Home बातम्या शिवरायांचे 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत

शिवरायांचे 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत

0

>> रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी अन्‌‍ जिंजीचा समावेश

छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. याबाबतची माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत ‘अद्वितीय वैश्विक मूल्य’ म्हणून समावेश करण्यात आला आहे. जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट झालेल्या या यादीत महाराष्ट्रातील रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी हे 11 किल्ले आणि तामिळनाडूतील जिंजी या एका किल्ल्याचा समावेश आहे.

युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ मानांकनासाठी आवश्यक असलेल्या ‘अद्वितीय वैश्विक मूल्य’ या निकषांवर या 12 किल्ल्यांची निवड झाली. शिवकालीन दुर्गांचे सामरिक, स्थापत्य व सांस्कृतिक महत्त्व, सह्याद्रीच्या कुशल वापरातून साकारलेली माची स्थापत्यशैली आणि गनिमी काव्याचे युद्धतंत्र या सर्व बाबी या मानांकनाच्या निर्णयामध्ये निर्णायक ठरल्या.

मावळ्यांच्या मदतीने स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या शिवरायांचे नाव मोठ्या मानाने घेतले जाते. महाराष्ट्राच्या आणि भारताच्या वेगवेगळ्या भागात असलेले किल्ले त्यांच्या पराक्रमाची साक्ष देतात. म्हणूनच मराठा साम्राज्याचे सामर्थ्य दर्शवणाऱ्या 12 किल्ल्यांची निवड भारतातर्फे 2024-25 मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यासाठी करण्यात आली होती. या किल्ल्यांचा एकत्रित उल्लेख ‘मराठा लष्करी स्थापत्य’ असा करण्यात आला होता. त्यासाठीचा शिफारस करण्यात आलेला प्रस्ताव युनेस्कोकडे पाठवण्यात आला होता. त्याचेच फलित म्हणून शिवकालीन 12 किल्ल्यांना युनेस्कोचे जागतिक वारसा मानांकन मिळाले आहे.
17 व्या ते 19 व्या शतकादरम्यान विकसित झालेली ‘मराठा लष्करी स्थापत्य’ ही एक असामान्य लष्करी व्यवस्था आहे. ही व्यवस्था मराठा राजवटीने त्यांच्या सामरिक दूरदृष्टीतून उभी केली होती. या रचनेतील किल्ले वेगवेगळी श्रेणी, आकारमान आणि रचनात्मक वैशिष्ट्‌‍यांनी परिपूर्ण असून ते सह्याद्री पर्वतरांगांतील डोंगररांग, कोकण किनारपट्टी, दख्खन पठार आणि पूर्व घाट यांसारख्या भौगोलिक वैशिष्ट्‌‍यांना अनुसरून बांधण्यात आले आहेत. हे किल्ले विविध भूप्रदेशांत विखुरलेले असून मराठा सत्तेची लष्करी रणनीती आणि ताकद अधोरेखित करतात, असे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
महाराष्ट्रात एकूण 390 हून अधिक किल्ले असून त्यापैकी केवळ 12 किल्ल्यांची निवड ‘मराठा लष्करी स्थापत्य’ या योजनेत करण्यात आली होती. त्यापैकी आठ किल्ले भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (एएसआय) विभागाच्या संरक्षणाखाली असून उर्वरित चार किल्ले महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाच्या संरक्षणाखाली आहेत.