दुबईहून गोव्याच्या दाबोळी विमानतळावर प्रवाशांना घेऊन येणारे ‘एअर इंडिया एक्सप्रेस’च्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने ते विमान रद्द करण्यात आले अशी माहिती सूत्रांनी दिली. शनिवारी (दि. 14) रात्री दाबोळी विमानतळावर हे विमान उतरणार होते. मात्र, दुबईमध्येच विमानात तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने ते रद्द करण्यात आले. शनिवारी रात्री 11 च्या सुमारास एअर इंडिया एक्सप्रेसचे आय एक्स-840 विमान दुबईहून प्रवाशांना घेऊन दाबोळी विमानतळावर उतरणार होते. दुबईहून प्रवाशांना घेऊन उड्डाण घेणार असलेल्या या विमानात तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याचे समजताच ते रद्द करण्यात आले. त्या विमानातील प्रवाशांना नंतर दुसऱ्या विमानाने गोव्यात पाठवण्यात येणार असल्याची माहिती दाबोळी विमानतळावरील अधिकृत सूत्रांकडून मिळाली. तसेच ते विमान रद्द झाल्याने नंतर त्या विमानातून दाबोळीवरून दुबई येथे जाणाऱ्या प्रवाशांनाही त्रास सहन करावा लागला.