राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये एआय आधारित हजेरी प्रणाली लवकरच लागू केली जाणार आहे, अशी माहिती पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी काल पर्वरी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये एआय आधारित हजेरी प्रणाली बसविण्यास ग्रामपंचायत सचिवांनी विरोध केला असून, यासंबंधीचे एक निवेदन पंचायत संचालकांना नुकतेच सादर केले आहे.
या मुद्द्यावर बोलताना पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी सांगितले की, राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये एआय आधारित हजेरी प्रणाली कार्यान्वित करण्यामध्ये काही तांत्रिक अडचणी येत आहे. त्या तांत्रिक अडचणी दूर करण्याचे काम सुरू आहे. तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर एआय हजेरी प्रणाली कायान्वित केली जाणार आहे. पंचायत प्रशासनामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.
गुदिन्हो यांनी नवीन एआय हजेरी प्रणालीला विरोध करणाऱ्या पंचायत सचिवांवर जोरदार टीका केली. पंचायत सचिव वक्तशीरपणा आणि जबाबदारी टाळण्यासाठी हा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप मंत्री गुदिन्हो यांनी केला.