Home Featured …तर ब्रिक्स देशांवर अतिरिक्त 10 टक्के आयातशुल्क लादणार

…तर ब्रिक्स देशांवर अतिरिक्त 10 टक्के आयातशुल्क लादणार

0

डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून निर्णयांचा धडाका लावला आहे. त्यामध्ये टॅरिफ धोरणासह बेकायदेशीर स्थलांतरितांच्या मुद्द्यांचा समावेश आहे. अनेक बेकायदेशीर स्थलांतरितांना अमेरिकेतून हद्दपार केल्यानंतर ट्रम्प यांनी भारतासह जगभरातील अनेक देशांवर आयात शुल्काचे (टॅरिफ) हत्यार उगारले होते. यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिक्स देशांना मोठा इशारा दिला आहे. जो कोणता देश ब्रिक्सच्या अमेरिकाविरोधी धोरणांबरोबर जाईल, त्या देशांवर 10 टक्के अतिरिक्त आयातशुल्क लादले जाईल, तसेच या धोरणाला कोणताही देश अपवाद असणार नाही, अशी इशारावजा धमकीच डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे.

ब्रिक्स नेत्यांनी वाढत्या अमेरिकन आयातकरांवर टीका केल्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिक्सच्या अमेरिकाविरोधी धोरणांना पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रांवर अतिरिक्त 10 टक्के कर लावण्याचा इशारा दिला आहे.

भारतालाही इशारा
ब्रिक्समध्ये भारतही सहभागी आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिक्स राष्ट्रांना दिलेल्या इशारा म्हणजे भारतालाही हा इशारा आहे. त्यामुळे आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या या भूमिकेवर ब्रिक्स राष्ट्र काय भूमिका मांडतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

ब्रिक्स म्हणजे काय?
ब्रिक्स हा ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका हे देश एकत्र येऊन ‘ब्रिक्स’ नावाचे एक संघटन तयार करण्यात आले. 2001 मध्ये गोल्डमन सॅक्सचे विश्लेषक जिम ओनील यांनी ब्राझील, रशिया, भारत आणि चीन या उदयोन्मुख अर्थव्यवस्थांचे वर्णन करण्यासाठी ब्रिक हा शब्द वापरला. 2010 मध्ये या संघटनेत दक्षिण आफ्रिका सामील झाल्यानंतर संघटनेला ब्रिक्स असे नाव देण्यात आले.

जपान, दक्षिण कोरियावर 25 टक्के आयातशुल्क
याशिवाय काल डोनाल्ड ट्रम्प यांनी जपान आणि दक्षिण कोरिया या दोन देशांवर आयातशुल्क लादल्याची घोषणा केली.