लोकमान्य : तव स्मरण स्फुरणदायी…

0
1749

– ग. ना. कापडी, पर्वरी
एक ऑगस्ट जवळ येऊ लागला की नरकेसरी लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची स्मृती प्रकर्षाने जागृत होते. लोकमान्यांना जाऊन आज ९४ वर्षांचा काळ लोटला आहे, तरी आजही ते सद्यपरिस्थिती समर्थपणे हाताळण्यास हवे होते असे वाटते, श्रीराम, श्रीकृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रमाणेच टिळकांचे गुणगान अखिल राष्ट्रीय स्तरावर होते. या नरपुंगवाच्या हाती इंग्लिश सत्तेविरुद्ध लढण्यासाठी ‘केसरी’ हे शस्त्र होते. तलवार किंवा बंदूक याविरुद्ध प्रभावी लेखणी हे ते शस्त्र होते. आपल्या या मतपत्राचे ध्येय लोकांपुढे मांडण्यासाठी टिळकांनी केसरीचे शीर्षक व त्याच्या दोन्ही बाजूंस सिंह रेखांकित केले होते व खाली पुढील दिव्य काव्यपंक्ती होत्याः
गजालि श्रेष्ठा या निबिडतर कांतार जठरी|
मदांधाक्षा मित्रा क्षणभरही वास्तव्य न करी॥
नखाग्रानी येथे गुरुतर शिळा भेदुनी करी|
भ्रमाने आहे रे गिरिकुहरी हा निद्रित हरी॥
कवी कोण ठाऊक नाही. कुणा अभ्यासकास माहिती असल्यास जरूर वृत्तपत्रातून जाहीर करावे. (जगन्नाथ पंडिताच्या मूळ संस्कृत श्लोकाचे (भामिनीविलास) वासुदेवशास्त्री खरे यांनी केलेले हे समश्लोकी भाषांतर आहे – संपादक) या केसरीवरच्या शीर्षक ओळींनी केसरीचे ध्येय स्पष्टपणे वाचकांसमोर मांडले होते. यात इंग्लिश राज्याला मोठ्या हत्तीची उपमा दिली आहे. भारताचा या विशाल गर्द रानात क्षणभरही यापुढे राहू नकोस असा मित्र म्हणून सल्ला दिला आहे! कारण सांगताना भारताच्या उज्वल शौर्य परंपरेचा उल्लेख करताना त्यात सिंहाची उपमा दिली आहे. त्याचा इतिहास पराक्रमी गाथा हे सांगताना आपल्या नखांनी, स्वतःच्या हातांनी, मोठमोठ्या पाषाणी शिळा फोडून, पण आज भ्रमाने त्या दगडी गुहेत हा निद्रित (निद्रिस्त) असा सिंह किंवा पंचानन आहे. (म्हणूनच तो जागा व्हायच्या आधी मित्राला क्षणभरही या देशात वास्तव्य करू नकोस असा आपुलकीचा सल्ला दिला आहे.)
१९४२ साली ब्रिटिशांनी भारत सोडा अशी ताकीद महात्मा गांधींनी दिली होती. टिळक गेले व महात्माजींचा देशाच्या राजकीय क्षितिजावर उदय झाला व लोकमान्यांनी मित्रत्वाच्या नात्याने भारत सोडायलाच सांगितलेल्या इंग्रजांना महात्माजींनी रागाने आपली कृष हाताची तर्जनी उंचावून ‘भारत सोडा’ ही ललकारी दिली होती.
अशा या दिव्य काव्यपंक्तींस देशाच्या इतिहासात खास स्थान आहे. १९२० साली लोकमान्यांचे आकस्मिक देहावसान झाले. लोकमान्यांच्या हयातीतच त्यांचे सहाय्यक व राजकीय वारस असलेले साहित्यसम्राट न. चिं. केळकर हे केसरीचे संपादक झाले. त्यांनी ‘केसरी’ प्रखर वैचारिक मतपत्राबरोबरच एक साहित्यिक वळण देऊन तो अधिक वाचनीय व लोकप्रिय केला. त्यावेळी सुप्रसिद्ध केसरी हे आजच्या नियतकालिकासारखे वृत्तपत्र नव्हते. तर ते एक ‘मतपत्र’ होते. आजच्यासारखे देशवासीय वृत्तभुकेले (न्यूज क्रेझी) नव्हते. वृत्तापेक्षा लोकांना विचार आवडत व केसरी देशमुक्तीची एक सेवा म्हणून भक्तीने वाचला जाई. साहित्य सम्राट केळकरांनी केसरी जास्त लोकप्रिय केला व देशभर मराठी वाचक असलेल्या महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेश, दिल्ली, गोमंतक अशा मराठी जाणणार्‍या बृहन्महाराष्ट्रात त्याचे अंक तेव्हा जात असत. केसरी पोस्टाने पाठविला जाई. उशिरा पोचे, पण मनासाठी आसुरलेले वाचक तो भक्तीने वाचत. पारायणे करीत. लहान मुलांना केसरीतील परिच्छेद सुलेखनासाठी देत!
लोकमान्य गेल्यावर केसरी न. चिं. केळकरांनी द्विसाप्रहिक केला. मंगळवार व शुक्रवारी असा तो आठवड्यातून दोनदा निघे. न. चिं. केळकरांनी लोकमान्यांवरच्या भक्तीभावाने पुढील काव्यपंक्तीची जोड केसरीस दिली –
वर उल्लेख केलेले शीर्षकगीत पाहिल्यास पृष्ठावर ‘केसरी’ या शीर्षकाखाली तर टिळकस्तवनाच्या पुढील काव्यपंक्ती अग्रलेखाच्यावर असत. आजही तीच परंपरा ‘केसरी’ने लोकमान्यांच्या पणतु-खापर पणतू (डॉ. दीपक टिळक) यांच्यापर्यंत पडली आहे. त्या टिळक स्तवनाच्या ओळी पुढीलप्रमाणेः
तव स्मरण संतत स्फुरणदायी आम्हा घडो|
त्वदीय गुणसंकीर्तन ध्वनी कर्णी पडो॥
स्वदेश हितचिंतनावीण दुजी कथा नावडो|
तुझ्यासमयी आमुची तनुही देशकार्यी पडो॥
हेच टिळक स्मृती स्मरण आम्ही देशवासियांनी बाळगले तर एक समर्थ भारत घडेल. छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, लोकमान्य टिळक, महात्माजी या देवतुल्य नेत्यांनी जे दिव्य स्वप्न पाहिले ते साकार व्हायला वेळ लागणार नाही!
सध्या केसरीचे संपादक डॉ. दीपक टिळक हे लोकमान्यांचे पणतु आहेत. त्यापूर्वी अरविंद गोखले हे संपादकपदी होते. ‘गीतादर्शन’ या गेली ४४ वर्षे चाललेल्या मासिकात गेल्या वर्षीच्या दिवाळी अंकाच्या प्रकाशनसमारंभात त्यांनी लोकमान्यांचा संपादक कौशल्याच्या हृद्य आठवणी सांगितल्या. ते म्हणाले, ‘‘मी केसरीच्या संपादकपदावर रुजू झाल्यानंतरची गोष्ट आहे. अंक लावून झाल्यावर संपादकीय लिहिण्याच्या गडबडीत होतो. एक वृद्ध गृहस्थ कार्यालयात आले. ते म्हणाले, माझे काही काम नाही. फक्त लोकमान्यांच्या खुर्चीवर कोण बसले आहेत हे बघायला आलो होतो.’’ त्यासाठी ते रत्नागिरीतून मुद्दाम आले होते. लोकमान्यांबद्दलचा आदर आणि मुख्य म्हणजे ‘केसरी’ वृत्तपत्राच्या संपादकपदावरून त्यांनी निर्माण केलेली नीतिमत्ता व विश्वासार्हता यांच्या मापदंडाला केलेली ती मानवंदना होती. पत्रकारितेच्या नीतीमत्तेचा पाया या पूर्वासुरींनी असा घातला होता. त्यावेळी संपादकाचा शब्द अखेरचा असे. सत्ता, पैसा, वरिष्ठ यांचे कुठलेही आमीष नसे आणि संस्थाचालकांची पूर्णपणे साथ असे. लोकमान्य हे असे दिव्य संपादक होते म्हणून त्यांना जनतेने ‘लोकमान्य’ ही पदवी दिली होती. गोखले पुढे म्हणाले,‘लोकमान्यांची विरोधकांशी असलेली निर्वैर वृत्ती पुढील आठवणीवरून दिसून येते. त्यावेळी ‘केसरी’ आर्यभूषण मुद्रणालयात छापला जाई. सोमवारी अंक तयार होऊन मुद्रणालयात जाई. बुधवारी पोष्टात पडे. त्यावेळी केसरी आठवड्यातून एकदा शुक्रवारी प्रसिद्ध होई. त्यावेळी वैचारिक मतभेद जहाल-मवाळ मोठ्या प्रमाणात होते. जहाल पक्षाचे नेतृत्व लोकमान्यांकडे होते, तर गोपाळकृष्ण गोखले हे मवाळ पक्षाचे होते. आर्यभूषण प्रेसचा कल मवाळांकडे असताना एकदा अचानक त्यांनी अंक छापणार नाही असे प्रेसचे मॅनेजर लिमये यांनी सांगितले. आयत्या वेळी काय करणार? मवाळांच्या वृत्तपत्रासाठी विशाल हृदयाच्या लोकमान्यांनी पुण्यातील दुसर्‍या मुद्रणालयाकडे शब्द टाकला. फक्त लोकमान्यांच्या शब्दाखातीर त्या दुसर्‍या मुद्रणालयाने अंक छापून दिला. फक्त एक दिवस उशिरा अंक वाचकांना मिळाला. असा प्रकारही एकदाच घडला.
एकदा मोठा पेच संपादकीयाच्या बाबतीत घडला. मवाळांचा ‘ज्ञानप्रकाश’ आर्यभूषणमध्ये छापला जाई. एकदा ज्ञानप्रकाशच्या संपादकांचा अग्रलेख वेळेवर मिळू शकला नाही. आता अंक कसा काढायचा? संपादकीय लिहू शकतील असे एकमेव होते लोकमान्य. तेही विरोधी पक्षाचे! तरीही मुद्रणालयाचे व्यवस्थापक लिमये, गायकवाडवाड्यात लोकमान्यांना भेटायला आले व त्यांनी आपली अडचण सांगितली. लोकमान्यांनी त्यांना अर्ध्या तासाने बोलावले. अर्ध्या तासानंतर लोकमान्यांनी त्यांच्या हातात लखोटा दिला. त्यात लोकमान्यांनी आपल्या विरोधकांची भूमिका घेऊन ज्ञानप्रकाशमध्ये शोभणारे ज्ञानप्रकाशच्या शैलीत लिहिलेले संपादकीय लिमये यांच्या हाती दिले. आश्‍चर्य म्हणजे लोकमान्यांनी त्यात स्वतःवरच टीका केली होती! असे थोर मनाचेे हे नेते होते. विरोधकासाठी विरोध, बाकीच्यावेळी माणुसकी जपणारे, कुणाच्याही कठीण प्रसंगी धावून जाणारे, संकटप्रसंगी विरोधकही त्यांच्या पायाशीे धावत! लोकमान्य हे लोकमान्यच होते. अतुलनीय थोर दिव्य व्यक्तिमत्व. या त्यांच्या ९४ व्या पुण्यतिथीस त्यांच्या चरणी शतशः प्रणाम!