सभापतींकडून घोषणा : मंगळवारपासून अधिवेशन
राज्य विधानसभेचे मंगळवार २२ रोजीपासून सुरू होणारे अधिवेशन हे पूर्णपणे ई गव्हर्नन्स पद्धतीने होणार असून अधिवेशनात कागदाचा वापर करण्यात येणार नसल्याचे सभापती राजेंद्र आर्लेकर यांनी काल विधानसभा संकुलातील आपल्या दालनात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
या अधिवेशनासाठी सर्व आमदार ऑनलाईन प्रश्न पाठवणार असून त्यासाठीची सगळी व्यवस्था यापूर्वीच करण्यात आली आहे. माहिती तंत्रज्ञान खाते गेले दीड वर्ष यासाठी प्रयत्नरत होते.
आमदार, गोवा विधानसभा कर्मचारी, विविध सरकारी खाती व जनता अशा चार भागांत ई विधानसभेची विभागणी केली असल्याची माहिती आर्लेकर यांनी यावेळी दिली. आमदार कोठूनही ऑनलाईन प्रश्न पाठवू शकतील. प्रश्न सादर करण्यासाठी त्यांना विधानसभा प्रकल्पात यावे लागणार नाही. या व्यवस्थेमुळे यापुढे ते आपल्या मतदारसंघातून अथवा राज्याबाहेर असल्यास तेथूनही प्रश्न पाठवू शकतील, अशी माहिती आर्लेकर यांनी दिली. १० वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा अधिवेशनात कोणकोणते प्रश्न कोणी विचारले होते तो तपशील ऑनलाईन पाहण्याची सोय करण्यात येणार आहे.
यासाठी आवश्यक ते सर्व प्रशिक्षण सर्व मंत्री व आमदार यांना यापूर्वीच देण्यात आलेले आहे. या व्यवस्थेमुळे विधानसभा अधिवेशनात पारदर्शकता येण्यास मदत होणार आहे. विधानसभेच्या संकेतस्थळावर त्या त्या दिवसाच्या कामकाजाची सगळी माहिती उपलब्ध होणार आहे. या व्यवस्थेमुळे अधिवेशनासाठी जो कागदाचा वापर करण्यात येत असे तो ९५ टक्क्यांनी कमी होणार आहे. पर्यावरणाच्या जतनाच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याचे आर्लेकर यांनी स्पष्ट केले.
१११८ तारांकित प्रश्न
दरम्यान, येत्या अधिवेशनासाठी १११८ तारांकित तर १५०० अतारांकित प्रश्न ऑनलाईन विचारण्यात आले आहेत. इंग्रजीबरोबरच कोकणी व मराठी या भाषांतूनही ऑनलाईन प्रश्न विचारण्याची सोय करण्यात आली असल्याची माहिती आर्लेकर यांनी दिली.
आमदारांना लॅपटॉप
सर्व आमदारांना लॅपटॉप उपलब्ध करून देण्यात आलेले असून त्यांच्यासाठी वायफाय सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.