मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली बैठक
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखालील राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या (जीएसआयडीसी) संचालक मंडळाची बैठक काल घेण्यात आली. या बैठकीत 149 कोटींच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली.
यावेळी उपाध्यक्ष तथा आमदार केदार नाईक आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत सार्वजनिक सुविधा, शहरी पुनरुज्जीवन आणि संस्थात्मक विकासासाठी महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या उभारणीसाठी मान्यता देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
या बैठकीतील निर्णयांनुसार, महानगरपालिका बाजारपेठ आणि साखळी शहराचे अपग्रेडेशन केले जाणार आहे. तिसवाडीतील सेंट इस्तेव्ह पूल पाडणे आणि पुनर्बांधणी यासाठी 21 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे.
बांबोळीत गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे मुलांचे वसतिगृह बांधण्यासाठी 113 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. मडगावमधील जुन्या सरकारी इमारतींचा पुनर्विकास केला जाणार आहे. त्यात जुनी जिल्हाधिकारी इमारत आणि पोलीस मुख्यालयाचा समावेश आहे. मडगावच्या जुन्या बसस्थानकाचा विकास करण्यासाठी 12 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली. साखळी रवींद्र भवनच्या देखभालीची कामांसाठी 3 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
हे प्रकल्प नागरी पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी, सार्वजनिक उपयुक्तता जागांमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि आपल्या लोकांसाठी आधुनिक, सुलभ सुविधा निर्माण करण्यासाठी सरकारच्या वचनबद्धतेचा एक भाग आहेत. गोव्याच्या पायाभूत सुविधांना दर्जेदार आणि वेगाने आकार देण्यात जीएसआयडीसी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. विकसित गोवा 2037चे ध्येय साध्य करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.