मुंबईकडून दिल्लीचा ४० धावांनी फडशा

0
107

>> पंड्या बंधूंची अष्टपैलू कामगिरी ठरली ‘टर्निंग पॉईंट’

इंडियन प्रीमयर लीग स्पर्धेतील काल गुरुवारी झालेल्या ३४व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा ४० धावांनी फडशा पाडला. विजयासाठी १६९ धावांचे लक्ष्य असताना दिल्लीचा संघ ९ बाद १२८ धावांपर्यंतच पोहोचू शकला. या विजयासह मुंबईने वानखेडेवर दिल्लीकडून झालेल्या पराभवाचा वचपा काढला.

मुंबईप्रमाणेच दिल्लीच्या डावाची सुरुवात चांगली झाली. शॉ व धवन यांनी आक्रमकता व बचाव यांचा सुरेख संगम साधताना ४९ धावांची सलामी संघाला दिली. राहुल चहरच्या गोलंदाजीवर ‘रिव्हर्स स्वीप’चा फटका मारण्याच्या नादात धवनने आपली विकेट बहाल केली. ही भागीदारी फोडल्यानंतर पुढील फलंदाजांना खेळपट्टीवर जम बसवता आला नाही. बिनबाद ४९ वरून त्यांची ५ बाद ७६ अशी घसरगुंडी उडाली. याच प्रकारच्या स्थितीतून मुंबईला पंड्या बंधूंनी सावरले होते. परंतु, चेंडूगणिक फलंदाजांसाठीची कठीण होत गेलेल्या परस्थितीशी जुळवून घेणे दिल्लीच्या फलंदाजांना न जमल्याने मुंबईने पकड अधिक घट्ट केली. अक्षर पटेल (२६) व ख्रिस मॉरिस (११) यांनी ३१ धावांची भागीदारी करत पराभवाचे अंतर थोडे कमी केले. मुंबईकडून नव्या चेंडूने सुरुवात केलेल्या राहुल चहरने धवन, शॉ व श्रेयस अय्यर यांचे महत्त्वाचे बळी टिपले. या पराभवामुळे दिल्लीचा संघ तिसर्‍या स्थानीघसरला असून मुंबई इंडियन्सने दिल्लीचे दुसरे स्थान आपल्या नावे केले आहे. दिल्लीचे १० गुण कायम असून मुंबईने आपली गुणसंख्या १२ केली आहे.

तत्पूर्वी, फलंदाजीस कठीण असलेल्या खेळपट्टीवर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. गोलंदाजांना मदत करणार्‍या या खेळपट्टीवर स्थिरावणे गरजेचे होते. रोहित व डी कॉक यांनी खेळपट्टीचे स्वरुप ओळखून अधिक धोका पत्करला नाही. खराब चेंडूंचा समाचार घेत मोजूनमापून फटकेबाजी केली. विकेट गेल्यास पुढील येणार्‍या फलंदाजाला जुळवून घेण्यास वेळ लागेल याची पूर्ण जाणीव या दोघांना होती. या द्वयीने ६.१ षटकांत ५७ धावांची सलामी दिली. लेगस्पिनर अमित मिश्राच्या एका खाली राहिलेल्या चेंडूवर रोहितचा त्रिफळा उडाल्यानंतर मुंबईच्या डावाला उतरती कळा लागण्यास सुरुवात झाली. तिसर्‍या क्रमांकावर बढती मिळालेल्या बेन कटिंगला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. अक्षर पटेलच्या ‘आर्म बॉल’वर स्वीप मारण्याच्या प्रयत्नात तो पायचीत झाला. काही धावांच्या अंतराने दोन गडी गमवावे लागल्यानंतर मुंबईला अजून एक मोठा धक्का डी कॉकच्या रुपात बसला. सूर्यकुमार यादवने ऐनवेळा धाव घेण्यास नकार दिल्याने स्थिरावलेला डी कॉक माघारी परतला. त्याने २७ चेंडूंत ३५ धावांचे योगदान दिले. सूर्यकुमार यादव याला धावा जमवण्यासाठी झगडावे लागले. मुक्तपणे फलंदाजी करणे त्याला शक्य झाले नाही. २७ चेंडूंत २६ धावा करून त्याने तंबूचा रस्ता धरला. यावेळी मुंबईची १५.१ षटकांत ४ बाद १०४ अशी स्थिती झाली होती व एकूण धावसंख्या १४०च्या आसपास होणे अपेक्षित होते. परंतु, पंड्या बंधूंनी कमाल करताना दिल्लीच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. प्रतिकुल परिस्थितीतही या दोघांनी वेगाने धावा मुंबईच्या खात्यात जमा केल्या. कृणालने २६ चेंडूंत ५ चौकारांसह नाबाद ३७ तर हार्दिकने केवळ १५ चेंडूंत ३२ धावा करत मुंबईला ५ बाद १६८ अशी भक्कम धावसंख्या उभारून दिली. हाणामारीच्या षटकांत इशांत किंवा मिश्राकडून गोलंदाजी करवण्याऐवजी मॉरिसला दिलेली गोलंदाजी मुुंबईच्या पथ्यावर पडली.
मुंबईने या सामन्यासाठी आपल्या संघात दोन बदल करताना जेसन बेहरेनडॉर्फ व इशान किशन यांच्या जागी बेन कटिंग व जयंत यादव यांचा संघात समावेश केला. दुसरीकडे दिल्लीने आपल्या संघात बदल केला नाही.

धावफलक
मुंबई इंडियन्स ः रोहित शर्मा त्रि. गो. मिश्रा ३०, क्विंटन डी कॉक धावबाद ३५, बेन कटिंग पायचीत गो. पटेल २, सूर्यकुमार यादव झे. पंत गो. रबाडा २६, कृणाल पंड्या नाबाद ३७, हार्दिक पंड्या झे. पंत गो. रबाडा ३२, कायरन पोलार्ड नाबाद ०, अवांतर ६, एकूण २० षटकांत ५ बाद १६८

गोलंदाजी ः इशांत शर्मा ३-०-१७-०, कगिसो रबाडा ४-०-३८-२, ख्रिस मॉरिस ३-०-३९-०, किमो पॉल ३-०-३७-०, अमित मिश्रा ३-०-१८-१, अक्षर पटेल ४-०-१७-१
दिल्ली कॅपिटल्स ः पृथ्वी शॉ झे. हार्दिक गो. चहर २०, शिखर धवन त्रि. गो. चहर ३५, कॉलिन मन्रो त्रि. गो. कृणाल ३, श्रेयस अय्यर त्रि. गो. चहर ३, ऋषभ पंत त्रि. गो. बुमराह ७, अक्षर पटेल त्रि. गो. बुमराह २६, ख्रिस मॉरिस झे. हार्दिक गो. मलिंगा ११, किमो पॉल धावबाद ०, कगिसो रबाडा झे. पोलार्ड गो. हार्दिक ९, अमित मिश्रा नाबाद ६, इशांत शर्मा नाबाद ०, अवांतर ८, एकूण २० षटकांत ९ बाद १२८
गोलंदाजी ः हार्दिक पंड्या २-०-१७-१, राहुल चहर ४-०-१९-३, लसिथ मलिंगा ४-०-३७-१, जयंत यादव ४-०-२५-०, जसप्रीत बुमराह ४-०-१८-२, कृणाल पंड्या २-०-७-१