अमेरिकेतून भारतात हस्तांतरित करण्यात आलेला मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याप्रकरणीचा एक आरोपी तहव्वूर राणा अखेर भारतीय तपासयंत्रणांपुढे पोपटासारखा बोलू लागला आहे. आपण पाकिस्तानी सेनेच्या सेवेत होतो. नंतर पाकिस्तानी सैन्याचा विश्वासू एजंट म्हणून काम करत होतो आणि मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या आखणीत आपला सहभाग होता अशी कबुली राणाने दिल्याची माहिती उघडकीस आली आहे. हे जर खरे असेल तर मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याशी पाकिस्तानचा असलेला थेट संबंध पुन्हा एकदा ठोसपणे अधोरेखित झाला आहे असेच म्हणावे लागेल. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर जिवंत पकडला गेलेला दहशतवादी अजमल कसाब यानेही पाकिस्तानच्या ह्या हल्ल्यातील सहभागाचा सगळा तपशील उघड केला होता. तहव्वूर राणाची जबानी हा त्या सगळ्या माहितीला दुजोरा आहे आणि पाकिस्तानचा बुरखा फाडण्यास पुरेसा आहे. मुंबईवरील हल्ल्यापूर्वी डेव्हीड कोलमन हेडलीने गोव्यासह भारतातील मुंबई, दिल्ली, जयपूर, पुष्कर, पुणे आदी विविध शहरांची रेकी केली होती. जिथे विदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणावर येतात अशा एखाद्या ठिकाणाची दहशतवादी हल्ल्यासाठी निवड करण्याचे काम हेडलीने केले आणि त्यासाठी त्याला भारतात येण्यास आणि येथे सगळी टेहळणी करण्यास मदत केली तहव्वूर राणाने. त्याने त्याला व्हिसाही मिळवून दिला होता. हेडलीला भारतात हेरगिरीस मुक्त वाव मिळावा ह्यासाठी त्याचा महाविद्यालयीन मित्र असलेल्या राणाने ‘इमिग्रंट लॉ सेंटर’ नावाची बोगस कंपनीही स्थापन केली होती आणि तिची कार्यालयेही भारतात उघडली होती. त्याच कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे भासवत डेव्हीड कोलमन हेडली भारतात आला आणि सगळीकडे फिरून त्याने रेकी केली होती. गोव्यातही त्याने हल्ल्यासाठी संभाव्य ठिकाणांची पाहणी केली होती. मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनससारखे लक्ष्य त्याला तहव्वूर राणाने दाखवून दिले असेही त्याने कबूल केले आहे. लष्कर ए तय्यबाने भारतात गुप्तहेरांचे जाळे विणले असल्याचेही त्याने तपास अधिकाऱ्यांना सांगितले आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे कित्येक गुप्तहेर भारतात पकडले गेले. ह्यापैकी अनेकजण हे हिंदू आहेत हे लक्षात घेण्यासारखे आहे. म्हणजे ज्यांच्यावर यत्किंचितही संशय येणार नाही अशा लोकांना पैशाच्या मोहात पाडून देशद्रोह करण्यास भाग पाडण्याचे काम लष्कर ए तय्यबा पद्धतशीरपणे करीत आली आहे. मुळात लष्कर ए तय्यबाची स्थापनाच गुप्तहेरांचे जाळे विणण्यासाठी झाली होती असे तहव्वूर राणाने सांगितले आहे. डेव्हीड कोलमन हेडलीने भारतात ठिकठिकाणी फिरून माहिती गोळा केली, हल्ल्याच्या संभाव्य ठिकाणांची रेकी केली, त्याला तहव्वूर राणाची मदत तर होतीच, पण मुंबईवरील हल्ल्याच्या चार पाच दिवस आधी तो मुंबईत येऊन पवईला राहिला होता अशीही माहिती आता उघड झाली आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ला किती नियोजनपूर्वक आखला गेला होता आणि त्यासाठी पाकिस्तानच्या आयएसआयने कशी जय्यत तयारी केली होती हे राणाच्या जबानीवरून कळते. डेव्हीड कोलमन हेडली हा कॅनडाचा. त्याची आई अमेरिकन तर बाप पाकिस्तानी. पाकिस्तानच्या आयएसआयचा हस्तक म्हणून तो वावरला आणि आपल्या ह्या कामात आपला मित्र तहव्वूर राणाचीही त्याने मदत घेतली. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या आधी तहव्वूर राणा आणि हेडली ह्या दोघांनीही लष्कर ए तय्यबाच्या प्रशिक्षणतळांना भेट दिलेली होती हेही राणाने कबूल केले आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये मुरिदकेचे लष्कर ए तय्यबाचे जे मुख्यालय भारतीय हवाई दलाने उडवून दिले, तेथेच हे प्रशिक्षण होत असे. अशा तीन प्रशिक्षणांना हेडली हजर होता. ही सगळी त्याची जबानी पाहिली तर पाकिस्तानी लष्कर, आयएसआय, लष्कर ए तय्यबा ह्या सगळ्यांनी मिळून मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचे नियोजन केलेले होते हे स्पष्ट दिसते. पाकिस्तान मात्र सतत ह्या दहशतवादी कारवायांशी आपला संबंध नाही म्हणत हात वर करत आला आहे, परंतु तहव्वूर राणाची जबानी हा त्यासंदर्भातील जगापुढे नव्याने आलेला पुरावा आहे. आता प्रश्न एवढाच आहे की पाकिस्तान आता तरी आपला त्या दहशतवादी हल्ल्यातील सहभाग मान्य करणार का? आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसारख्या संस्था आता तरी पाकिस्तानला अब्जावधी डॉलरची मदत करणे थांबवणार का? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरला भोजनासाठी बोलावून त्याचा आदरसत्कार करणे थांबवणार का? ही ही सगळी मंडळी वेड पांघरून पेडगावला चालली आहेत? भारताने अजून किती पुरावे द्यायचे? म्हणूनच तर ऑपरेशन सिंदूर हेच चोख प्रत्युत्तर ठरते, कारण शेवटी लातोंके भूत बातोंसे नही मानते.