उत्तरेत खाणपट्ट्यात ६० टक्के मते मिळणार : श्रीपाद

0
246

उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातील खाण व्याप्त भागात भाजपला सुमारे ६० टक्के मते मिळणार आहेत. लोकसभा निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी कमी झालेली असली तरी, आपला १ लाखापेक्षा जास्त मताधिक्याने विजय निश्‍चित आहे, असा दावा भाजपचे उमेदवार तथा केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना काल केला.

मांद्रे मतदारसंघात भाजपचे उमेदवार दयांनद सोपटे ४ हजार आणि म्हापसा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार जोशुआ डिसोझा ३ हजाराचे मताधिक्य मिळवून विजयी होतील. शिरोडा विधानसभा मतदारसंघातील पोट निवडणुकीतील भाजप उमेदवार सुभाष शिरोडकर यांच्या मताधिक्याबाबत माहिती जाणून घेतलेली नाही. या ठिकाणी भाजपचे शिरोडकर यांचा विजय निश्‍चित आहे, असा दावा नाईक यांनी केला.
दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात भाजप आणि कॉंग्रेस यांच्यात अटीतटीची लढत झाली असून भाजपचा विजय निश्‍चित आहे, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी पत्रकारांशी बोलताना काल केला. उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार तथा केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचा विजय निश्‍चित आहे. दक्षिण गोवा मतदारसंघात भाजपचे नरेंद्र सावईकर आणि कॉंग्रेसचे फ्रन्सिस सार्दीन यांच्यात अटीतटीची लढत झाली आहे. तरी, भाजपचे सावईकर यांचा विजय निश्‍चित आहे, असे तेंडुलकर यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीसाठी मगो पक्षाने कॉंग्रेस पक्षाला दिलेल्या पाठिंब्याचा भाजपच्या मताधिक्क्यावर कोणताही परिणाम होणार नाही. केवळ, मडकई विधानसभा मतदारसंघातील मताधिक्यावर थोडा परिणाम होणार आहे. सावर्डे, सांगे, काणकोण या भागात कोणताही परिणाम होणार नाही, असा दावा तेंडुलकर यांनी केला. गोवा विधानसभेच्या पोट निवडणुकीत शिरोडा, मांद्रे आणि म्हापसा या तीनही मतदारसंघात भाजप उमेदवारांचा विजय निश्‍चित आहे. या मतदारसंघात मतदानाच्या वेळी मतदान केंद्रावर केवळ भाजपचे कार्यकर्ते वावरताना दिसत होते. विरोधी पक्षाचे कार्यकर्ते काही मतदान केंद्रावर वावरत होते. यावरून भाजपचे वर्चस्व असल्याचे स्पष्ट होत आहे, असेही तेंडुलकर यांनी सांगितले. विधानसभा पोट निवडणुकीत भाजपच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी भाजपच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात काम केल्याची चर्चा आहे. परंतु. याबाबत कोणतीही तक्रार नाही. या विषयावर जास्त बोलण्याची इच्छा नाही, असे तेंडुलकर यांनी सांगितले.