मेरी कोम अंतिम फेरीत

0
141

>> आशियाई मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धा

पाच वेळची जागतिक स्पर्धा विजेती भारताची स्टार मुष्टियोद्धी एम. सी. मेरी कोम हिने आपल्या पाचव्या आशियाई मुष्टियुद्ध सुवर्ण पदकाकडे वाटचाल करताना अंतिम फेरीत धडक दिली आहे. काल झालेल्या ४८ किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत मेरी कोमने जपानच्या सुबासा कोमुरा हिच्यावर ५-० असा एकतर्फी विजय मिळवित आशियाई मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.
यापूर्वी ३५ वर्षीय मेरी कोमने चार वेळा स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता आणि चारही वेळा सुवर्ण पदकावर नाव कोरले होते. त्यावेळी तिने ५१ किलो वजनी गटात ही सुवर्ण कामगिरी केली होती आणि ती सहाव्या वेळी ४८ किलो वजनी गटात उतरली आहे. या गटातील तिचे हे पहिले सुवर्ण किंवा रौप्य पदक असेल.

सुमारे १ वर्षानंतर मुष्टियुद्ध रिंगणात पुनरागमन केलेल्या मेरी कोमने प्रतिस्पर्धी जपानी खेळाडू सुबासाच्या बचावात्मक खेळाचा फायदा उठवित तिला सहज परास्त केले. आता अंतिम फेरीत तिची लढत जर्गालान ओचिरबाट (मंगोलिया) आणि किम हयांग मी (उत्तर कोरिया) यांच्यातील विजेतेशी होईल.
मेरी कोम व्यतिरिक्त रेल्वेची कर्मचारी सोनिया लाठर हिनेही ५७ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तिने उपांत्य फेरीत उझ्बेकिस्तानच्या योदगोरोय मिरजाएवा हिच्यावर मात केली.
दरम्यान, सरिता देवी (६४ किलो), प्रियांका चौधरी (६० किलो), लोवलीना बोर्गोहेम (६९ किलो) आणि शिक्षाने (५४ किलो) यांचा उपांत्य फेरीत पराभव झाल्याने भारताला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.