरू झाले आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.