होंडा येथे लाईनमनच्या दुर्दैवी मृत्यूनंतर नोटीस जारी
जनरेटरमधून रिव्हर्स वीज प्रवाह आल्यानेच होंडा-सत्तरी येथे वीज खांबावर दुरुस्तीचे काम करणाऱ्या चंद्रू गावकर ह्या लाईनमनचा मृत्यू झाल्याचे चौकशी अहवालातून स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर वीज खात्याने खबरदारीचा उपाय म्हणून वीज ग्राहकांना इन्व्हर्टर आणि जनरेटर सेट बसवण्यापूर्वी वीज खात्याची पूर्वपरवानगी घेण्याची आणि सुरक्षा उपाययोजना आखण्याबाबत सूचना करणारी नोटीस जारी केली आहे.
होंडा सत्तरी येथे वीज खांबांवर दुरुस्तीचे काम करताना विजेचा धक्का बसून लाईनमन चंद्रू गावकर यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले होते. या प्रकाराची चौकशी करून अहवाल सादर करण्याचा आदेश वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिला होता. यानंतर या प्रकरणाचा चौकशी अहवाल वीजमंत्र्यांकडे सादर करण्यात आला.
वीज खात्याने अशा प्रकारचे अपघात पुन्हा घडू नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून ग्राहकांना इन्व्हर्टर आणि जनरेटर सेट बसवण्यापूर्वी नोंदणी आणि सुरक्षा उपाययोजना सक्तीची केली आहे, अशी माहिती वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.
वीज खात्याच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. उद्योजक, व्यावसायिक आणि नागरिकांकडून इन्व्हर्टर आणि जनरेटर सर्रास बसविले जातात. विजेचा प्रवाह बंद करून काम करताना त्या भागातील एखादा इन्व्हर्टर किंवा जनरेटर सुरू केल्यास रिव्हर्स वीज प्रवाह येऊन अपघात होतात. त्यामुळे इन्व्हर्टर आणि जनरेटर बसविण्यापूर्वी वीज खात्याकडे नोंदणी केल्यानंतर आवश्यक उपाययोजना केल्या जाऊ शकतात, असेही ढवळीकर यांनी सांगितले.